आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होट आणि नोटही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हे तालुक्याचं गाव. गावाशेजारी असणार्‍या वावरातच देवाप्पा शेट्टी यांचं कुटुंब राहतं. या परिवारातील धाकटा मुलगा टेक्निकलचा डिप्लोमा करतो. पुढं शेती करायला सुरुवात करतो. परंतु शेती करताना दराच्या बाबतीत सगळीकडून फसवणूक झाल्याचं लक्षात येताच संघर्षाला सुरुवात करतो. दोन तीन वेळा जीवघेण्या हल्ल्यातून वाचतो. शेतकर्‍यांना हा युवक आपल्यासाठी काही तरी करेल असं वाटायला लागतं. ते त्याला जिल्हा परिषदेचा सदस्य करतात, मग आमदार आणि मग खासदार. आता याच शिवारातील शेतकर्‍यांनी दुसर्‍यांदा त्याच्या झोळीमध्ये पैशाबरोबरच भरघोस मताचं दान टाकत त्याला पुन्हा दिल्लीतील ससंदेत पाठवून दिलं. राजू शेट्टी या युवकाची ही करामत. राजू देवाप्पा शेट्टी हा युवक जिल्हा परिषदेचा सदस्य बनला. तिथली टर्म पुरी होण्याआधीच विधानसभेसाठी आग्रह झाला आणि भल्याभल्यांना पाणी पाजवून तो आमदार झाला. आमदारकीची टर्म पूर्ण होण्याआधी लोकसभा जाहीर झाली. त्यातही तो मोठ्या मताधिक्याने विजयी झाला आणि राज्याचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. तो धाडसी बनला. थेट बारामतीत जाऊन उपोषणाला बसला. कधी घडलं नव्हतं ते घडत होतं. शेतकर्‍यांची पोरं हातात चाबूक आणि आसूड घेऊन स्वाभिमानीचा बिल्ला छातीला लावून गुरगुरायला लागली. यातूनच मग स्वाभिमानीची ताकद वाढत गेली. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी शेट्टींची ताकद ओळखली. हा माणूस पुन्हा खासदार झाला तर ते अडचणीचं ठरणार असल्याचं त्यांनी ताडलं. शेट्टींचा कोणत्याही परिस्थितीत पाडाव करण्यासाठी गेल्या वर्षी इचलकरंजी येथील जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्षपद देऊन पवारांनी जोडणी घालायला सुरुवात केली. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्यानं ती सोडायचाही निर्णय पवारांनी घेतला. एवढंच नव्हे तर ही जागा कॉँगे्रसला देऊन तिथे आवाडे यांना उभं करूया, असं सोनिया गांधींच्या गळीही उतरवलं. कोल्हापूर , सांगली जिल्ह्यातील 16 साखर कारखान्याच्या साखर सम्राटांना शेट्टी यांच्यासमोर उभे करून शरद पवार यांनी शेट्टी यांचा गेम करण्याचा प्लॅन आखला.
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यापासून ते जनसुराज्यचे विनय कोरे यांच्यापर्यंतचे अनेक मातब्बर नेते विरोधात उभे ठाकले. जयंत पाटील यांनी तर पवारांचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हणजेच शेट्टींचा पराभव करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. परंतु घडत मात्र वेगळंच होतं. पवारांच्या नेतृत्वाखाली हे 16 साखर सम्राट, मंत्री, आमदार, माजी आमदार सगळे आपली कोंडी करत आहेत असं वातावरण तयार करण्यात शेट्टी यशस्वी झाले. त्यामुळे जनतेनेच निर्णय घेतला की राजू पडता कामा नये. शेट्टी यांचे शिवार ते संसद हे पुस्तक निवडणुकीच्या आधी तीन महिने प्रकाशित झाले होते. याचा संदर्भ घेत शेट्टी यांना संसदेतून शिवारात पाठवण्याची भाषा करणार्‍यांचे दात घशात घालून शिवारात काम करणार्‍यांनी जातीपातीचा, पैशाचा विचार न करता शेट्टी यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून सन्मानाने दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला.