आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेवबाबांची भविष्यवाणी (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारताचे योगगुरू आणि आयुर्वेदाचार्य श्री रामदेवबाबा यांच्या योगलीलांना मानणारा मोठा जनसमुदाय आसेतुहिमाचल पसरला आहे. त्यांची लोकप्रियताही अफाट आहे. त्यामुळे त्यांचे दर्शन सर्वसामान्यांना मिळणे दुरापास्त आहे. (अर्थात, हे दर्शन रोज घडावे म्हणून त्यांची अनेक उपग्रह न्यूज चॅनेल्स रोज पहाटेपासून भारताला जागे करण्याचे सत्कर्म करत असतात, हा भाग निराळा!) रामदेवबाबा यांचे खरेखुरे जीवित कार्य आयुर्वेदापासून गोळ्या, गुटिका, दंतमंजन, आसव, मलम तयार करणे एवढेच मर्यादित होते. म्हणजेच, रामदेव बाबांना या आयुर्वेदिक औषधांपासून ‘तंदुरुस्त भारत’ निर्माण करायचा होता. पण रामदेवबाबांच्या आयुर्वेदीय मात्रा देशाला काही लागू झाल्या नाहीत. रामदेवबाबा हे आयुर्वेदाचार्य असल्याने त्यांनी रोगाचे निदान शोधण्यासाठी आपले संशोधन पणास लावले. दोन वर्षांपूर्वी सगळा देश अण्णा हजारेंच्या बेभरवशी आंदोलनामुळे चिंताक्रांत झाला होता, त्या काळात एके रात्री रामदेवबाबा यांना दिव्य स्वप्न पडले. या स्वप्नात त्यांना भारताचे भविष्य अंधकारमय दिसले. वर्तमानात त्यांना या देशातील संपत्ती याच देशाच्या संसदेत बसलेले लोकप्रतिनिधी राजरोसपणे लुटून नेत असल्याचेही दिसले. हे दिव्य स्वप्न बघत असताना काँग्रेस या एकाच पक्षाने देशाला लुटून बरबाद केले, असाही साक्षात्कार त्यांना झाला. पहाटे उठल्यावर हा साक्षात्कार आपल्या अनुयायांना सांगायचा कसा, या विवंचनेत ते होते. मग त्यांनी शक्कल लढवली. योगसाधनेच्या नावावर त्यांनी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर एक भव्य मेळावा आयोजित केला. या संमेलनात योगसाधनेऐवजी त्यांनी राजकीय शुद्धीकरणावर भर दिला. मैदानात जमलेला शेकडोंचा समुदाय रामदेवबाबांच्या या अभूतपूर्व साक्षात्कारावर भाळला. टीव्ही मीडियालाही अशा कार्यक्रमात टीआरपी दिसून आला. पण दिल्लीत बसलेल्यांच्या डोळ्यांना हे शुद्धीकरण भलतेच खुपले आणि त्यांनी हे आंदोलन पोलिस बळावर उधळून लावले. मग काय, पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांना चुकवत रामदेव बाबांना उपोषणाच्या मंचावरूनच थेट आपल्या समर्थकांमध्ये ‘ऐतिहासिक’ उडी घ्यावी लागली. रामदेवबाबांची ही उडी केवळ पोलिसांच्या काठ्यांना घाबरून नव्हती, तर ती राजकारणातील प्रवेशाची नांदी होती, हे भल्याभल्यांना तेव्हा कळले नाही. रामदेवबाबांनी उडी मारून बाईचा वेश परिधान करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पोलिस जसे रामदेवबाबा यांच्या लीलांना फसले, तसा आपल्याकडचा टीव्ही मीडियाही फसला. हा मीडिया नेहमी समाजकारण सोडून टीआरपीच्या शोधात असतो. मीडियाला रामदेवबाबांच्या या उडीत व वेशांतरात फक्त विनोद दिसला व हा विनोद त्यांनी दिवसभर शेकडो वेळा दाखवला. टीव्ही मीडियाच्या न्यूजरूममधील धुरीणांना काही दिवसांनी समजून आले की, योगसाधनेमुळे व्यक्तीचे मन विकारविरहित झालेले असते. अशा व्यक्तींचा इहलोकाशी संबंध हा फक्त लोककल्याणापुरता असतो. अशा व्यक्तींचे राजकारणात स्वागत करण्यासाठी जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपण पुढे आले पाहिजे. त्या दृष्टीने मीडियाने रामदेवबाबांच्या राजकीय प्रवेशाबाबत सहानुभूती दाखवण्यास सुरुवात केली. त्या वेळी अण्णा हजारे, केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने पुरता वेग घेतला होता. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’, अशी आपल्याकडे प्राचीन काळापासून म्हण आहे. तो संस्कार म्हणूनही हिंदू लोक आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणत असतात. अण्णा-केजरीवाल यांनी या हिंदू संस्काराला जागत रामदेवबाबांना आपल्या घरात येऊ दिले. पहिले काही दिवस रामदेवबाबा यांनी या इहलोकांशी जमवून घेतले. पण नंतर त्यांनी स्वत:चे स्वतंत्र आंदोलन सुरू केले. या आंदोलनात त्यांनी देशकल्याणाचा मंत्र सांगितला. भ्रष्टाचाराचे खरे मूळ कोठे आहे याची माहिती भोळ्याभाबड्या जनताजनार्दनाला करून दिली. रामदेवबाबांनी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय सुरू केला. असे व्यापक, लोककल्याणकारी नेतृत्व राजकारणात येते म्हटल्यावर देशात रामराज्य आणण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांची गळाभेट घेतली. गडकरींनी तर खाली वाकून रामदेवबाबांच्या पायांचे दर्शन घेतले. रामदेवबाबा हे नवे मनू आहेत, त्यांच्या सहकार्यातून व आशीर्वादामुळे देशात रामराज्य आणता येणे आता फार दूरची बाब नाही, असा विश्वास त्यांनी मीडियापुढे व्यक्त केला. आता खुद्द रामदेवबाबा राजकारणात उतरले म्हटल्यावर नितीन गडकरी निर्धास्त झाले; पण तेच पुढे गृहकलहाचे बळी ठरले. इकडे रामदेवबाबांना इहलोकात येऊन बराच काळ लोटल्यामुळे त्यांच्या मनात इहलोकातील माणसासारख्या महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ लागल्या. त्यांनी लगेचच राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. राजकारणात कधीही खरे बोलायचे नसते, याची दिव्य समज त्यांना असल्याने ते स्वत: आपली घोषणा विसरून गेले. मग दोन दिवसांपूर्वी त्यांनी अचानकपणे आगामी निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. आपल्याला पंतप्रधान किंवा खासदार होण्याची इच्छा नाही; पण देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत, असे त्यांनी सांगितले. रामदेवबाबांनी आपण सांगू ते 300 खासदार पुढे लोकसभेत दिसतील आणि यासाठी नवी स्ट्रॅटेजी ठरवली असल्याचे सांगितले. त्यांनी आगामी संसदेत काँग्रेसचे शंभर खासदारही दिसणार नाहीत, अशीही भविष्यवाणी केली. वास्तविक मीडियाने रामदेवबाबांना 300 खासदारांचा फॉर्म्युला उघड करण्यास सांगायला हवे होते; पण मीडियाला नेहमीच चमत्कारासाठी वाट पाहायची सवय आहे. त्यांची शोधपत्रकारिताही थंडावली आहे. टीव्ही चॅनेलवर, वर्तमानपत्रांत राजकीय पत्रपंडित राजकारणाच्या उगाच फुकाफुकी बेरजा-वजाबाक्या करत असतात. त्यांना रामदेवबाबांसारखा फॉर्म्युला आढळला नाही, हे या पत्रपंडितांचे अज्ञान समजले पाहिजे. योगसामर्थ्य असलेल्यांना भविष्य दिसते, असे म्हणतात. आता रामदेवबाबांसारख्या योगपुरुषाने स्वत:चे आत्मिक बळ भाजपच्या पाठीशी लावल्याने मोदींसाठी घोडा-मैदान मोकळे झाले आहे.