आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramesh Patange About Editorial On Shiv Sena Chief Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंची मजबुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपला पूर्ण समर्थन दिल्याने शिवसेनेची वेगळी प्रतिमा राहत नाही, यासाठी ही मजबुरी आहे.
भाजपच्या गाड्याला जोडलेली एक छोटी गाडी, अशी शिवसेनेची प्रतिमा होते. एकेकाळी महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेला ही भूमिका घेणे मानसिकदृष्ट्या फारच कठीण आहे.

सत्तेत सहभागी असलेला पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेऊ शकतोका? सिद्धांतत: तो तशी भूमिका घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर टीका करायची असेल तर सत्तेत सहभागी झालेल्या पक्षाने सत्ता सोडली पाहिजे. संसदीय लोकशाहीचा हा संकेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या संकेताशी काही देणे-घेणे नाही. सत्तेत सहभागी झाल्यापासून ते या-ना त्या कारणाने कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, तर कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागतात. त्यानंतर लगेच वाहिन्यांवर त्यावर चर्चा सुरू होते. भाजपविरुद्ध भूमिका घेणे ही उद्धव ठाकरे यांची मजबुरी आहे.

ही मजबुरी अशासाठी आहे की, भाजपला पूर्ण समर्थन दिल्याने शिवसेनेची वेगळी प्रतिमा राहत नाही. भाजपच्या गाड्याला जोडलेली एक छोटी गाडी, अशी शिवसेनेची प्रतिमा होते. एकेकाळी महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेला ही भूमिका घेणे मानसिकदृष्ट्या फारच कठीण आहे. म्हणून सरकार नीट चालले आहे की नाही, हा प्रश्न नसून प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व क्षमतेचा आणि शिवसेनेच्या मोठ्या स्थानाचा आहे.

हे स्थान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे ठरवलेले दिसते. म्हणून ते म्हणतात, "मोदींच्या भक्तांनी मोदींना देव बनून टाकले आहे...मोदी जागतिक लीडर असतील; पण भारतीयांना त्यांची अधिक गरज आहे... जगभर प्रवास करणाऱ्या मोदींनी अवर्षणग्रस्त भागाचा प्रवास केला पाहिजे... नरेंद्र मोदी तरुणांची दिशाभूल करत आहेत... रोहित वेमुला, हार्दिक पटेल आणि कन्हैयाकुमार या नावांची चर्चा चुकीच्या धोरणांमुळे चालू आहे... केंद्र सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे...पाकिस्तानशी तुम्ही बोलणे करू शकता, मग सराफांशी तुम्ही बोलणे का करू शकत नाही?' उद्धव ठाकरे यांची ही झाली मोदींना उद्देशून केलेली वक्तव्ये.

महाराष्ट्र सरकारविरुद्ध उद्धव ठाकरे अशीच वक्तव्ये करत असतात. "आम्ही सरकारात असलो तरी आम्ही खऱ्या अर्थाने विरोध करणारे आहोत. जनतेच्या हिताचे नसलेल्या सरकारी निर्णयांविरुद्ध आम्ही आवाज उठवत राहू आणि त्याला विरोध करत राहू, सरकारला आम्ही अडचणीत आणत राहू.' उद्धव ठाकरे केवळ असे म्हणून थांबत नाहीत, तर त्यांनी सरकारच्या अडचणीत भर घालणारे काही उपक्रम केले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाच्या कार्यक्रमात सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळे फासले. पाकिस्तानी गायक गुलाम अली याच्या संगीताचा कार्यक्रम शिवसेनेने होऊ दिला नाही. पाकिस्तानवर या माध्यमातून टीका करून महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिवसेनेने केलेला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत हल्ला करत असते.

आपले हरवलेले स्थान आपल्याला पुन्हा कसे मिळेल, याची चिंता उद्धव ठाकरे यांना आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी अशी महत्त्वाकांक्षा बाळगणे काही गैर नाही; परंतु ते ज्या मार्गाने निघाले आहेत, त्या मार्गाने त्यांना पुन्हा एकदा क्रमांक एकचे स्थान मिळेल का? एका बाजूला ते म्हणतात की, भाजपबरोबर आमची युती हिंदुत्वाच्या विषयावर आहे आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका करत राहणार. मतदारांना ती आवडत नाही. टीकेसाठी जे मुद्दे उद्धव ठाकरे घेतात, त्या मुद्द्यांना काही अर्थ नसतो. "कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप ठेवणे चूक आहे,' असे ते म्हणणार. अफझल गुरूच्या फाशीचा िदवस जागवण्यासाठी त्याचा गौरव करणारा कार्यक्रम करणारा कन्हैया देशभक्त कसा ठरतो? असा प्रश्न सामान्य मतदारांपुढे आहे. नरेंद्र मोदी देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. लोकांना ते दिसते. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांच्यावर कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. या सरकारची परीक्षा निसर्ग पाहतो आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला, त्यामुळे अनेक राज्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे. त्याविरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार झुंज देत आहे. लोकांपुढे ते करत असलेले प्रयत्न दिसतात. यामुळे या विषयांवर टीका करून शिवसेनेची ताकद कशी वाढणार?

शिवसेनेला ताकद वाढवायची असेल तर त्या पक्षाला पुढे अधिक प्रगल्भ झाले पाहिजे आणि हिंदुत्वाच्या विषयावर केवळ पाकिस्तानविरोधी भूमिका घेणे सोडले पाहिजे. हिंदुत्वाची ही फार संकुचित भूमिका झाली. हिंदुत्व म्हणजे विकास, हिंदुत्व म्हणजे जातीपातीविरहित निर्दोष हिंदू समाजाची निर्मिती आणि हिंदुत्व म्हणजे सर्व उपासना पंथांचा आदर आणि सन्मान हे विषय राज्यकारभारातून लोकांना दिसायला हवेत, त्याची अनुभूती यायला हवी. भाजप आणि शिवसेना दोघांनी मिळून थोडी प्रगल्भता दाखवून या संदर्भात महाराष्ट्रात आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे आणि दोघांनी मिळून वाटचाल केली पाहिजे.

सतत टीका करत राहिल्याने युती सरकारविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा लाभ शिवसेनेला नाही आणि भाजपलाही नाही. युतीचे सरकार चालवणे ही अनेक वेळा तारेवरची कसरत असते. मित्रपक्षांना संतुष्ट ठेवणे आणि त्यांना सन्मानाने सत्तेत सामावून घेणे हे काम युतीतील प्रमुख पक्षाला करावे लागते. जनतेला परिणाम हवे असतात. पाणी, शेती, रोजगार, उद्योग, व्यापार, रस्ते, सार्वजनिक वाहतूक सेवा, अन्नधान्याचा मुबलक पुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण या सर्व क्षेत्रांत भरीव काम होणे गरजेचे आहे. हे जर केले नाही तर जनता माफ करणार नाही. क्रमांक एकचे स्थान मिळवण्याच्या नादात जे मिळवले आहे तेही गमावण्याची पाळी येईल.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)
(ramesh.patange@gmail.com)