आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार्य करावेच लागेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन संसदेपुढे भाषण करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे सहावे पंतप्रधान होते. पहिल्या पाच पंतप्रधानांची भाषणे वाचत असताना आश्चर्यकारकरीत्या सर्व भाषणांमध्ये काही समान मुद्दे आढळतात. पंतप्रधानांचे विदेशातील भाषण देशाच्या परराष्ट्रनीतीचा एक भाग असतो आणि परराष्ट्रनीतीत सातत्य असावे लागते.

जवाहरलाल नेहरू यांचे १३ ऑक्टोबर १९४९ रोजी अमेरिकेच्याससंदेपुढे भाषण झाले. नेहरूंविषयी अमेरिकेला तेव्हा विश्वास वाटत नव्हता. त्यांनी भारताच्या परराष्ट्रधोरणाची पायाभरणी अलिप्ततावादावर केली. अमेरिकेला तेव्हा वाटत होते की, भारत लोकशाहीप्रधान देश असल्यामुळे भारताने लोकशाहीप्रधान अमेरिकेच्या गटात आले पाहिजे. अमेरिकन संसदेपुढे भाषण करताना नेहरू म्हणाले, "अमेरिकेच्या मन आणि अंत:करणाच्या शोधाच्या प्रवासात मी येथे आलो आहे, मी तुमच्यासमोर आमचे मन आणि अंत:करण ठेवीत आहे. आपले दोन्ही देश सहकार्याची आणि एकमेकांना जाणून घेण्याची मनापासूनची इच्छा ठेवतात आणि म्हणून त्या दिशेने आपण सहकार्यात वाढ केली पाहिजे. आत्मनिर्भरता हा देशाच्या यशाचा कणा आहे. आमची आर्थिक क्षमता प्रचंड आहे आणि तिचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी आम्हाला मेकॅनिकल आणि टेकन्लॉजिकल मदतीची आवश्यकता आहे.' नेहरूंचे बोलणे सर्वांनी ऐकून घेतले, परंतु भारताला तेव्हा अमेरिकेने सहकार्य केले नाही. अमेरिकेच्या गटात जायला भारत तयार नव्हता त्याचे कारण होते.

श्रीमती इंदिरा गांधी तशा शक्तिमान पंतप्रधान होत्या. परंतु अमेरिकेचे आणि त्यांचे फारसे जमले नाही. अमेरिकेच्या गळ्यातील ताईत असलेल्या पाकिस्तानचे श्रीमती इंदिरा गांधींनी दोन तुकडे केले. त्यामुळे निक्सन खवळले होते. त्यांनी हिंदी महासागरात सातवे आरमार आणले आणि भारतावर अणुबाँम्ब टाकण्याची सिद्धता ठेवली. रशिया त्यावेळी भारताच्या मागे अतिशय खंबीरपणे उभा राहिला. हा सगळा रोमहर्षक इतिहास आहे. इंदिरा गांधी अमेरिकेत गेल्या परंतु त्यांना अमरिकेच्या संसदेपुढे बोलण्याची संधी मिळाली नाही. ही संधी राजीव गांधी यांना १३ जून १९८५ ला मिळाली.

राजीव गांधी यांचेही भाषण उत्कृष्ट आहे. ते म्हणाले, ""भारत प्राचीन देश आहे. भारताविषयी माझे स्वप्न आहे. सशक्त, आत्मनिर्भर, सर्व राष्ट्रांमध्ये आघाडीवर राहून मानवजातीची सेवा करणे हे माझे स्वप्न आहे. आमच्या लोकांच्या सामूहिक इच्छाशक्तीच्या आधारावर हे स्वप्न पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे.'' त्यांनी अफगाणिस्तानचा उल्लेख आपल्या भाषणात केला. १९८५ मध्ये अफगाण युध्द रशियाविरुद्ध होते. अमेरिका हे युद्ध पाकिस्तान आणि मुजाहिद्दिन यांच्या साहाय्याने अफगाणिस्तानात लढत होते. राजीव गांधी यांनी अफगाणिस्तान स्वतंत्र असावा असे आपल्या भाषणात म्हटले. भारत आणि अमेरिकेच्या संबंधात अर्थपूर्ण सुधारणा राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू झाली, असे म्हणता येऊ शकते.

यानंतर पंतप्रधान नरसिंह राव यांचे १८ मे १९९४ रोजी अमेरिकन संसदेपुढे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणतात की, ""जी संधी उभय देशांना प्राप्त झाली होती. ती शीतयुध्दामुळे दूर गेली. आज तशी स्थिती नाही. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये अंतर खूप आहे, परंतु दोन देशांच्या संबंधात भौगोलिक अंतराला काही अर्थ नसतो, मनाने जवळ येण्याची गरज आहे. अमेरिकेबरोबर जागतिक शांतता आणि समृध्दीसाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत.'' वरील तिन्ही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अमेरिकेपुढे याचकाची भूमिका घेतलेली नाही. अमेरिकन गटात सामील होण्याची भूमिका घेतली नाही. उभय देशात समान पातळीवर संबंध निर्माण व्हावेत आणि परस्परात आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढत जावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

अटल बिहारी वाजपेयी यांचे १४ सप्टेंबर २००० रोजी अमेरिकन संसदेपुढे भाषण झाले. त्याकाळात भारत आणि अमेरिका संबंध फार तणावाचे होते. १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी स्फोट केले. अमेरिकेच्या नाकावर टिचून केले, त्यामुळे अमेरिका संतापली होती. तिने भारतावर आर्थिक निर्बंध घातले. वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले की, ""आपल्या दोन्ही देशांत समान हितसंबंधाचे अनेक विषय आहेत. अण्वस्त्र प्रसाराविषयीची अमेरिकेची चिंता भारत समजू शकतो आणि अण्वस्त्र प्रसार बंदीविषयी तुमचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यात आम्ही अडथळा आणू इच्छित नाही, परंतु आमच्या सुरक्षाविषयक प्रश्नांचा आणि काळजीचा तुम्हीदेखील गंभीरपणे विचार केला पाहिजे.'' वाजपेयी यांच्या काळात आर्थिक सुधारणांमुळे भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती करत चालला होता. भारताची बाजारपेठ जगाला मोकळी होत चालली होती. त्यामुळे भारत आणि अमेरिका व्यापाराच्या क्षेत्रात वाढत गेले.

डॉ. मनमोहन सिंग यांचे १९ जुलै २००५ रोजी अमेरिकन संसदेपुढे भाषण झाले. जॉर्ज डब्ल्यू. बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. बुश आणि मनमोहन सिंग यांचे संबंध फार जिव्हाळ्याचे झाले. बुश आणि मनमोहन सिंग यांच्यामध्ये नागरी अणुऊर्जा सहकार्य करार झाला. हा अतिशय महत्त्वाचा करार समजण्यात येतो. आपल्या भाषणात मनमोहन सिंग म्हणाले, ""भारत तुमच्यावर (बुशवर) प्रेम करतो.'' बुशवर प्रेम याचा अर्थ भारत अमेरिकेवर प्रेम करतो. डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेला आश्वासन दिले की, भारताकडून कोणत्याही प्रकारचा अण्वस्त्र प्रसार होणार नाही किंवा अणुतंत्रज्ञान कोणालाही दिले जाणार नाही. नेहरू ते मनमोहन सिंग असा इतिहास पाहिला तर त्या-त्या काळातील परिस्थिती आणि प्रश्न दोन देशांतील संबंधावर परिणाम करणारे ठरत गेले आहेत.

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जागतिक परिस्थितीत खूप बदल झालेत. पर्यावरणाचे संरक्षण, जागतिक दहशतवाद, भूक, गरिबी, असे मानवजातीपुढचे प्रश्न फार महत्त्वाचे झाले. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांतील साम्य स्थळांवर भर दिला. दोन्ही देशांत लोकशाही आहे, राज्यघटना प्रमाण मानून राज्य चालते, थोरोपासून असहकाराची प्रेरणा गांधींनी घेतली, त्याआधारे देशात चळवळ केली आणि गांधीजींची असहकाराची चळवळ मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियरच्या चळवळीची प्रेरणा झाली. मोदींनी दहशतवादाविषयी अमेरिकेला जागरूक केले आणि काही दिवसांतच आेरलांडो येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यात पन्नासहून अधिक अमेरिकन मारले गेले. जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. अमेरिका भारत यांना मानवजातीच्या कल्याणासाठी सहकार्य करण्यावाचून पर्याय राहणार नाही.
(ramesh.patange@gmail.com)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...