आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता संयम बाळगला पाहिजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप यांना दीर्घकाळ फक्त पराभवाचीच सवय होती. पराभव पचवून कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने कामाला लागत असत. पराभवामुळे सर्व पक्षांत मरगळ आली, कार्यकर्ते हताश झाले, असे कधी घडले नाही. ससा आणि कासव यांच्या गोष्टीप्रमाणे न थकता चालत राहून कासवाने अखेर शर्यत जिंकली. आज केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजप सत्तेवर आला आहे. अनेक वेळा असे होते की, पराभव पचवणे त्यामानाने सोपे जाते, परंतु विजय पचवणे कठीण जाते. पराभवात विजयाची बीजे असतात आणि विजयात पराभवाची बीजे असतात. यासाठी भाजपच्या विजयाचा उत्सव साजरा करत असताना अनेक गोष्टींचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. 
 
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर भाजपने अनपेक्षित यश प्राप्त केलेे आहे. कालपर्यंत तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर असणारा भाजप आज पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. हे यश जसे विचारधारेचे तसेच विचारधारेला समर्पित कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे आहे. उत्तम नेतृत्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचेदेखील हे यश आहे. मूकपणे भाजपच्या मागे उभे राहणाऱ्या हजारो संघ स्वयंसेवकांचेदेखील हे यश आहे. 
 
राजकीय यश संघर्षातून मिळवावे लागते. पूर्वीसारखी रणांगणातील शस्त्रांची लढाई करावी लागत नाही, पण ही लढाई मतांची लढाई असते. प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते असे म्हणतात. लोकशाही लढाईत उतरलेले सेनापती तावातावाने बोलतात. प्रतिस्पर्ध्यांच्या वर्मावर आघात करतात, एकमेकांच्या भानगडी काढतात, आरोप-प्रत्यारोपाला तर काही सीमा नसते. यामुळे काही काळापुरते का होईना सार्वजनिक वातावरण गढूळ होऊन जाते. 
 
अशा प्रखर संघर्षातून जेव्हा विजय मिळतो, तेव्हा स्वत:विषयीचा अभिमान आणि गर्व निर्माण होतो आणि प्रतिस्पर्ध्यांविषयी हीन भाव निर्माण होतो. प्रतिस्पर्ध्याला आपण कसे गारद केले, त्यांचीच वाक्ये त्यांच्यावर कशी उलटवली, आमची औकात काढणाऱ्यांना त्यांची औकात कशी दाखवून दिली, अशा प्रकारची वक्तव्ये येत राहतात. नम्रपणे सांगायचे तर ही वक्तव्ये डोक्यात विजयाची हवा शिरल्याचे परिणाम आहेत. विजयात जो संतुलित राहतो, उदार मनाचा राहतो आणि प्रतिस्पर्ध्यांविषयीदेखील आदराची भावना ठेवतो त्याचा विजय खरा विजय असतो. 

याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण अब्राहम लिंकन यांच्या जीवनात बघायला मिळते. अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झाले. अकरा राज्यांनी अमेरिकन संघराज्यातून फुटून स्वतःचे वेगळे राज्य निर्माण केले. फुटीरतावादी शत्रू झाले. अमेरिका एक ठेवण्यासाठी लिंकनला युद्ध करावे लागले. ते पाच वर्षे चालले. त्यात जवळजवळ पंधरा लाख लोक ठार झाले. १८६५ मध्ये युद्ध संपले. लिंकन दुसऱ्यांदा निवडून आले. लिंकन विजयी राष्ट्राचे प्रमुख होते, त्यामुळे ज्यांनी युद्ध केले त्यांना अतिशय कठोर शासन करणे राजनीतीला धरून होते, परंतु लिंकन यांनी यातील काहीही केले नाही. भाषणात ते म्हणाले, ‘कुणाविषयीही द्वेषबुद्धी न ठेवता आणि सर्वांविषयी परोपकार बुद्धी ठेवून, देवाने जे सत्य पाहण्याची शक्ती आपल्याला दिली आहे, त्या सत्यावर अढळ निष्ठा ठेवून आपण सध्या ज्या कार्यात गुंतलो आहोत ते कार्य पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. देशाच्या जखमा बांधूया. ज्यांनी या युद्धाचे घाव सोसले त्यांची काळजी घेऊया. त्यांच्या विधवा पत्नी व पोरक्या झालेल्या मुलांची काळजी घेऊया. न्याय आणि चिरकालिक अशा आपसातील शांततेच्या प्रस्थापनेसाठी तसेच सर्व देशातील शांततेच्या प्रस्थापनेसाठी जे काही करावे लागेल ते आपण करूया.’ लिंकन यांनी सर्वांना क्षमा करून टाकली. परिणाम, अमेरिका आजच्या स्वरूपात उभी राहिली. 
 
लिंकनचा हा आदर्श लोकशाही राज्यव्यवस्था चालविणाऱ्या सर्वांना धडा गिरवण्यासारखा आहे. विरोधक आपले शत्रू नाहीत, ते आपल्याच समाजाचे अंग आहेत, आपल्यासारखेच तेही देशभक्त आहेत, आपल्याप्रमाणे त्यांच्या मनातही समाजाच्या हिताची चिंता आहे आणि आपल्याप्रमाणे तेही त्यांच्या-त्यांच्या विचारांना आणि कार्याला समर्पित असतात. लोकशाहीचा कारभार मतदारांसाठी नाही तर नागरिकांसाठी करायचा असतो. लोकशाही राज्यात देवाण-घेवाण केल्याशिवाय राज्य सुखकारक होत नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या विचारधारा निवडून येत नाहीत, सत्तेच्या जवळ येत नाहीत, त्यांना सत्तेत कसे सामावून घ्यायचे याचे मार्ग शोधावे लागतात. काल-परवापर्यंत जे आपले होते, परंतु आज वेगळे झाले, त्यांचा विचारदेखील वेगळ्या प्रकारे केला पाहिजे. त्यांच्या ताटातील सगळेच आपल्या ताटात ओढून घेण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रयत्न केल्यास आणि काही ओढून घेतल्यास आम्ही जिंकलो असा तात्कालिक आनंद मिळेल, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम वाईट होतील. आणीबाणीचा लढा जिंकल्यानंतर सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणाले, ‘आता झाले गेले विसरा आणि क्षमा करा’ अशी उदार मानसिकताच देशाला पुढे नेते. 
 
भाजपला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे. म्हणून भाजपने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, लोकांच्या सहभागाशिवाय राज्य सुखकारक होणार नाही. निवडणूक प्रक्रियेत समाजातील अनेक अल्पसंख्याक गट बाहेर फेकले जातात. त्यांना तसेच राहू देणे म्हणजे लोकशाही नव्हे. त्यांना विकासाच्या कामात सहभागी करून घेणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, त्यांचा सहानुभूतीने विचार करणे अत्यावश्यक आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...