आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा तर नेहरूंचाच अपमान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली लोकशाही, आपले लोकशाही स्वातंत्र्य, आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपली पवित्र राज्यघटना या सर्वांचे अस्तित्व देश टिकला तरच राहील. देश नसला तर या सर्व विषयांना काही अर्थ नाही. पारतंत्र्यात किंवा अराजकाच्या वातावरणात या लोकशाही, लोकशाही स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या केवळ कागदी कल्पना राहतात.
विद्यापीठे कशासाठी ख्यातनाम झाली पाहिजेत? असा जर प्रश्न विचारला तर त्याचे स्वाभाविक उत्तर असे येईल की, विद्यापीठे अध्ययनासाठी ख्यातनाम झाली पाहिजेत. दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला बहुधा हे मान्य नसावे. म्हणून हे विद्यापीठ भलत्याच कारणासाठी भारतभर आणि जगभर चर्चेचा विषय झाले आहे. नेहरूंच्या देशभक्तीबद्दल आणि भारत समर्पणाबद्दल तसेच लोकशाही निष्ठेबद्दल त्यांचे विरोधकही शंका घेऊ शकत नाहीत. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी ११ वर्षे तुरुंगात काढली. आणीबाणीच्या कालखंडात अठरा महिन्यांचा तुरुंगवासदेखील मिसाबंदींना असह्य झाला होता. अशा देशभक्त नेहरूंच्या नावाने चालणारे विद्यापीठ देशविरोधी कार्यासाठी ख्यातनाम व्हावे, हे देशाचे दुर्दैव आहे.

भारताच्या संसदेवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्यांपैकी अफझल गुरू एक होता. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तो दोषी असल्याचे सिद्ध झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली. २०१३ मध्ये त्याला फासावर लटकवण्यात आले. या विद्यापीठात अफझल गुरूला शहीद उपाधी देऊन त्याची तिसरी मृत्युतिथी साजरी करण्यात आली. अफझल गुरूची ‘न्यायालयीन हत्या' करण्यात आली अशा घोषणा देण्यात आल्या. ‘काश्मीर की आझादी तक, भारत के बरबादी तक जंग रहेगी जारी' व पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर भारतीय दंडविधान कलम १२४ अ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे देशद्रोहाचे असतात. विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला अटक झाली.

प्रारंभी म्हटल्याप्रमाणे शत प्रतिशत देशभक्त असलेल्या नेहरूंच्या नावाच्या विद्यापीठात ही गोष्ट घडावी ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. विद्यार्थी नेत्यांना अटक झाल्यानंतर देशनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा याबाबत चर्चा सुरू झाल्या. त्यात प्राध्यापक, तथाकथित विचारवंत आणि ख्यातनाम पत्रकार सामील झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे की देशनिष्ठा महत्त्वाची?
बहुमतवाल्यांची देशनिष्ठा म्हणजे खरी देशनिष्ठा आहे का? देशनिष्ठा ही संकुचित संकल्पना आहे, मानवी मूल्यनिष्ठा सर्वांत महत्त्वाची! माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याचे संरक्षण करणारी लोकशाही ही देशनिष्ठेपेक्षा श्रेष्ठ असे अकलेचे तारे तोडणारे शोध लावण्यात आले. एका अर्थाने, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे घडले त्याचे तात्त्विक समर्थन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. विसंवादाला सुसंवादाचा युक्तिवाद देऊन तो सत्य असल्याचा आभास निर्माण करण्यात डावे विचारवंत अतिशय हुशार आहेत, परंतु हा सर्व युक्तिवाद आतून गर काढलेल्या भोपळ्यासारखा पोकळ असतो. त्याचा उपयोग ध्वनी निर्माण करण्यासाठी होतो.

या विचारवंतांना हल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भलताच पुळका आलेला दिसतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण केले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय सैन्य पाठवण्याचे ठरले. डॉ. आंबेडकरांनी महार बटालियन पाठवण्याचा सल्ला दिला. या महार बटालियनने हल्लेखोरांना परतवून लावले आणि शब्दशः भीमपराक्रम केला. झांगर येथे महार बटालियनने दिलेली झुंज ही रोमहर्षक असून या झुंजीमुळेच काश्मीर वाचला. या पराक्रमामुळे बटालियनला महावीरचक्र आणि वीरचक्राचे सन्मान मिळाले.
विद्यापीठाचे काम प्रज्ञावंत विद्यार्थी निर्माण करण्याचे असते. असे विद्यार्थी की जे ज्ञानसंपन्न असतील आणि त्या ज्ञानाचा उपयोग ते देश आणि मानवजातीच्या उत्थानासाठी करतील. जगातील सर्व नामवंत विद्यापीठे हेच काम करतात. कोणतेही विद्यापीठ आपल्या देशाच्या विनाशाची घोषणा देणारे शिक्षण देत नाही. आंबेडकरांनी या देशाचा सत्यानाश का झाला? याची कारणे सांगताना असे म्हटले की, आपल्या समाजात देशद्रोही निर्माण झाले, दाहिरचा सेनापती महंमद बिन कासीमला जाऊन मिळाला. शिवाजी महाराजांविरुद्ध त्यांचे स्वकीयच उभे राहिले आणि १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात शिखांनी इंग्रजांना मदत केली. म्हणून बाबासाहेबांनी घटना समितीपुढच्या अखेरच्या भाषणात सर्वांना कळकळीचे आवाहन केले की, देशापेक्षा पक्ष मोठा मानू नका. व्यक्ती मोठी मानू नका. देश मोठा माना.

आपली लोकशाही, आपले लोकशाही स्वातंत्र्य, आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपली पवित्र राज्यघटना या सर्वांचे अस्तित्व देश टिकला तरच राहील. देश नसला तर या सर्व विषयांना काही अर्थ नाही. पारतंत्र्यात किंवा अराजकाच्या वातावरणात या लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या केवळ कागदी कल्पना राहतात. प्रत्येक माणसाला देश व्यक्तिमत्त्व देतो. त्याला इज्जत देतो, त्याला गौरवाची भावना देतो. कोणत्याही जपानी, जर्मन, इंग्रज, फ्रेंच, रशियन माणसाला देशभक्ती शिकवावी लागत नाही. बालकथांतून, कथा-कादंबऱ्यांपासून ते शेरलॉक होम्सच्या रहस्यकथांतून देशभक्तीचे संस्कार रुजवले जातात.

एडवर्ड हॅले याची ‘देश नसलेला माणूस' ही जगप्रसिद्ध अमेरिकन कथा आहे. कथेचा नायक एक सेनाधिकारी आहे आणि तो कोर्टात म्हणतो की, अमेरिका बरबाद झाली पाहिजे आणि मी अमेरिकेचे तोंड बघू इच्छित नाही. न्यायमूर्ती त्याला मरेपर्यंत अमेरिकेपासून शेकडो मैल दूर नाविकदलाच्या जहाजावर ठेवण्याची शिक्षा देतात. मग देशासाठी तो कसा व्याकूळ व कासावीस होतो, याचे प्रसंगामागून प्रसंग येत जातात आणि ते वाचकांच्या अंगावर येतात.

कलाकार, रचनाकार, प्रतिभावंत लेखक यांच्यामध्ये ही अभिव्यक्तीची ऊर्मी म्हणजे ऊर्जेचा महासागरच असतो. ते आपल्या कलाकृतीतून समाज समृद्ध करतात आणि राष्ट्र कलेच्या दृष्टीने, संस्कृतीच्या दृष्टीने वैभवसंपन्न करत असतात. त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याच प्रकारची आच येता कामा नये, पण जर उद्या कोणी असा एखादा कलाकार मी माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग देशाच्या बरबादीसाठी करीन असे म्हणू लागला तर त्याला शासन करण्यावाचून पर्याय राहत नाही. राष्ट्र म्हणजे एक बोट आहे आणि तिला छिद्र पाडण्याचे स्वातंत्र्य कुणालाही देता येत नाही.
ramesh.patange@gmail.com