आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकर आणि संघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करून अनेक बेलगाम आरोप ठोकलेले आहेत. संघावर टीका करण्याचा त्यांना घटनादत्त अधिकार आहे. परंतु अशी टीका करीत असताना ती अभ्यासपूर्ण असली पाहिजे, तथ्यांचा नीट अभ्यास केलेली असली पाहिजे. अॅड. आंबेडकर गेली अनेक दशके राजकारणात आहेत. बाबासाहेबांनी सांगितले की, 'राजकीय सत्ता हे प्रभावी शस्त्र आहे, या शस्त्रास आपण देवाप्रमाणे मानले पाहिजे, आपण या शस्त्राची पूजा करायला पाहिजे. राजकारणातील माऱ्याच्या जागा काबीज करा, राजकीय सत्ता हस्तगत करा.' प्रकाश आंबेडकर यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे की ते एकही उमेदवार निवडून आणू शकत नाहीत. खुल्या जागेतून खासदार म्हणून ते निवडून येऊ शकत नाहीत.
बाबासाहेबांनी सांगितले की आपली झोपडी शाबूत ठेवा. संघटन करा. अॅड. आंबेडकर यांना महाराष्ट्रातील सर्व दलितांचे संघटनदेखील करता आलेले नाही. हे काम उत्तर प्रदेशात आदरणीय कांशीराम आणि मायावती यांनी करून दाखविले. त्यांनी स्वबळावर उत्तर प्रदेशची सत्ता हस्तगत केली. प्रकाशरावांनी संघावर टीका करायला काही हरकत नाही, त्याने संघाचे काही बिघडत नाही; पण महाराष्ट्रात स्वबळावर सत्तास्थानी कसे जाता येईल आणि बाबासाहेबांचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल, याचा विचार त्यांनी केला पाहिजे.
नागपूरच्या दीक्षाभूमीवरील समारंभाच्या भाषणात पू. बाबासाहेब म्हणाले की, 'काही लोक असे म्हणतात, नागपूरला आरएसएसवाल्यांची मोठी फौज असल्यामुळे नागपूर हे स्थान निवडले आहे. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्याच्या मनोवृत्तीचा मी नाही, आमच्यासमोर उदंड कामे पडली आहेत. नागपूर ही नागभूमी असल्यामुळे तिची निवड केली आहे.' पू. बाबासाहेब संघाला खिजगणतीतही घ्यायला तयार नव्हते. कारण आपल्याला काय करायचे आहे, याचे स्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यापुढे होते. म्हणून नातवानेही स्वच्छ दृष्टी मिळविली पाहिजे.

संघ मनुवादी आहे, संघाला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर घटना बदलायची आहे, संघाने बाबासाहेबांना कधी स्वीकारले नाही, स्त्री-पुरुष समानता संघाला मान्य नाही, हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी समरसता आणि समानता यावर आमने-सामने यावे, असे आव्हानही प्रकाश आंबेडकरांनी ४ एप्रिलला नागपूरच्या भाषणात दिले. प्रकाश आंबेडकर यांची ही सगळी वाक्ये घोर अज्ञानाचे निदर्शक आहेत. माझे "मी, मनू आणि संघ' हे पुस्तक संघात पाठ्यक्रमाचे पुस्तक म्हणून वाचले जाते. आणि त्याची बहुतेक भाषांत भाषांतरे झालेली आहेत. या पुस्तकात मी असंख्य संदर्भ देऊन संघस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून संघाने विषमता कशी नाकारली आहे, मनूचे कायदे कसे नाकारले आहेत, धार्मिक कर्मकांड कसे नाकारले, हे मांडलेले आहे.
सामाजिक प्रश्नावर संघाचे अनेक ठराव आहेत. ते संघाच्या ठरावाच्या पुस्तकात उपलब्ध आहेत. संघाला हिंदुराष्ट्र निर्माण करायचे नाही. हे हिंदू राष्ट्र आहे हा संघाचा पायाभूत सिद्धांत आहे. "बहिष्कृत भारत'च्या २१ डिसेंबर १९२८ च्या अग्रलेखात पू. बाबासाहेब लिहितात, "अत्यंत प्राचीन काळी उदयास आलेल्या राष्ट्रांपैकी हिंदुराष्ट्र हे एक आहे, ही गोष्ट इतकी मशहूर आहे की, तिची कोणाला आठवण करून देण्याचे कारण नाही.' पुढे अग्रलेखात डॉ. बाबासाहेब या हिंदुराष्ट्राचे भयानक पतन जातिभेदामुळे, ब्राह्मणशाहीमुळे कसे झाले, हे सांगतात. त्यांचे Thoughts on Pakistan' हे पुस्तक वाचले तर हे लक्षात येईल की, त्यांनी जे सांगितले ते असे आहे की, मुसलमान आणि हिंदू ही दोन राष्ट्रे या देशात आहेत. आणि मुसलमानांचे हिंदूंपेक्षा सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक वेगळेपण कसे आहे, याचे विवरण केले आहे, परंतु त्यांचा हिंदू राज्यास खूप विरोध होता. कारण हिंदू राज्य म्हणजे ब्राह्मणी राज्य निर्माण होईल आणि ब्राह्मणी राज्य म्हणजे वरिष्ठ जातींचे कनिष्ठ जातींवरील राज्य म्हणून त्यांचा हिंदू राज्यास विरोध होता. संघ चुकूनही हिंदू राज्याची भाषा करीत नाही, यासाठी पूर्वग्रह बाजूला ठेवून संघाचे हिंदुराष्ट्र काय आहे, हे समजवून घेतले पाहिजे.
हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणशाही ही गोष्ट कोणीही स्वीकारणार नाही. बाबासाहेब म्हणतात, "ब्राह्मणशाही या शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वांचा अभाव.' आणि या तीन तत्त्वांसाठीच बाबासाहेब जीवनभर संघर्ष करीत होते. नागपूरच्या भाषणात बाळासाहेब म्हणतात, "ही जनता संघवाल्यांचे मुडदे पाडल्याशिवाय राहाणार नाही.' जनता संघवाल्यांचे मुडदे पाडील की त्यांना डोक्यावर घेईल, हे येणारा काळच सांगेल. पू. बाबासाहेबांची ही भाषा नव्हे. त्यांनी नेहमी वैचारिक लढाईवर भर दिला. माझा लढा कोणा जातीविरुद्ध, कोणा व्यक्तीविरुद्ध नसून विषमता मानणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. ही प्रवृत्ती जशी ब्राह्मण समाजातील काही लोकांत आहे, तशी अन्य जातीतील लोकांतही आहे. त्यांनी आपल्या लढ्याची भाषा संवैधानिक ठेवली. घटना समितीपुढे भाषण करताना ते म्हणाले की, 'आम्हाला संवैधानिक नीतिमत्तेचे पालन केले पाहिजे. असंवैधानिक मार्गाने लढा देता कामा नये. त्या मार्गाने जर आपण गेलो तर देशात अराजक निर्माण होईल. किंवा कम्युनिस्टांचे शासन येईल.' अॅड. आंबेडकर यांना कम्युनिस्टांची जवळीक खूप प्रिय वाटू लागली आहे. पण बाबासाहेब सांगून गेले, "कम्युनिस्टांपासून सावध राहा.' राज्यसभेत १९५४ मध्ये बोलताना ते म्हणाले, "साम्यवाद हा जंगली वणव्यासारखा आहे. वाटेत येणारे सर्व काही तो फस्त करतो.'

एक विषय मात्र अॅड. आंबेडकर फार चांगला मांडतात, तो म्हणजे, 'जातीचा अंत करून सर्वांना भारतीयत्व ही एकच जात असावी.' प्रश्न असा आहे की, हे ध्येय प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग कोणता? प्रकाशभाऊंचे हे वाक्य संघाने शब्दश: व्यवहारात आणले आहे. संघ स्वयंसेवकाला कुठली जात नसते. त्याची ओळख फक्त हिंदू एवढीच असते. मग तो केरळचा असो अथवा पंजाबचा असो, स्वयंसेवकत्व ही त्याची अाेळख असते. हे सगळे समजण्यासाठी संघाचा अनुभव घ्यावा लागतो. टीका करण्यासाठी का होईना अॅड. आंबेडकर यांनी काही महिने संघात जाऊन संघाचा अभ्यास केला पाहिजे.
रमेश पतंगे
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
ramesh.patange@gmail.com
बातम्या आणखी आहेत...