आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramesh Patange Article About Singapore Prime Minister

भारत म्हणजे सिंगापूर नव्हे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू हे वयाच्या ९१ व्या वर्षी वारले. त्यांना आधुनिक सिंगापूरचे जनक असे समजण्यात येते. १९५९ मध्ये जेव्हा ते सिंगापूरचे पंतप्रधान झाले तेव्हा सिंगापूरचे दरडोई उत्पन्न ४०० डॉलर्स होते. २०१३ मध्ये सिंगापूरचे दरडोई उत्पन्न ५५,१८२ डॉलर्स झाले म्हणजे किती पट वाढ झाली याचा वाचकांनीच हिशेब करावा. दैवी शक्ती असणारे काही चमत्कार असतात. त्यावर आपल्याकडचे अंधश्रद्धा निर्मूलनवाले झोड उठवितात; परंतु ली कुआन यू यांनी कोणताही दैवी चमत्कार केलेला नाही. मात्र चमत्कार वाटावा असा बदल सिंगापूर या अत्यंत छोट्या देशात घडवून आणला.

जेव्हा एखादा राजनेता आपल्या देशात असा चमत्कार घडवून आणतो तेव्हा आपल्या देशातही ली कुआन यू सारखा नेता असावा असे वाटू लागते. पत्रपंडित आणि काही राजकीय विश्लेषक तशा प्रकारचे लेखनही करतात आणि आशा व्यक्त करतात की ली कुआन यू सारखा समर्थ, प्रतिभावान आणि परिणाम दाखविणारा नेता आपल्या देशातही निर्माण झाला पाहिजे; परंतु या सर्व लोकांच्या विचारात एक फार मोठी गफलत असते, ती अशी की, एका देशातील नेत्याची दुसर्‍या देशांत नक्कल करता येत नाही. प्रत्येक देशातील प्रत्येक नेता हा त्या देशातील समाज, संस्कृती, धर्म, इतिहास, परंपरा यांचे अपत्य असतो. उदा. रशियात लेनिन, स्टॅलिन ते आता पुतिन हे सर्व हुकूमशहा झाले. अमेरिकेत लोकशाही स्वातंत्र्य, अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिजीवनात राज्याचा कमीतकमी हस्तक्षेप अशी मानसिकता आहे. म्हणून अमेरिकेत लेनिन, स्टॅलिन, पुतिन यांचा जन्म होणे अशक्य आहे.

भारताची परिस्थिती तर जगात कोठेही नसेल अशी आहे. सर्व भारताची एक भाषा नाही. सर्व भारताचा एक पोशाख नाही. सर्व भारताचा एक उपासना मार्ग नाही. सर्व भारताच्या भोजन परंपरा सारख्या नाहीत. एकाच रंगरूपाची माणसे भारतात नाहीत. पंजाबमधील माणूस धिप्पाड आहे, तर बंगालमधील माणूस सडपातळ आहे. काश्मीरमधील माणूस वर्णाने गोरा आहे, तर तामिळनाडूमधील माणूस वर्णाने काळा आहे. अशा देशात कुणालाही ली कुआन यू होता येणार नाही. तसा त्याने चुकून प्रयत्न केला तर तो असा आपटेल की त्याचे सर्व दात घशात जातील. ली कुआन यू हा लोकांनी निवडून दिलेला हुकूमशहा होता. त्याने आपल्या देशात लोकांनी कोठे थुंकावे, कोठे राहावे, आपला शेजारी कोण असावा, वाहने किती असावीत, नोकरी कोठे करावी, भाषा कोणती असावी अशा व्यक्तिजीवनाला स्पर्श करणार्‍या सर्व विषयांत हस्तक्षेप केला आहे. मुंबईइतकेही ज्याचे क्षेत्रफळ नाही अशा एका छोट्या देशात आणि ६० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या देशात असा बळजबरीचा वरवंटा फिरविणे शक्य आहे. भारतासारख्या देशात ते केवळ अशक्य नसून असंभाव्य आहे. भारतीय मानस कसल्याही प्रकारची बळजबरी स्वीकारू शकत नाही. स्वीकारतही नाही. इस्लामी आक्रमकांनी जबरदस्त बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने तर कहर केला. त्याचा परिणाम मुगल साम्राज्य नष्ट होण्यात झाला. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून देशाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षे लोक दबून राहिले आणि संधी मिळताच त्यांनी इंदिरा गांधी यांना दूर केले.

भारतासारख्या देशाला महात्मा गांधी यांच्यासारखा नेता हवा असतो. सर्वकाही करून सर्वांपासून अलिप्त अशी महात्माजी यांची प्रतिमा आहे. त्यांनी राजकारण केले, अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविले, पण सत्तेच्या कोणत्याही पदावर ते गेले नाहीत, ते राजवैभवापासून दूर राहिले. राज्याचा उपभोगशून्य स्वामी हा आपला राज्यकर्त्याचा आदर्श आहे. या आदर्शाचे संस्कार श्रीकृष्ण चरित्राने आणि रामाच्या चरित्राने फार खोलवर झाले आहेत. श्रीकृष्णाने राजकारणात हजारो उचापती केल्या पण तो कोणत्याही राज्याचा राजा नव्हता. राम हा राजा होता पण उपभोगशून्य स्वामी होता. आधुनिक काळात असे आदर्श आपल्या देशात काही झालेले आहेत. त्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे नाव घ्यावे लागते. जनतेने त्यांच्यावर अमर्याद प्रेम केले.

ली कुआन यू यांना सिंगापूरमध्ये आश्चर्यकारक यश मिळाले. याचे एकमेव कारण असे की, ज्या प्रकारचे नेतृत्व त्यांनी दिले ते स्वीकारण्याची मानसिकता पूर्वसंस्कारांनी सिंगापूरमधील मलय आणि चिनी लोकांची झाली. जनतेने त्यांना स्वीकारले आणि त्यांना साथ दिली. भारतासारख्या १२५ कोटी लोकांच्या आणि विविधता असलेल्यांच्या देशात वरून लादवणूक करून चालणार नाही.

ली कुआन यू यांचे काम त्यामानाने फार सोपे होते. कारण त्यांना एका छोट्या देशात आणि एका लहानशा जनसमुदायात परिवर्तन घडवून आणायचे होते. भारतासारख्या देशात हे अवघड काम आहे आणि आतापर्यंतच्या आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी म्हणजे पं. नेहरूंपासून आजच्या मोदींपर्यंत सर्वांनी या कठीण मार्गावर वाटचाल केली आहे. पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंह यांच्या धोरणांबाबत मतभेद असू शकतात; परंतु विविधतेने नटलेल्या या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम त्यांनी केले, हे ऐतिहासिक सत्य नाकारून कसे चालेल? ली कुआन यू यांच्याप्रमाणे हातात हंटर घेऊन ते उभे राहिले नाहीत तर सर्वसमावेशकतेचा राजदंड घेऊन ते उभे राहिले. विविधता ही जशी आपली शक्ती आहे तशी ती विकासाच्या मार्गावरील एक मर्यादादेखील आहे. मर्यादा प्रयत्नाने दूर करता येईल, त्याला वेळ लागेल. काही मूलभूत प्रश्नांसंबंधी सर्व देशात सहमती निर्माण होणे गरजेचे आहे. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी राष्ट्रीय संरक्षण, कायद्याचा आदर, विकास याबाबतीत खूपशा प्रमाणात सहमती निर्माण केली आहे. पुढच्या टप्प्यात ती लोकसहभाग, भ्रष्टाचारमुक्ती, कायद्याचे पालन, अशा विविध बाबतीत प्रयत्नपूर्वक करावी लागेल. कारण भारतात जशी विविधता आहे तशी जगातही आहे. भारतात विविधतेचा आदर केला जातो. जगात विविधतेवरून संघर्ष होतो. सॅम्युअल हंटिंग्टन त्याला 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन' म्हणतो. विविधतेतील एकता शोधून, ती बळकट करून, त्या मार्गाने भारताला जायचे आहे आणि जगापुढे एक आदर्श ठेवायचा आहे. हे आपले जागतिक लक्ष्य ली कुआन यू यांच्या मार्गाने शक्य होणार नाही. म्हणून ली कुआन यू यांचा आदर करावा, अनुकरण करण्याच्या भानगडीत पडू नये.

रमेश पतंगे, राजकीय विश्लेषक
ramesh.patange@gmail.com