आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गांधी’ हा प्रत्येकाच्या आकलनाचा प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधी हे कोणत्याही जाती-जमातीचे नेते नसल्यामुळे गांधीजींवर उलटसुलट लिहिले तरी समाजात अतिशय तिखट प्रतिक्रिया येत नाहीत, अशा आशयाची कविवर्य कुसुमाग्रज यांची एक कविता आहे. आताही काही लेखकांनी गांधी विचारांची खिल्ली उडविल्याचे लक्षात आले. गांधीजींच्या ब्रह्मचर्यासंबंधीच्या कल्पना, रेल्वे, वकील आणि डॉक्टर यांच्यासंबंधीचे हिंद स्वराज्यमध्ये व्यक्त झालेले मत, स्वयंपूर्ण खेड्याविषयीचे मत, आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध किंवा चातुर्वर्ण्य आणि जातीविषयीचे असलेले मत यावर फार तिखटपणे लिहिता येते. प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचे धाडस केले आणि त्यात गांधींवर कठोर टीका केली.

एखाद्या थोर पुरुषाच्या विचारांवर टीका करण्याचा अधिकार जरी मान्य केला तरी त्यामुळे त्या महापुरुषाचे अवमूल्यन तर होत नाहीच, उलट टीका करणाऱ्याची पातळी लक्षात येते. गांधींसारख्या महापुरुषाचे अनेक आयाम असतात. त्या प्रत्येकाशी सहमत होणे किंवा त्याचे अनुसरण करणे हे कठीणच असते. काही गोष्टी कालबाह्य होतात, परंतु अशा कालबाह्य विचारांसाठी त्या महापुरुषाचे स्मरण कुणी करीत नाही. त्याचे स्मरण करताना मनुष्य जातीला उन्नत करणारा कोणता भाव त्याच्या जीवनात प्रकट झाला आहे याच्याकडेच लक्ष द्यावे लागते. गांधीजींच्या योग्यतेचे वर्णन करताना महान वैज्ञानिक आइन्स्टाइन म्हणतात, ‘हाडामांसाचा असा माणूस या अवनीतलावर आला होता यावर भावी पिढ्या कदाचित विश्वासही ठेवणार नाहीत.’ टाइम्स साप्ताहिकाने विसावे शतक संपताना विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ कोण? याचा शोध घेऊन तो मान अल्बर्ट आइन्स्टाइन यांना दिला होता. आइन्स्टाइनच्या वक्तव्याला यासाठी फार मोठे महत्त्व द्यावे लागते.

जेथे पिकते तिथे त्याची किंमत नसते, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. महात्मा गांधी आपल्यातच जन्मले, आपल्यातच वाढले. त्यांची महानता कशात आहे? सर्व शक्तिमान सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य माणसाला निर्भय करून उभे करणे, अन्यायाच्या प्रतिकारासाठी सर्व प्रकारचे आत्मक्लेश सहन करण्याची शक्ती त्याच्यात निर्माण करणे आणि अन्यायाविरुद्धचा लढा अहिंसक मार्गाने चालविणे, ही गांधीजींची सर्वात मोठी शक्ती आहे. यासाठी जग त्यांना वंदन करते. जगात जेथे जेथे अन्याय आहे आणि अन्याय करणारे सर्व शक्तिमान आहेत तेथे तेथे गांधीविचार हा प्रचंड प्रेरणा देणारा ठरतो. नेल्सन मंडेला यांना दक्षिण अाफ्रिकेचे गांधी असे संबोधण्यात येते. दक्षिण अाफ्रिकेत गोऱ्यांचे शासन होते. वंशभेदावर आधारित दक्षिण अाफ्रिकेची शासनपद्धती होती. त्याविरुद्ध अाफ्रिकन नॅशनल काँग्रेसने संघर्ष सुरू केला. शासनाने त्यांना २५ वर्षे तुरुंगात ठेवले. परंतु नेल्सन मंडेला यांना शासन नमवू शकले नाही. महात्मा गांधी हे नेल्सन मंडेला यांचे प्रेरणास्थान होते. गांधीजींच्या महानतेविषयी नेल्सन मंडेला एकदा म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनी नैतिकता, साधेपणा आणि गरिबांविषयी प्रेम याचा जो आदर्श घालून दिलेला आहे त्याच्या जवळपासही मी जाईन की नाही मला माहीत नाही. गांधीजी दुर्बलता नसलेले मानव होते, तर मी अनेक प्रकारच्या दुर्बलता असलेला मानव आहे.’ महात्मा गांधींना नोबेल पारितोषिक दिले गेले नाही, पण या गांधी शिष्याला नोबेल पारितोषिक मिळाले.

गांधी विचारांचा असाच प्रभाव कृष्णवर्णीयांच्या नागरी अधिकारांसाठी अमेरिकेत संघर्ष करणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांच्यावरही आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांना अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना नागरी आणि राजकीय अधिकार मिळवून देणारा महान नेता मानले जाते. ते सत्तेच्या राजकारणापासून दूर राहिले. त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महान लढा म्हणजे माँटगोमेरी बस बहिष्कार सत्याग्रह होय. हा सत्याग्रह १९५६ मध्ये झाला आणि ३८१ दिवस चालला. अमेरिकेत तेव्हा बसेसमध्ये काळयांसाठी वेगळी आसने असत. गोऱ्यांची संख्या जर बसमध्ये अधिक झाली तर काळ्या लोकांना त्यांच्या आसनांवरून उठविले जात असे आणि त्या जागा गोऱ्यांना देण्यात येत असत, याला ‘सग्रिगेशन’ असे म्हटले जाई. अन्यायाविरुद्ध सर्व उभे राहिले. शेवटी न्यायालयाने वेगळेपणाचे सर्व कायदे घटनाबाह्य करण्याचा निर्णय दिला. मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात, ‘आमचा कायद्यावर विश्वास आहे म्हणून उत्तेजित होऊ नका. शस्त्रांचा वापर करू नका. लक्षात ठेवा की, जो शस्त्र वापरतो त्याचाही नाश शस्त्रानेच होतो. देवाचे हेच सांगणे आहे. आपल्याला हिंसेची भलावण करायची नाही. शत्रूवरही आपल्याला प्रेम करायचे आहे. आपण त्यांच्यावर मनापासूनच प्रेम करतो हे त्यांना समजून द्या.’ ही गांधीभाषा आहे. मार्टिन ल्यूथर किंग भारतात येऊन गेलेले आहेत. गांधीजी माझी प्रेरणा आहे हे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. गांधींच्या या शिष्यालादेखील नोबेल पारितोषिक मिळाले.

नोबेलपद विजेते लेक वालेसा हे पोलंडचे नेते होते. पोलंडवर कम्युनिस्टांची म्हणजे रशियाची राजवट होती. १९८९ मध्ये पोलंडमध्ये उठाव झाला. कम्युनिस्ट शासनाविरुद्ध उठाव म्हणजे उठाव करणाऱ्या सर्वांच्या मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. वालेसा यांनी हे धाडस केले. आश्चर्य म्हणजे ते यशस्वी झाले. रशियन साम्राज्याच्या अस्ताला प्रारंभ झाला. गांधीविषयी वालेसा म्हणतात, ‘शस्त्राने कम्युनिझमशी लढत होतो तेव्हा आम्हाला अपयश येत होते, परंतु जेव्हा आम्ही गांधीजींच्या मार्गाने गेलो
तेव्हा विजयश्रीने आमच्या गळ्यात माळ घातली. खरंच सर्व विश्व गांधीजींचे शिष्य झाले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...