आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramesh Patange Article On Babasaheb Ambedkar's Three Speeches

बाबासाहेबांची तीन भाषणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवाहरलाल नेहरू यांच्या मनात विदेशातील सर जेनिंग्स या घटनातज्ज्ञाकडे राज्यघटना तयार करण्याचे काम देण्याचा विचार होता. गांधीजींनी ती सूचना फेटाळून ते काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यास सुचवले. थोर पुरुष आपल्या वृत्ती आणि कृतीने थोर कसे असतात, याचे हे उत्तम उदाहरण. गांधी-आंबेडकर संघर्षाविषयी उदंड लिहिले जाते, परंतु दोन्ही महापुरुषांना एकमेकांची योग्यता पूर्णपणे समजत होती, हे समजून घेतले पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासात २५, २६ नोव्हेंबर १९४९ हे दोन दिवस ऐतिहासिक आहेत. २५ नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी राज्यघटना सभेपुढे सादर केली आणि त्यावर अखेरचे भाषण केले. दुसऱ्या दिवशी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे भाषण होऊन राज्यघटना स्वीकारण्यात आली.

राज्यघटनेचा उद्देश्य ठराव नेहरू यांनी ९ डिसेंबर १९४६ रोजी मांडला. त्यावर अनेक सभासदांची भाषणे झाली. १७ डिसेंबर १९४६ला बाबासाहेबांना भाषण करण्यास सांगण्यात आले. हे पहिले भाषण. उद्देश ठरावानंतर उद्देशिका (प्रिएंबल) तयार झाली. नेहरूंच्या ठरावातील काही उणिवा बाबासाहेबांनी ठळकपणे दाखवल्या. उदा. घटकराज्यांना नेहरूंनी केंद्रापेक्षा अधिक अधिकार दिले होते. बाबासाहेबांना ते मान्य नव्हते. या भाषणात बाबासाहेब म्हणतात, “महोदय, या महान देशाच्या भविष्यकालीन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचनेबद्दल व उज्ज्वल भवितव्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रदेखील शंका नाही. आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विभागलेले आहोत, याची मला जाणीव आहे. आपण एकदुसऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत आणि मी तर यापुढेही जाऊन हेही मान्य करेन की, बहुश: अशाच एका छावणीचा मीही एक नेता आहे. परंतु, हे सर्व खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे की, अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. विभिन्न जाती, संप्रदाय असले तरी आपण एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. आज मुस्लिम लीग भारताच्या फाळणीसाठी प्रयत्नशील असली तरी एकसंध भारतच त्यांच्याहीसाठी हिताचा आहे, असा विचार स्वत: मुस्लिम एक दिवस करायला लागतील हे सांगताना मला जराही संकोच वाटत नाही.”

दुसरे भाषण ४ नोव्हेंबर १९४८ रोजी झाले. पहिले भाषण करताना ते केवळ सभासद होते. दुसरे भाषण करताना ते घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. दुसरे भाषण हे त्यांचे राज्यघटनेविषयी असलेले ज्ञान जसे प्रगट करणारे तसेच देशाच्या दूरगामी भवितव्याविषयी सखोल चिंतन आणि चिंता करणारे आहे. घटनेने अध्यक्षीय पद्धत नाकारून संसदीय पद्धत का स्वीकारली? याचे स्पष्टीकरण त्यात आहे. अध्यक्षीय पद्धती स्थिरता देते, तर संसदीय पद्धती अस्थिरता निर्माण करते. स्थिरता की अस्थिरता याचे त्यांनी दिलेले उत्तर विचार करायला लावते. अमेरिकेत अध्यक्षीय पद्धती यशस्वी झाली, कारण अमेरिकन मतदार हा राजकीयदृष्ट्या जागरूक आणि अतिशय साक्षर आहे. भारतासारखे भावनिक प्रश्न निर्माण करून तेथे निवडणुका जिंकता येत नाहीत. संसदीय पद्धत ही त्यासाठीची सर्वोत्तम पद्धत समजली जाते.

बाबासाहेब आंबेडकर प्रबळ केंद्रीय सत्तेचे समर्थक होते. इतिहासकाळात सर्व भारताला एक ठेवील, अशी प्रबळ केंद्रीय सत्ता नसल्यामुळे देश आधी मुस्लिम आक्रमणाला बळी पडला, नंतर इंग्रजांचा गुलाम झाला. बाबासाहेबांनी या भाषणात सांगितले, “भारत हा राज्यांचा संघ आहे आणि तो अविच्छेदनीय आहे.” दुसऱ्या भाषेत भारत एक आहे आणि त्याचे तुकडे करणे कोणाला शक्य नाही. भारत राजकीयदृष्ट्या एकसंघ राहिला पाहिजे आणि त्यासाठी आपण घटनात्मक नैतिकतेचे पालन केले पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितले, “घटनात्मक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही. तिची जोपासना करावी लागते. अजूनही आपल्या लोकांमध्ये ती निर्माण झालेली नाही, हे आपण समजले पाहिजे.”

आपल्या राज्यघटनेत ‘डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी' असा स्वतंत्र विभाग आहे. आयरिश राज्यघटना सोडली तर जगातील अन्य कोणत्याही राज्यघटनेत तेव्हा असा विभाग नव्हता. या विभागात लोककल्याणासाठी राज्याने काय काय केले पाहिजे, हे सांगितले आहे. मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी न्यायालयात जाऊन करता येते, तशी या कलमाची करता येत नाही. मग ही कलमे बाबासाहेबांनी का आणली? त्याची दोन उत्तरे आहेत. बाबासाहेब हे महान लोकशाहीवादी होते. ‘लोकांच्या जीवनात रक्तपातविरहित मार्गाने क्रांतिकारक बदल जी राज्यव्यवस्था घडवून आणते तिला लोकशाही म्हणतात.' अशी लोकशाहीची व्याख्या त्यांनी केली आहे. लोकांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात बदल घडवून आणणे हे राज्यसंस्थेचे ध्येय असले पाहिजे. संसदीय लोकशाहीत वेगवेगळे पक्ष राज्यावर येतात. त्यांना मन मानेल तसा राज्यकारभार करण्याचे स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलेले नाही. राज्यघटनेच्या निदेशक तत्त्वाप्रमाणे त्यांना धोरणे आखणे भाग असते. नाही तर निवडणुकीत त्यांना लोकांना जाब द्यावा लागतो.
बाबासाहेबांचे २५ नोव्हेंबर १९४९चे अंतिम भाषण हे भारतीय राष्ट्रवादाचे सर्वाेत्कृष्ट भाषण. आपण फंदफितुरीमुळे पारतंत्र्यात कसे गेलो, पुन्हा जायचे नसेल तर पक्ष, पक्षीय विचारसरणीपेक्षा देश मोठा का असतो, राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही का आवश्यक आणि स्वातंत्र्य व समतेबरोबरच बंधुत्वाच्या भावनेचे महत्त्व काय, याचे त्यांनी फार सुंदर विवरण दिले आहे. आम्हाला एक राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर भूगोल सारखा असून चालणार नाही. संस्कृती एक असून चालणार नाही, तर आम्ही सर्व एक आहोत, ही भावना तेवढीच प्रबळ असणे आवश्यक आहे. भारतात लोकशाही नव्हती असे नाही. बाबासाहेबांनी बुद्ध काळात असलेल्या गणराज्यांचा उल्लेख केलेला आहे. ही पद्धती भारतातून लुप्त झाली. ती लुप्त व्हायची नसेल तर आपण व्यक्तिपूजा, घराण्याची पूजा सोडली पाहिजे. देशासाठी कष्ट करणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या व्यक्तींविषयी आदरभाव जरूर असला पाहिजे, कृतज्ञताही असली पाहिजे, पण आपली बुद्धी गहाण ठेवून त्याच्या चरणी शरण जाऊ नये, असे बाबासाहेबांचे सांगणे होते. यासाठी या तिन्ही भाषणांचे मनन, चिंतन राजकीय क्षेत्रातील लोकांनी तर फार केले पाहिजे.
ramesh .patange@gmail.com