आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठीय राजकारणाचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे प्रकरण देशभर गाजत आहे. अशी आत्महत्या काँग्रेसच्या राज्यात झाली असती, तर आता जे काँग्रेसचे नेते करत आहेत तेच काम भाजपने केले असते. यामुळे या विषयाचे राजकारण करू नये, असे आपण कितीही कंठरवाने सांगितले तरी त्याचा परिणाम शून्य होणार आहे. यासाठी ज्यांना राजकारण करायचे त्यांना ते करू द्यावे.

भावनिक दृष्टीने रोहितच्या आत्महत्येकडे बघायचे म्हटले, तर आपल्या घरातील कोणी असा आत्महत्या करून गेला तर त्याचे किती तीव्र दु:ख होते याची अनेकांना अनुभूती आहे. त्यातही मुलगा जर हुशार असेल आणि शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर असेल, तर त्याच्या आत्महत्येचे दु:ख हृदयाला जाऊन भिडते. तो एका गरीब परिवारातील होता. आई शिवणकाम करत होती आणि वडील सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. अशा परिवारात जन्म घेऊन उच्च शिक्षण घेणे हे महाकठीण काम असते. माझा स्वत:चा जन्म अशाच एका शिवणकाम करणाऱ्या परिवारात झाला आणि शिवणकाम करत-करत मी शिकलो. त्यासाठी किती प्रचंड कष्ट उपसावे लागतात याची कल्पना मला आहे. त्यामुळे आपल्याच कर्मकुलातील एक बांधव आपली जीवनयात्रा अशाप्रकारे आकस्मिकपणे संपवतो तेव्हा त्या दु:खाची तीव्र कळ हृदयात उमटते.
रोहितला आत्महत्या करावी लागली ती कारणे मनुष्यनिर्मित आहेत. हेतुत: निर्माण केलेली आहेत. यामुळे या कारणाचे कसल्याही प्रकारचे समर्थन करणे अवघड आहे. आपण जेव्हा सामाजिक न्यायाची चर्चा करतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, मनुष्यनिर्मित सर्व प्रकारचे अन्याय्य कायदे, नियम यापासून व्यक्तीला मोकळे केले पाहिजे. आपले जीवन सुखी करण्याचा मार्ग शोधण्याचा त्याला मूलभूत अधिकार आहे आणि त्या मार्गाने त्याला कोणताही अडथळा निर्माण न होता वाटचाल करता आली पाहिजे. डॉ. बाबासाहेब सांगतात की, व्यक्तिविकासाला मारक असे सर्व सामाजिक, धार्मिक कायदे राज्यसंस्थांनी बदलले पाहिजेत. ते बदलता येत नसतील, तर आमच्या स्वातंत्र्याला अर्थ काय? असा ते प्रश्न करतात.
रोहितच्या संदर्भात जो सामाजिक अन्याय झाला तो म्हणजे त्याची शिष्यवृत्ती सात महिने रोखून धरण्यात आली. वसतिगृहाच्या बाहेर काढण्यात आले. त्याचा गुन्हा कोणता, तर याकूब मेननच्या फाशीचा त्याने निषेध केला. तो आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा सभासद होता. या संस्थेच्या नावात जरी पू. बाबासाहेबांचे नाव असले तरी ही संस्था आंबेडकरी विचारांप्रमाणे चालणारी संस्था होती, असे म्हणता येत नाही. ही संस्था चालवणारे कोण आहेत, सिमीचा यामध्ये किती भाग आहे, कम्युनिस्टांचा किती भाग आहे, या गोष्टी चौकशीतून बाहेर येतील. तरीसुद्धा रोहितने याकूब मेननच्या फाशीचा निषेध करावा की करू नये, हा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. याकूब, कसाब आणि अफझल गुरू यांच्या फाशीचा निषेध करणारी अनेक मंडळी भारतात आहेत. त्यामध्ये अनेक विचारधारा आहेत. एक विचारधारा अशी असते की, कोणत्याही जिवास आपल्याला जन्माला घालता येत नाही, मग त्याला मारण्याचा अधिकारही आपल्याला नाही. ही तात्त्विक आणि उच्च कोटीची मानवतावादी भूमिका आहे; परंतु समाज हा कायद्याने चालतो. कायदे राज्यघटनांच्या कलमांनुसार बनतात. आणि राज्यघटना देशवासीयांच्या सहमतीने बनते. त्यामुळे एखाद्याचे वेगळे मत आहे, हे सहमतीच्या मतापेक्षा वेगळे आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. काहींचा फाशीला विरोध सांप्रदायिक कारणामुळे होता, फाशी जाणारे मुसलमान असल्यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावतात हे त्यामागचे तर्कशास्त्र होते. ते स्वीकारता येत नाही, कारण एकतर सर्व मुसलमानांना आपण दहशतवाद्यांचे समर्थक ठरवून टाकतो आणि ते चूक आहे. आणि दुसरी गोष्ट गुन्हेगाराला जात, धर्म काही नसतो. त्यामुळे त्याचा जातीनिहाय विचार करणे हा सांप्रदायिक विचार झाला, म्हणून तो स्वीकारता येत नाही.
रोहितचे वय पाहता एवढ्या प्रगल्भतेने तो विचार करू शकत असेल, असा त्याच्यावर आरोप करणे धाडसाचे आहे. या वयातील तरुण मुले विचारांपेक्षा भावनाधीन अधिक असतात. आणि अनेक वेळा भावना विचारांवर मात करतात. अशा तरुण मुलांच्या भावना कशा प्रकारचे चेतवायच्या आणि त्यासाठी कोणत्या भाषेचा, उदाहरणांचा उपयोग करायचा, याचेही एक शास्त्र आहे. यात कम्युनिस्ट लोकांना मास्टरची डिग्री मिळाली आहे. आणि मुल्ला-मौलवी यांचे मशिदीतील प्रवचनदेखील युद्धभूमीवर दिल्या जाणाऱ्या भाषणासारखे असते. यामुळे अशा तरुण मुलांच्या न रुचणाऱ्या कृतींकडे वडीलधाऱ्या माणसाने कानाडोळा करायचा असतो, त्याला जवळ घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा असतो, थोडी समज देण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्याच वेळी विद्यार्थी म्हणून तुझे पहिले कर्तव्य अभ्यास करण्याचे आहे, त्यात पारंगत होण्याचे आहे. डॉ. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात जेव्हा गेले तेव्हा तेदेखील तरुणच होते. काही काळ त्यांनी आनंदात घालवलादेखील, पण पुढे तेच लिहितात की, एके दिवशी माझ्या मनात विचार आला की, "मी इथे कशासाठी आलो आहे? माझे जीवनलक्ष्य कोणते आहे आणि मला काय साध्य करायचे आहे? ते गंभीर झाले आणि सर्व मित्रपरिवार सोडून ते ज्ञानसाधना करू लागले.' विद्यापीठात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे हे कर्तव्य आहे की त्याने ज्ञानसाधनेसाठी आपला वेळ खर्च करावा. राजकीय आंदोलनांपासून शक्यतो दूर राहावे. राजकीय नेत्यांपासून चार हात दूर राहणे यात विद्येचेही रक्षण होतेे.
रोहितला मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे. त्याला विद्यापीठातून बाहेर काढण्याचा निर्णय करणाऱ्यांची, त्याची शिष्यवृत्ती बंद करणाऱ्यांची आणि या मागच्या राजकारणाची चौकशी झाली पाहिजे. ती कोणत्याही दडपणाला बळी न करता केली पाहिजे. त्यात जातीय आणि पक्षीय राजकारण आणता कामा नये. समाजानेही घटनेकडे जातीय दृष्टिकोनातून न पाहता, पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता ही मुले आपल्याच समाजाची मुले आहेत आणि त्यांचे दायित्व आपल्यावरच आहे, अशा आत्मीय भावनेने त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे.
ramesh.patange@gmail.com