आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समता आणि समरसता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे १२५ वे जयंती वर्ष आहे. १४ एप्रिल ही जन्मतारीख "समरसता दिवस' म्हणून साजरी करण्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही चर्चा मुख्यत: "समता' की "समरसता' या दोन शब्दांना धरून चालते. अशा चर्चेचे स्वागत केले पाहिजे. संकल्पनांची उलटसुलट चर्चा आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. इस्लामी देशात अशी चर्चा घडू शकत नाही. १७-१८ शतकांपर्यंत युरोपमधील ख्रिश्चन देशांतही विचारस्वातंत्र्यावर अनंत बंधने होती. आपल्याकडे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि व्यक्ती तितकी मते असे मानले गेल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात. चर्चा जेव्हा संकल्पनेच्या अर्थबोधासाठी होतात तेव्हा त्या विधायक होतात. आणि चर्चा जेव्हा काही पूर्वग्रह मनात ठेवून, अज्ञान ठेवून केल्या जातात तेव्हा एक तर त्या निष्फळ होतात किंवा वाईट परिणाम घडवणाऱ्या ठरतात.
राजकीय हेतूने केलेल्या चर्चा अत्यंत निकृष्ट ठरवल्या पाहिजेत आणि वैचारिक क्षेत्रात त्याला कसलीही किंमत देता कामा नये. समतायुक्त समाजजीवनासाठी डॉ. बाबासाहेबांनी जीवनभर संघर्ष केला. "स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही माझ्या जीवनाची तत्त्वत्रयी असून ती मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही, तर माझे गुरू भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून मी ती घेतली आहे,' असे बाबासाहेब म्हणत. पुढे ते म्हणत, स्वातंत्र्य आणि समता यापेक्षा मी बंधुतेला सर्वाधिक महत्त्वाचे स्थान देतो. बंधुभाव हाच धर्म आहे, हा त्यांच्या म्हणण्याचा सारांश असतो. ते म्हणत, निर्भेळ स्वातंत्र्य समतेचा नाश करते आणि निर्भेळ समता स्वातंत्र्याचा नाश करते. समता आणि स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि ते टिकून राहायचे असेल तर समाजात बंधुभावना वाढीस लागली पाहिजे. घटना समितीपुढील अखेरच्या भाषणात ते म्हणाले होते, भारतातील प्रत्येक नागरिकाने परस्परांवर सख्ख्या भावापेक्षा अधिक प्रेम केले पाहिजे. ही बंधुभावनाच आम्हाला एकत्र बांधून ठेवील.
स्वातंत्र्य आणि समता ही कायदा करून देता येते. आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत हक्कात स्वातंत्र्य आणि समता याचा समावेश आहे. राज्यघटनेत समावेश असल्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर काही बंधने आली किंवा व्यक्तीशी समतेचा व्यवहार झाला नाही तर न्यायालयात फिर्याद करून त्याविरुद्ध दाद मागता येते. स्वातंत्र्य व समतेचा अनुभव देणे घटनेने बंधनकारक केले आहे, परंतु राज्यघटनेत बंधुता हा काही मूलभूत अधिकार म्हणून नोंदवला गेला नाही. कारण तो हक्क किंवा अधिकार होऊ शकत नाही. बंधुता ही मानसिक भावना आहे. मनाची एक अवस्था आहे. भावनिकदृष्ट्या मी दुसऱ्याला माझ्यासारखा मानणे हा मानसिक व्यवहार झाला. बंधुतेचा मानसिक व्यवहार जगातील कोणताही कायदा अमलात आणू शकत नाही.
बंधुतेचे दुसरे नाव समरसता असे आहे. स्वातंत्र्य आणि समता याची हमी बंधुता किंवा समरसता देऊ शकते. समरसता आणि बंधुता यांच्यात कुठल्याही प्रकारचे द्वैत नाही आणि कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. डॉ. बाबासाहेबांनी "भगवान गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म' हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथातील (तृतीय खंड) मराठी अनुवादाची दोन वचने समरसतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. भगवान गौतम बुद्धांचे समतेच्या संदर्भात काय म्हणणे आहे, हे सांगताना बाबासाहेब लिहितात, "जाती विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत. जसा दुसरा तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे, या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा.'
वेगळ्या भाषेत सांगायचे तर, भगवान गौतम बुद्ध काय किंवा बाबासाहेब काय, ते मानव धर्म सांगतात. सर्व मानव "मानव' या संदर्भात सारखेच आहेत. त्यांच्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. एवढेच काय, पण जाणीव अथवा चेतना या रूपात सर्व प्राणिमात्रदेखील मनुष्यासारखेच असतात. त्यांनादेखील सुखदु:खाच्या संज्ञा असतात. मनुष्य त्या बोलून व्यक्त करतो, अन्य प्राण्यांना त्या बोलता येत नाहीत. मनुष्यप्राणी श्रेष्ठ असल्यामुळे त्याने सर्वांचा विचार केला पाहिजे. आधुनिक काळात हाच विचार जगन्मान्य झालेला आहे. यासाठी ‘समरसता’ हा शब्द अतिशय योग्य आणि सर्व प्रकारचा भाव व्यक्त करणारा आहे. या शब्दाचा समतेला कसल्याही प्रकारे विरोध असण्याचे काहीही सैद्धांतिक किंवा अन्य हेत्वात्मक कारणही नाही.
आता थोडे समतेच्या अर्थासंबंधी. आधुनिक काळात समतेच्या विचाराच्या दृष्टीने अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील "सर्व माणसे जन्मत: समान आहेत,' या वाक्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व माणसे जन्मत: समान असल्यामुळे असमानता निर्माण करणारे मनुष्यनिर्मित कायदे किंवा धर्माने लादलेले कायदे अवैध ठरतात. कायद्यापुढे सर्व माणसे समान, हा समतेच्या संदर्भातील दुसरा नियम ठरतो. जन्मत: सर्व माणसे समान असली तरीही गुणाने, सामर्थ्याने, क्षमतेने सर्व माणसे समान नसतात. म्हणून एक विरोधाभास तयार होतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी कायद्यापुढे सर्व समान असले तरी असमान लोकांस एकाच प्रकारचा कायदा लागू करता येत नाही. त्यांना वेगळ्या प्रकारची वागणूक द्यावी लागते.
विषम लोकांना विषम वागणूक म्हणजे काय? तर विषम लोकांमध्ये जे क्षमतेने फार अधिक असतील त्यांच्या बरोबरीने विषम लोकांना आणण्यासाठी, विषम लोकांसाठी विशेष प्रकारचे नियम किंवा योजना कराव्या लागतील. दुसऱ्या भाषेत सकारात्मक भेदभाव करावा लागेल. आपल्या राज्यघटनेने त्याला अनुमती दिलेली आहे. सामाजिक न्यायाचा विचार करता ते न्यायसंगत आहे. म्हणून समता निर्माण करण्यासाठी क्षमतावान लोकांसाठी आणि तुलनेने दुर्बळ असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम करावे लागतात.
सर्व समाज माझा आहे, समाजातील सर्व माझे आत्मीय, स्वकीय आहेत ही भावना जर सर्वांच्या मनात निर्माण झाली तर समाजातील दुर्बल घटकांसाठी वेगळे नियम आणि वेगळ्या व्यवस्था का करायच्या, हे समजायला अवघड जाणार नाही. त्यासाठी सर्व समाजाविषयीचा समरस भाव मनात असावा. यासाठी समरसभाव निर्मितीचा प्रयत्न सातत्याने सर्व स्तरांवर करीत राहणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचा जन्मदिवस "समरसता दिवस' घोषित करून केंद्र सरकारने एक योग्य पाऊल टाकले आहे, असे म्हणावे लागेल.

लेखक राजकीय अभ्यासक आहेत.
ramesh.patange@gmail.com
बातम्या आणखी आहेत...