आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ आणि गोव्यातील बंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघात जे बंडखोरी करतात ते अनादरास पात्र होत नाहीत. त्यांची थट्टामस्करी कुणी करीत नाहीत, त्यांचा अवमानही कुणी करीत नाहीत. लक्ष्य एक, पण वाटा वेगळ्या होतात. संघात राहून वेगळी चूल मांडता येत नाही, कारण संघटनशास्त्राप्रमाणे संघटनेला एका बंदिस्त चौकटीत स्वत:ला बांधून घ्यावे लागते.
गोव्यातील काही संघकार्यकर्त्यांचे बंड संघस्वयंसेवकांच्या दृष्टीने धक्कादायक, तर संघसहानुभूतदारांच्या दृष्टीने अनपेक्षित आणि संघशत्रूंच्या दृष्टीने आनंदाच्या उकळ्या फुटणारे ठरले आहे. साधारणत: समाजाचा असा समज होता की संघात कधी मतभेद होत नाहीत आणि त्यामुळे वादाची वादळे निर्माण होत नाहीत, संघ ही अभंग संघटना आहे. गोव्यातील संघवादळाने या समजालाही धक्का बसला आहे.

परंतु संघात ज्यांची हयात गेली आहे, त्यांना संघातील वादळे, बंड यांची चांगलीच कल्पना असते. त्यांना गोव्यातील घटनेने दु:ख जरूर झाले आहे, पण धक्का वगैरे काही बसलेला नाही. पहिली संघबंदी उठल्यानंतर “आता संघाची आवश्यकता काय? संघाचा राजकीय पक्ष का करू नये?’ अशा अनेक प्रश्नांवर वादळ झाले. संघाने सामाजिक प्रश्न हातात घेऊन प्रकल्पात काम करावे, असेही अनेकांचे म्हणणे होते. पुण्याचे अप्पा पेंडसे, मुंबईचे दी. वि. गोखले, म्हैसाळ प्रकल्प उभा करणारे देवल अशी काही नावे सांगता येतात. त्यांनी संघ विचार सोडला नाही. पण संघमार्ग सोडला. १९५० च्या दशकात दिल्लीतही समांतर संघ सुरू करण्याचा प्रयास झाला. त्याचीच पुनरावृत्ती गोव्यात सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

बंड करणारे संघ स्वयंसेवकच असतात आणि पुढेही ते स्वयंसेवकच राहतात, कारण संघ स्वयंसेवकत्त्व ही जीवननिष्ठा आहे, तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. यामुळे संघात जे बंडखोरी करतात ते अनादरास पात्र होत नाहीत. त्यांची थट्टा-मस्करी कुणी करीत नाहीत, त्यांचा अवमानही कुणी करीत नाहीत. लक्ष्य एक पण वाटा वेगळ्या होतात, संघात राहून वेगळी चूल मांडता येत नाही, कारण संघटनशास्त्राप्रमाणे संघटनेला एका बंदिस्त चौकटीत स्वत:ला बांधून घ्यावे लागते. एका पद्धतीत आणि निश्चित अशा संकेतांच्या मर्यादेतच संघातील स्वयंसेवकांना काम करावे लागते. सुभाष वेलिंगकर यांनी या मर्यादांचे आणि संकेतांचे उल्लंघन केले.
ते गोवा विभागाचे संघचालक होते. संघातील संघचालकांचे काम सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे, स्वयंसेवकांत कलह निर्माण होऊ देण्याचे, पारिवारिक संस्थात उत्तम समन्वय साधण्याचे असते. संस्था, व्यक्ती, कार्यक्रम कशातही गुंतता केवळ राष्ट्रहिताचा, समाजहिताचा विचार संघचालकांना करावा लागतो. आईची ममता, पित्याचे उत्तरदायित्व आणि गुरूचे मार्गदर्शन हा त्रिवेणी संगम म्हणजे संघचालक. सुभाष वेलिंगकर यांना हे माहीत नाही, असे नाही. हाच विषय पण आपल्या भाषेत त्यांनी बौद्धिक वर्गातून अनेकवार मांडलेलाही असेल.

गोव्यात मराठी कोकणी भाषा बचावाचे आंदोलन चालू आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनुदान बंद करून कोकणी आणि मराठी माध्यमांच्याच शाळांसाठी अनुदान द्यावे, असा आंदोलकांचा आग्रह आहे. संघ विचारधारेच्या मंडळींनीच हे आंदोलन सुरू केले. संघाचा त्याला पाठिंबा प्रारंभापासून राहिला. गोव्यात भाजपचे शासन आहे. सत्ताधारी पक्षातही संघाचे स्वयंसेवक आहेत. सत्ताधारी पक्षाला निर्णय करताना निर्णयाचे राजकीय परिणाम, कायदेशीर परिणाम आणि निवडणुकीतील नफ्या-तोट्याचा विचार करावा लागतो. आंदोलन करताना भूमिका ताठरपणे मांडावी लागते, परंतु मार्ग काढताना काही ना काही समझौता करावा लागतो. मध्यममार्ग काढावा लागतो. तुम्हीही जिंकलात आम्ही जिंकलो अशी परिस्थिती निर्माण करावी लागते.

ज्या आंदोलनात संघाचे स्वयंसेवक उतरले आहेत त्या आंदोलनात संघचालकांना टोकाची भूमिका घेता येत नाही. गोवा विभागाचे संघचालक म्हणून सुभाष वेलिंगकर यांना भाजपच्या अडचणीदेखील समजून घेणे आवश्यक होते आणि भाषासुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांची आग्रहाची भूमिकाही समजून घेणे आवश्यक होते. भाजपला समजून घेणे आणि आंदोलकांची समजूत काढण्याऐवजी वेलिंगकर वादाच्या गटातील एका फळीचे नेते झाले. संघमर्यादा आणि संकेताचे उल्लंघन केले म्हणून त्यांना संघचालक पदावरून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना मान्य झाला नाही आणि गोवा विभाग कोकण प्रांताचा भाग राहणार नाही, तिथला संघ स्वतंत्र असा त्यांनी निर्णय घेतला आहे.

गोव्यातील पहिल्या पिढीतील ते संघकार्यकर्ते असल्याने, त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांत परम आदराची भावना आहे. म्हणून अनेक संघकार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. भाषा बचाव मंच निवडणूक लढवणार आहे, संघशक्तीत यामुळे उभी फूट पडून त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. तात्कालिक आंदोलनात उतरण्याचा संघाचा इतिहास आहे. संघपदाधिकारी आंदोलनात अलिप्त असतात. पण सामान्य स्वयंसेवकांनी आंदोलनात उतरण्यास संघाची हरकत नसते. संघ कामाचे लक्ष्य समाज संघटित करून निर्दोष आणि वैभवसंपन्न करण्याचे आहे, संघ या संस्थेला मोठे करण्याचे नाही. कुणी बंड केल्यास नुकसान समाजाचेच होणार आहे. संघ या संस्थेचे नाही. आज गोव्यात भावनेने सारासार विचारांवर मात केल्याचे दिसते, परंतु भावनेचा भर ओसरल्यानंतर आपण जे केले त्याने आपल्याच पायावर धोंडा मारून तर घेतला नाही ना? असा प्रश्न गोव्यातील कार्यकर्त्यांना पडेल. तोपर्यंत संघ वाट पाहील. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी स्थिती असल्यानं, दाताखाली ओठ आल्यानं कुणी दात पाडून घेत नाही. वेदना सहन करावी लागते.
(ramesh.patange@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...