आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या जगण्याचा भाष्यकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलविन टॉफलर यांचे गेल्या २७ जून रोजी अमेरिकेत निधन झाले. जागतिक विचारवंतांच्या पहिल्या दहा नावांत ज्यांचे नाव घ्यायला पाहिजे तेवढ्या योग्यतेचा हा माणूस होता. तीन महत्त्वाची पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. दि थर्ड वेव्ह, फ्यूचर शाॅक आणि पाॅवर शिफ्ट. प्रचंड अध्ययन आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक-तंत्रज्ञान, धर्मविचार यांचे मार्मिक विश्लेषण करून लिहिलेली ही पुस्तके. या तिन्ही पुस्तकांत त्यांनी एकविसाव्या शतकात जग कसे असेल? जगाची अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था कशी असेल? यांचे थक्क करणारे विवेचन केले आहे. त्यांच्या नावामागे भविष्यवेत्ता ही बिरुदावली वापरली जाते. आश्चर्य म्हणजे त्यांची भौतिक भविष्यवाणी खरी ठरली आहे. १९७० मध्ये त्यांनी भाकीत केले की, “भविष्यकाळ फार वेगाने पुढे येत आहे आणि अल्पकाळात प्रचंड बदलाला आपल्याला सामोरे जावे लागेल.’ याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

त्यांना असे सांगायचे आहे की, मानवी संस्कृतीच्या इतिहासात मूलगामी बदल करणाऱ्या दोन क्रांती झाल्या. पहिली कृषीचा शोध आणि कृषी व्यवस्थेवर आधारित सामाजिक आणि राजकीय रचनेची. दुसरी औद्योगिक क्रांती. कृषी क्रांती दहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. ती स्थिर व्हायला हजारो वर्षांचा कालावधी गेला. सगळे मानवी जीवन आणि मनुष्याचे व समाजाचे मानसशास्त्र या व्यवस्थेशी जोडले गेले. औद्योगिक क्रांती तीनशे वर्षे टिकली. यामुळे जगात उलथापालथ झाली. मोठमोठ्या शहरांचा विकास, मास प्रॉडक्शन, मास एज्युकेशन, उद्योगासाठीच्या कच्च्या मालावर ताबा मिळवण्यासाठी वसाहतवाद, त्यातून सत्तास्पर्धा, त्यातून युद्धे ही स्थिती निर्माण झाली. व्यक्ती आणि समाजाने या क्रांतीशीही जुळवून घेतले. पांढरपेशा वर्ग, श्रमिक वर्ग निर्माण झाले. कामाचे तास ठरले, तासाचा मोबदला निश्चित झाला. त्याला धरून जीवनाची रचना सुरू झाली.
आता जो बदल येऊ घातला आहे तो दोनशे वर्षांनंतर येणारा भविष्यकाळ उद्या आपल्या दाराशी येऊन ठेवणार आहे हे टॉफलर १९७०-८० मध्येच सांगतात. त्यांनी सांगितले की, या कालखंडात परिवार विच्छिन्न होतील. औद्योगिक क्रांतीच्या उद्योगाला जबरदस्त धक्के बसतील. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला धक्के बसतील. याचा परिणाम म्हणून आमच्या राजकीय व्यवस्थेला धक्के बसतील. आमच्या मूल्यव्यवस्था ढासळायला लागतील. शिक्षणाचे संदर्भ बदलतील. आज आपण काय अनुभवतो? पदव्यांच्या भेंडोळ्यांना नोकरीच्या बाजारपेठेत काही किंमत नसते. आज लोक विचारणार, तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे? कॉम्प्युटरची कोणती भाषा तुम्हाला येते? बीए, बी.एस्सी. याला काही अर्थ राहिला नाही. टॉफलरने याचे भाकीत ४५ वर्षांपूर्वी केले. टॉफलर म्हणतात, “स्थिर सामाजिक जीवनासाठी एक स्थिर चौकट लागते. औद्योगिक समाजात नोकरी कायमस्वरूपी, उत्पन्नाची निश्चिती, एकाच प्रकारचे काम करत राहण्याची सतत सवय, वरून ज्या आज्ञा येतील त्यांचे पालन करण्याची शिस्त आणि या सर्वांना धरून समाजाची रचना झाली. याला येणारी तिसरी लाट हा जबरदस्त धक्का देणारी ठरणार आहे. या तिसऱ्या लाटेसाठी त्यांनी “सुपर इंडस्ट्रियल सोसायटी’ या शब्दावलीचा वापर केला आहे. १९८० मध्ये त्यांनी सांगितले की, आपल्याला इंटरनेटच्या जमान्यात जायचे आहे आणि या जमान्यात पांढरपेशा नोकऱ्या, श्रमिक नोकऱ्यांचे प्रमाण कमी राहणार. ज्ञानाधारित काम करणाऱ्यांची मागणी वाढत जाणार.’
‘वापरा आणि फेकून द्या’ या संस्कृतीत आपण जगतो आहे. मोठ्या शहरांतून आता वस्तूंची दीर्घकालीन उपयुक्तता लक्षात घेतली जात नाही. सात-आठ वर्षांत घरातील फर्निचर बदलले जाते. कशात भावनिक गुंतवणूक नाही. टॉफलर यांनी भाकीत केले होते की, एकविसाव्या शतकात सिंगल मदर ही संकल्पना येईल. मुलांच्या संगोपनात खूप वेळ जातो म्हणून परिवार या संकल्पनेलाच धक्का बसेल. मुले सांभाळणारी केंद्रे निघतील. मोठ्या शहरांत त्याचे गोंडस नाव पाळणाघर असे आहे. कुठल्याही प्रकारचे स्थैर्य राहणार नाही. नोकऱ्या पटापट बदलल्या जातील. संस्थेशी बांधिलकी राहणार नाही. पाॅवरशिफ्ट या त्यांच्या तिसऱ्या पुस्तकात त्यांनी सत्ता विविध केंद्रांमध्ये विभागली जाईल, अशी मांडणी केली. हिंसा, संपत्ती आणि ज्ञान हे सत्तेचे तीन आधार असतात. येणाऱ्या काळात वेगवेगळ्या देशांत अराजकीय गट सत्ता आपल्या हाती घेण्याचे काम करतील. दक्षिण अमेरिकेतील देशांत आज ड्रग माफिया प्रतिसरकार झालेले असतात. भारतातही बाहुबली राजकारणी राज्यविरहित सत्ताकेंद्रे असतात आणि जगभरच्या सर्व दहशतवादी संघटना राज्यविरहित सत्ताकेंद्रे असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान याची प्रगती थांबण्याचे काही नाव नाही. आपण जरी म्हणत असलो की, आमची राज्यघटना सार्वभौम, जनता सार्वभौम आहे; पण वास्तवातील सार्वभौमत्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे असते. ते आपले सर्व जीवन नियंत्रित करत चालले आहे. या सर्वांचा अभ्यास करून आमची समाजरचना, आमचे समाजजीवन, आमचे कौटुंबिक जीवन यावर कसे आघात होत आहेत हे जाणले पाहिजे आणि या महापुरात आपल्याला काय सोडले पाहिजे आणि काय ठेवले पाहिजे याचाही विचार केला पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...