आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचे प्रश्न व न्यायालयाचा हस्तक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 दिवाळीचा धार्मिकतेशी संबंध असेल तर तो दीपोत्सवाशी. आपली संस्कृती तमसोमा ज्योर्तिगमयाची आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे हा आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे. म्हणून दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असतो.

सर्वाेच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबरला दिल्लीत फटाके विक्री बंदीचा आदेश दिला आहे. याचे कारण देताना दिवाळीतील फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण प्रचंड प्रमाणात होते, लोकांच्या आरोग्यावर त्याचे अत्यंत अनिष्ट परिणाम होतात, असे सांगण्यात आले. सर्वाेच्च न्यायालयाच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सर्वात तिखट प्रतिक्रिया हिंदू संघटना आणि त्यांच्या नेत्यांच्या आहेत. त्यांचा पहिला प्रश्न असा की, नेहमी हिंदू सणांनाच लक्ष्य का केले जाते? बकरी ईद आणि मोहरमच्या सणांमध्ये प्रदूषण होत नाही का? त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी तर प्रश्न उपस्थित केला की, प्रदूषण होते म्हणून हिंदूंच्या शवदहनासदेखील प्रतिबंध करणार का? उद्या कोणी दिवाळीतील पणत्यांमुळे प्रदूषण होते, अशी तक्रार केल्यास पणत्या जाळण्यास बंदी घालणार का? या प्रतिक्रिया तशा फार बोलक्या आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर तिखट प्रतिक्रिया देणाऱ्या आहेत. 

दुसरी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी लोकांची आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की, दिवाळीतील फटाक्यांच्या धुरामुळे श्वसन आणि त्वचेच्या रोगात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. श्री गंगाराम हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणतात, उघड्या जागेत फटाके फोडल्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात १२ ते २५ टक्क्यांनी वाढ होते. दिवाळीच्या काळात दिल्लीत धुके खूप असते. वाऱ्याची गती मंद असते. पंजाबातीत शेतकरी तृण जाळून टाकतात त्याचा धूर दिल्लीत येतो. डॉ. पुनीत खन्ना हे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, दिल्लीचे डॉक्टर आहेत. ते म्हणतात, (यातील भाषा तांत्रिक आहे.) अल्ट्रा लाइन पीएम २.५ याची घनीभूत मर्यादा १,००० यूजी/एम ३ एवढी दिवाळीत होते. म्हणजे १७ पट वाढ होते. ही पातळी पहाटेच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी सर्वात जास्त. सकाळी चालण्याचे व्यायाम करणारे शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध हे या टॉक्सिक धुक्याचे शिकार बनत असतात. यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने फटाक्यांच्या बंदीवर विक्री करून एक चांगले पाऊल उचलले आहे, असे या सर्वांचे म्हणणे आहे. 

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रातदेखील फटाके बंदीची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राच्या स्वभावाप्रमाणे या चर्चेत पर्यावरणाचा विषय कमी आणि राजकारणाचाच विषय अधिक झाला. शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यात एकवाक्यता राहिली नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत ‘मग आता फटाके व्हॉट्सअॅपवर फोडायचे का?’ या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात फटाके बंदी होणार नाही, हे हा लेख लिहीपर्यंत निश्चित झालेले होते. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने पर्यावरण या विषयावर खूप चर्चा चालू आहे. या चर्चेला उत्तर देताना अनेक जणांनी तसेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास केवळ फटाके फोडल्याने होतो का? ३६५ दिवस रस्त्यावरून डिझेल-पेट्रोलच्या गाड्या धावत असतात. डिझेलवर धावणारी रेल्वे इंजिन्स आहेत. ती प्रचंड धूर ओकत असतात. मुंबईत दर पाच मिनिटाला एक विमान उतरते आणि दुसरे हवेत जाते. विमान हे सर्वाधिक इंधन खाणारे प्रवासी वाहन आहे. प्रदूषण वाढते म्हणून यापैकी कशावर बंदी घालणार? असा तिरकस प्रश्न देखील विचारला गेलेला आहे. 

पर्यावरणाची चर्चा अतिशय महत्त्वाची आहे, आणि ती दिवाळीच्या फटाक्यांशी जोडून झाली नसती तर बरे झाले असते. फ्रित्झोफ काप्रा हे जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आहेत आणि त्यांची तीन पुस्तके जगात अत्यंत गाजलेली आहेत. टाओ ऑफ फिजिक्स, टर्निंग पॉइंट आणि वेब ऑफ लाइफ. त्यांचे असे स्पष्ट मत आहे की, मनुष्य जातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने पर्यावरणाचा प्रश्न हा अणुयुद्धापेक्षादेखील अतिशय गंभीर प्रश्न आहे. सर्व विश्व एक असून त्याचा तुकड्या-तुकड्यात विचार करता येत नाही. परस्पर संलग्नता हा विश्वाचा शाश्वत नियम आहे. हे त्यांनी शास्त्रीय आधाराने मांडलेले आहे. पर्यावरणाचा प्रश्न असा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. 

याचबरोबर दुसरा प्रश्न या निकालाने पुढे आणलेला आहे आणि त्याची फारशी चर्चा कोणी करीत नाही. फटाके फोडावे किंवा फोडू नये हे सांगणे सर्वाेच्च न्यायालयाचे काम आहे का? हे काम प्रशासनाचे आणि प्रशासनाच्या विविध खात्यांचे आहे. पर्यावरण खात्याचे आहे. जे काम कार्यकारी मंडळाचे आहे, ते काम सर्वाेच्च न्यायालयाने हाती घेण्याचे कारण काय, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या अनेक वर्षांत कार्यकारी विषय सूचीत न्यायालयाचे हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढत चालले आहेत. माझ्या मते लोकशाहीला हा गंभीर धोका आहे. सर्व प्रकारच्या एकाधिकारशाहीत न्यायालयाची एकाधिकारशाही सर्वाधिक वाईट असते. कारण या  एकाधिकारशाहीविरुद्ध कोणालाही कसलीही फिर्याद करता येत नाही. त्याची चर्चा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी करायला पाहिजे. 

सर्वाेच्च न्यायालयाचा फटाक्यांसंबंधीचा निर्णय शंभरातील ९५ लोकांना आवडलेला नाही. याचा अर्थ लोकांना आवडणारे निर्णय न्यायालयाने करावे असा करता कामा नये. परंतु ज्यात धर्मभावना, सणांचा आनंद, लहान मुलांचा आनंद, पारिवारिक आनंद गुंतलेला आहे, अशा विषयात न्यायाधीश कितीही विद्वान असले तरी ते तडकाफडकी निर्णय कसे घेऊ शकतात? निर्णय करताना ज्या फटाके व्यावसायिकांनी करोडो रुपये त्यात गुंतवलेले आहेत त्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार? ते दिले नाही तर काही जण जीवनातून उठतील. त्याला जबाबदार कोण? अशा सर्व प्रश्नांचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय १ नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री बंदी करण्यासाठी आहे. काहींनी त्याचा अर्थ विक्रीवर बंदी आहे, फटाके फोडण्यावर नाही असा केला आहे. असा जर त्याचा अर्थ झाला तर लोक काळ्या बाजारातून फटाके विकत घेतील आणि ते फोडतील. आणि असे फटाके फोडले गेले तर ज्या पर्यावरणाच्या हेतूसाठी फटाक्यांवर बंदी घातली आहे, तो हेतू काही सफल होणार नाही. 

हा निर्णय काही जणांनी हिंदू धर्माशी नेऊन जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ते योग्य नाही, हे या ठिकाणी नमूद केले पाहिजे. दिवाळीच्या सणामागे धार्मिक परंपरा आहेत, हे खरे. काही कथा आहेत आणि त्यांना दीर्घ इतिहास आहे. जेव्हा बंदुकीच्या दारूचा शोध लागला आणि नंतर त्यातून आजचे फटाके निर्माण होऊ लागले तेव्हा ते दिवाळीत फोडण्याचा रिवाज सुरू झाला. लोकसंस्कृतीतून सण आणि उत्सवाला वेगळे स्वरूप दिले जाते. फटाक्यांचा आणि धार्मिकतेचा तसा काही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिर्की फटाका उत्पादकांची याचिका फेटाळताना म्हणतात, ‘आमच्या आदेशाला काही जण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात, याचे दुःख होते. मला जे ओळखतात त्यांना हे माहीत आहे की, अशा बाबतीत मी फारच धार्मिक असतो.’’ 

दिवाळीचा धार्मिकतेशी संबंध असेल तर तो दीपोत्सवाशी. आपली संस्कृती तमसोमा ज्योतिर्गमयाची आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे हा आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे. म्हणून दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असतो. ज्ञानदेव माउलींच्या शब्दात, दिवाळी म्हणजे काय?
मी अविवेकाची काजळी।
फाडूनि विवेकदीप उजळी।
ते योगिया पाहे, दिवाळी। निरंतर॥
मनातील अविवेकाचा अंधकार दूर करून विवेकाचा दीप लावणे हीच खरी दिवाळी!

- रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...