आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या नेत्यांची पहिली राजकीय परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर हे तिन्ही नेते २०१५ नंतर उदयास आलेले आहेत. ते तरुण आहेत आणि त्यांच्यामागे त्यांचा समाज आहे. हा सर्व अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. तो भाजपच्या विरोधात जाईल का? याविषयी निश्चितपणे सांगणे कुणालाच शक्य नाही. याचे कारण असे की, या तिन्ही तरुण नेत्यांची निवडणूक परीक्षा यापूर्वी झालेली नाही. निवडणुकीच्या परीक्षेला ते पहिल्यांदाच बसत आहेत. सभा आणि मोर्चासाठी लोक गोळा करणे ही गोष्ट वेगळी असते आणि मतदानाच्या दिवशी बूथवर लोकांना आणून आपल्याला हवे त्यास मतदान करण्यास त्यांना प्रवृत्त करणे ही गोष्ट वेगळी आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. ९ आणि १० डिसेंबर रोजी मतदान होईल आणि १८ डिसेंबरला निकाल जाहीर होतील. गेली सुमारे वीस वर्षे गुजरातमध्ये भाजपचे शासन आहे. १९८० पासून काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. काँग्रेस आणि महात्मा गांधी हे अविभाज्य समीकरण आहे. महात्मा गांधींचा गुजरात असे म्हटले जाते. या गुजरातमध्ये वीस वर्षे मतदारांनी काँग्रेसला दूर ठेवलेले आहे. हा राजकीय शेरेबाजीपेक्षा गंभीर राजकीय चिंतनाचा विषय आहे. या निवडणुकीत गेल्या वीस वर्षांतील अपयश काँग्रेस धुऊन काढणार का? गुजरातची सत्ता मिळवणार का? असे प्रश्न स्वाभाविकपणे पडतात.  

आपल्याकडच्या निवडणुकांच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य आहे. दीर्घकाळ एखादा पक्ष सत्तेवर राहिला की त्याच्याविरुद्ध आपोआप जनमत तयार होत जाते. इंग्रजीत त्याला ‘अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर’ म्हणतात. गुजरातमध्ये अशी अँटी इन्कम्बन्सी आहे का? काही राजकीय विश्लेषक म्हणतात आहे, तर काहींचे म्हणणे आहे की, असे मुळीच नाही. आहे असे म्हणणाऱ्यांचे म्हणणे असे की, हार्दिक पटेल याच्या नेतृत्वाखाली पटेल समाज आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम उभा आहे. पटेल समाज भाजपच्या विरोधात जाईल, कारण भाजपने त्यांना आरक्षण दिलेले नाही. १०% देण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने
 त्याला चाप लावला.  
 
 
ओबीसी हा दुसरा मोठा वर्ग गुजरातमध्ये आहे, त्याचे नेतृत्व अल्पेश ठाकोर करतो. अल्पेश ठाकोर याने पटेल समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका घेतली. आमच्यातील आरक्षण पटेल समाजाला देता कामा नये, अशी त्याची भूमिका आहे. गुजरातमध्ये तिसरा गट दलितांचा आहे. त्यांचे नेते आहेत जिग्नेश मेवानी. दलित समाज प्रारंभापासूनच भाजपचा फार मोठा समर्थक नाही. त्यानेही दलितांवरील अन्यायाचा विषय घेऊन भाजपविरुद्ध आघाडी उघडलेली आहे.  
हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर हे तिन्ही नेते २०१५ नंतर उदयास आलेले आहेत. ते तरुण आहेत आणि त्यांच्या मागे त्यांचा समाज आहे. हा सर्व अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. तो भाजपच्या विरोधात जाईल का? याविषयी निश्चितपणे सांगणे कुणालाच शक्य नाही. याचे कारण असे की, या तिन्ही तरुण नेत्यांची निवडणूक परीक्षा यापूर्वी झालेली नाही. निवडणुकीच्या परीक्षेला ते पहिल्यांदाच बसत आहेत. सभा आणि मोर्चासाठी लोक गोळा करणे ही गोष्ट वेगळी असते आणि मतदानाच्या दिवशी बूथवर लोकांना आणून आपल्याला हवे त्यास मतदान करण्यास त्यांना प्रवृत्त करणे ही गोष्ट वेगळी आहे. हार्दिक, जिग्नेश, अल्पेश हे करू शकतात का? उत्तरासाठी आपल्याला १८ डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागेल.  

गुजरातमध्ये काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगली कामगिरी करायची असेल तर गुजरातमध्ये काँग्रेसला लक्षणीय यश मिळवावे लागेल. एका अर्थाने गुजरातची निवडणूक राहुल गांधींच्या नेतृत्वाची कसोटीदेखील आहे. डिसेंबरमध्ये त्यांच्याकडे काँग्रेसचा अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची चर्चा चालू आहे. त्यांना लक्षणीय विजय मिळाला तर काँग्रेसच्या पुनरुत्थानाचा मार्ग थोडा सुकर होईल. २०१९ च्या निवडणुका काँग्रेसला अन्य पक्षांना मदतीला घेऊन लढाव्या लागतील. त्यासाठी काँग्रेसकडे चांगले नेतृत्व हवे. राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची मुख्य कसोटी निवडून आणण्याची त्याची क्षमता किती हीच असते. राहुल गांधींना आपली क्षमता यापूर्वी सिद्ध करता आलेली नाही. गुजरात त्यांच्यापुढे आव्हान आहे.  

हे आव्हान सोपे नाही. पटेल, ओबीसी आणि दलित हे तीन गट प्रसिद्धी माध्यमांतून तरी भाजपविरोधात आहेत असे दिसते, परंतु या तिघांचे हितसंबंध समान नाहीत. ओबीसी पटेलांविरुद्ध आहेत. आपल्या आरक्षणात पटेलांना घुसू द्यायचे नाही, हे त्यांचे धोरण आहे. दलित आणि पटेल परंपरागत एकमेकांचे विरोधक आहेत, ते एकमेकांबरोबर येऊ शकत नाहीत. दलितांवर अत्याचार करणारे ब्राह्मण नसतात. त्या-त्या राज्यांतील राजकीयदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या बलवान असलेल्या जातीच दलितांवर अत्याचार करतात, हे सामाजिक वास्तव असल्यामुळे सर्वांचे मिळून राजकीय हितसंबंध समान करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंग सोलंकी यांनी हा चमत्कार करून दाखवला होता. त्यांनी क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम (याला खाम सिद्धांत म्हणतात) यांना एकत्र करून गुजरातच्या निवडणुका १९७८ मध्ये जिंकल्या आणि १५० जागा मिळवल्या. हा उच्चांक आहे. तो भाजपलादेखील मोडता आलेला नाही. म्हणून भाजप आता १५१ जागांची भाषा करत आहे. राहुल गांधी हे जातीय समीकरण कसे बसवणार? ते पटेलांची राखीव जागांची मागणी मान्य करतील का? आणि समजा जर त्यांनी ती मागणी मान्य केली तर अल्पेश ठाकोर कोणती भूमिका घेतील?  

ग़ुजरातमध्ये भाजप सातत्याने सत्तेवर येत गेली याचे कारण भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण आहे. हिंदुत्वाच्या राजकारणात मुसलमानांचा अनुनय बसत नाही. त्यांना सोयी-सवलती देणे बसत नाही, पाकिस्तानविषयी फार कडवी भूमिका घ्यावी लागते. नरेंद्र मोदी यांनी २००७ च्या निवडणुकीत मियाँ मुर्शरफ यांचा विषय आणला. आताही ते अहमद पटेल यांचा विषय कौशल्याने आणतात. अहमद पटेल यांच्याशी संबंधित संस्थेतील काही जण इसिसचे सभासद निघालेले आहेत. त्याच्यावर आता राजकीय शेरेबाजी सुरू आहे. मतदारांना जाती-पातींचा विसर पाडायचा असेल तर हिंदुत्वाचा जोरकस मुद्दा मांडावा लागतो. या निवडणुकीत तसा कोणता मुद्दा दिसत नाही. राम जन्मभूमीचा प्रश्न नाही, पाकिस्तानचा प्रश्न नाही, दंगलीचा प्रश्न नाही, यामुळे भाजपला विकासाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागले आहे. राहुल गांधी यांनी “विकास वेडा झाला’ या शब्दांत मोदींच्या विकासाची खिल्ली उडवली आहे. भाजपला त्याचे उत्तर द्यावे लागत आहे. भारतासारख्या देशात कितीही विकास झाला तरी विकासापासून वंचित असलेला समाज प्रचंड संख्येने उरतोच. विकास आणि अविकास यांच्यातील पोकळी म्हणजे हा समाज असतो. राजकीय नेते मंडळी या समाजाला लक्ष्य करतात. गुजरातचा विकासच झाला नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल आणि तेवढेच धाडसाचे ठरेल की विकास समाजातील अतिदुर्बल लोकांपर्यंतही जाऊन पोहोचलेला आहे.  काँग्रेसने आपली प्रतिमा हिंदू हिताचा घात करणारा पक्ष अशी बनवली. त्यात बदल करणे फार आवश्यक आहे. स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस ही हिंदू काँग्रेस आहे. इंग्रज, जिना आणि आंबेडकर यांनी काँग्रेसकडे याच दृष्टीने बघितले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मुस्लिम मतांसाठी हा वारसा सोडला. त्याचे परिणाम २०१४ च्या निवडणुकीत पन्नासच्या वर जागा मिळवण्यात झाला. राहुल गांधी कपाळावर टिळा लावून आता गुजरातमधील अनेक मंदिरांना भेट देत आहेत. मशिदीत जाण्याचे टाळत आहेत. आम्ही हिंदूविरोधी नाही हा संदेश त्यांना द्यायचा आहे. हिंदू मतदार हा संदेश स्वीकारतील का? उत्तर १८ डिसेंबरला मिळेल. गुजरातची निवडणूक जातीय समीकरणे, विकास आणि हिंदुत्व या तीन मुद्द्यांभोवती फिरत राहणार आहे. यातील कोणता मुद्दा भारी ठरेल याचेही उत्तर १८ डिसेंबरला मिळेल.

- रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...