आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळ आहे कणखर संदेश देण्याची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता करण्यासारखा एक विषय आहे, तो म्हणजे काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी. सर्व काश्मीर सैन्याच्या हातात द्यावे. सहा महिन्यांत दहशतवाद्यांचा खात्मा करावा, असा त्यांना मुक्त परवाना द्यावा. काश्मीरमध्ये निवृत्त सैनिकांच्या वसाहती कराव्यात. बाहेर काढलेल्या पाच लाख पंडितांना पुन्हा वसवावे.
 
जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी २४ एप्रिल रोजी आल्या होत्या. श्रीनगरमधील परिस्थिती गंभीर आहे. पाकिस्तानने चिथावणी दिलेले विद्यार्थी सुरक्षा दलावर दगडफेक करत असतात. राज्यातील कायदा आणि व्यवस्थेची परिस्थिती हाताळणे हे मुख्यमंत्र्यांचे काम असते. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती त्याबाबतीत पूर्णपणे अयशस्वी झालेल्या आहेत.  
 
भेट झाल्यानंतर त्या म्हणाल्या, “विघटनवाद्यांशी चर्चा केली पाहिजे आणि चर्चेनेच हा प्रश्न सोडवला पाहिजे.’ केंद्राला चर्चेचा उपदेश करण्याऐवजी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी काय करते आहे हे त्यांनी सांगितले नाही आणि तसा प्रश्न तरी त्यांना कुणी विचारला नाही. जणू काही काश्मीरचा प्रश्न हा केंद्र सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यामधील आहे आणि माझे काम निष्क्रियपणे बसून राहणे आहे, असेच त्यांना सांगायचे आहे. यापूर्वी मेहबूबा मुफ्तींच्या वडिलांचे राज्य काश्मीरमध्ये असताना फुटीरतावादी असेच चेकाळलेले होते. मुफ्तीचा मार्ग काश्मीरमुक्तीचा तर नाही ना? याचा खूप सावधपणे विचार केला पाहिजे.  
 
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, वाजपेयी मसुद्याप्रमाणे काश्मीरचा प्रश्न सोडवला पाहिजे. लालकृष्ण अडवाणी तेव्हा उपपंतप्रधान होते आणि या दोघांनीही हुर्रियत आणि अन्य नेत्यांशी वाटाघाटी केल्या होत्या. तोच मार्ग आपण स्वीकारला पाहिजे, त्याशिवाय जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सुधारणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीरचे धोरण ठरवताना ते तीन शब्दांच्या आधारे ठरविले होते. १. इन्सानियत २. जम्मूरियत ३. काश्मिरियत. त्याचे अर्थ होतात मानवता, लोकशाही आणि काश्मिरीयत्व.  
 
काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानने निर्माण केला आहे, म्हणून पाकिस्तानशी चर्चा आणि वाटाघाटी यांची सुरुवात अटलबिहारी वाजपेयी यांनी केली. लाहोर बस त्यांनी सुरू केली. या बसमधून ते लाहोरला गेले. पाकिस्तानी जनतेला उद्देशून त्यांनी भाषण केले. पाकिस्तानचे अस्तित्व त्यांनी मान्य केले. लाहोर समझौत्यावर सह्या केल्या आणि वातावरण असे काही निर्माण झाले की, आता भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सलोख्याचे होऊन काश्मीर प्रश्नही संपेल.  
परंतु तसे व्हायचे नव्हते, शांततेचा प्रयत्न वाजपेयी करीत होते, तेव्हा मुशर्रफ सेनापती होते. त्यांनी कारगिलमध्ये सैन्य पाठवून भारतीय हद्दीतील काही भाग बळकावला. त्यानंतर कारगिल युद्ध सुरू झाले. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात आपले राजकीय नेतृत्व ठार झाले नाही. वाजपेयी यांनी आरपार युद्धाची घोषणा केली, परंतु युद्ध झाले नाही. काश्मीरचा प्रश्न त्यानंतर तसाच लटकला. आता मेहबूबा म्हणतात की, वाजपेयी मसुद्याप्रमाणे चर्चा आणि वाटाघाटींच्या मार्गाने प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांना असे तर म्हणायचे नाही ना, तुम्ही वाटाघाटी करत राहा, वाटाघाटी करता करता गाफील राहा, मग पाकिस्तान आपली नखे बाहेर काढील.  
 
मेहबूबा बेगम यांच्या लक्षात यायला पाहिजे की, मोदी म्हणजे वाजपेयी नव्हेत. वाजपेयी यांनी आपल्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यात प्रामाणिकपणा होता, परंतु आवश्यक तेवढी सावधगिरी नव्हती. रक्ताला चटावलेल्या पाकिस्तानशी वाटाघाटी करताना वाटा आपल्याला येईल आणि घाटा पाकिस्तानला जाईल याची अत्यंत गोड बोलून काळजी घ्यावी लागते.  
 
वाटाघाटीचा मार्ग चांगलाच. कोणत्याही प्रकारची हिंसा चांगली नसते. आपल्याच नागरिकांवर गोळीबार करणे हेदेखील वाईटच. हे सर्व टाळले पाहिजे. परंतु आपण लाख ठरवले की हे टाळले पाहिजे, पण समोरचा तो टाळण्यास तयारच नसेल तर काय करायचे? हात पाठीशी बांधून आपल्याला मारायला आलेल्यांशी लढता येत नाही. अशा वेळेला फक्त मार खावा लागतो. साधू आणि सत्पुरुष कुणावर हात उगारत नाहीत. ते मार खातात, प्रतिकार करत नाहीत. हा नियम राज्याला लागू होईल का? तो जर राज्याला लागू केला तर राज्यात अनाचार, अनागोंदी आणि गोंधळ माजेल.  
 
राज्य म्हणजे सार्वभौमत्व. या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याची कुणाचीही हिंमत होता कामा नये. अशी जो हिंमत दाखवील त्याला राज्याच्या दंडशक्तीचा तडाखा बसलाच पाहिजे. तेथे दया-माया नाही. विद्यार्थी, तरुण, तरुणी असा विचारही करता येत नाही. तेथे हिंसा-अहिंसेचा विचार करायचा नसतो. राज्यसंस्था म्हटले की हिंसा हा तिचा अंगभूत गुण होतो. जसे धर्मसंस्था म्हटले की क्षमा आणि सर्वांविषयी प्रेमभाव हा तिचा अंगभूत गुण होतो. काश्मीरमध्ये आपल्या सैन्यावर दगड फेकणारे आपल्या सार्वभौमत्वावर दगड मारतात. ते कसे सहन करायचे? त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे असते आणि प्रसंगी दगडांना गोळ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. राज्य कायद्याप्रमाणे चालते. त्यात कायद्याची अंमलबजावणी सामान्य स्थितीत सामान्यपणे आणि असामान्य स्थितीत असामान्यपणे केली पाहिजे, हाच राजधर्म आहे. आणि सगळ्या महासत्ता या धर्माचे काटेकोरपणे पालन करत असतात. 
मेहबूबा मुफ्ती चर्चा करावी असे म्हणतात. चर्चा कुणाशी करायची? दगड फेकणाऱ्यांशी करायची की त्यांच्या बोलवित्या धन्यांशी करायची? पाकिस्तानशी चर्चा करायची तर ती कुणाशी करायची? काही सत्ता नसलेले पंतप्रधान म्हणजे नवाझ शरीफ आहेत, सगळी सत्ता सैन्याच्या हातात. सैन्याची सत्तादेखील आयएसआय आणि त्या-त्या काळचे कावेबाज आणि धूर्त सेनापती यांच्या हातात असते. यापैकी कोणाशी चर्चा करायची?  
 
पाकिस्तानात अनेक दहशतवादी गट आहेत. ते समांतर सत्ता चालवतात. काश्मीरमधील दहशतवादात ते गुंतलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करायची का?  हुर्रियत नेत्यांच्या राष्ट्रनिष्ठा संशयास्पद आहेत, त्यांच्याशी कशी चर्चा करायची? चर्चा करा, हे सांगणे खूप सोपे आहे, पुन्हा चर्चा ही कोणत्या विचारावर करायची? भारताच्या सार्वभौमत्वावर चर्चा करता येणार नाही. काश्मीर स्वतंत्र करणे हा चर्चेचा विषय असू शकणार नाही. काश्मीरला अधिक स्वायत्तता देणे हादेखील चर्चेचा विषय होऊ शकणार नाही. काश्मीरचा आर्थिक विकास हा सत्तेवर असणाऱ्या मेहबूबाचा विषय आहे. त्यात त्या काहीच करत नाहीत.  
 
यामुळे एकच करण्यासारखा विषय राहतो, तो म्हणजे काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी. सर्व काश्मीर सैन्याच्या हातात द्यावे. सहा महिन्यांच्या आत दहशतवाद्यांचा खात्मा करावा असा त्यांना मुक्त परवाना द्यावा आणि लवकरात लवकर घटनेचे ३७०कलम रद्द करण्याच्या मार्गी लागावे. काश्मीरमध्ये निवृत्त सैनिकांच्या वसाहती कराव्यात, त्यांना शस्त्रे द्यावीत आणि घुसखोरांशी लढण्याचे प्रशिक्षणही त्यांना द्यावे. काश्मीरमधून बाहेर काढलेल्या पाच लाख काश्मीरमधील पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये वसवावे. त्यांना संरक्षणसिद्ध करावे. वाटाघाटी करायच्या असतील तर वाटाघाटींची ही विषयसूची करून वाटाघाटी करायला बसावे. आपल्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कोणताही मार्ग आम्हाला त्याज्य नाही याचा कणखर संदेश देण्याची वेळ आता आलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...