आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तर संघाची शक्ती! (रमेश पतंगे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक यंदा माध्यमांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची ठरली. मला आठवते की, मी १९७८ ते १९८८ या कालावधीत प्रतिनिधी सभेच्या बैठकीला जात असे. त्या काळात माध्यमे बैठकीची फारशी दखल घेत नसत. आज नेमकी उलटी स्थिती आहे. ही बैठक स्वयंसेवकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची असते. ती वर्षातून एकदा होते. संघाचे केंद्रीय आणि प्रांतिक अधिकारी प्रतिनिधी सभेचे पदसिद्ध सदस्य असतात. वर्षभरातील संघकामाचा वृत्तांत सरकार्यवाह प्रतिनिधी सभेपुढे मांडतात. देशापुढील विविध विषयांवर ठराव होतात. या प्रतिनिधी सभेत संघाच्या गणवेशातील बदलाचा विषय सरकार्यवाहांनी मांडला. संघाच्या हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाची फुल पँट संघ गणवेशाचा भाग झाली आहे.
अनेकांच्या संघाविषयीच्या कल्पना संघाविषयीच्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या असतात. काही जणांना संघ ही हुकूमशाही निमलष्करी संघटना वाटते. काही लोकांना संघ ही कर्मठ लोकांची संघटना वाटते आणि म्हणून संघात बदल होणे महाकठीण आहे, अशी त्यांची भावना असते. परंतु या लोकांना हे माहीत नाही की, संघाच्या गणवेशात वेळोवेळी बदल होत गेलेले आहेत. डॉ. हेडगेवारांच्या काळी खाकी पँट, खाकी शर्ट आणि वर फेटा असे. बाह्यांवर आरएसएस असा बॅच असे, सैनिक घालतात तसे लाँग बूट असत. या गणवेशात नंतर परिवर्तन झाले. लाँग बूट गेले आणि साधे काळे बूट आले. खाकी शर्ट गेला आणि पांढरा शर्ट आला. फेटा गेला आणि टोपी आली. आरएसएस बॅच गेला. काळानुसार हे बदल होत जातात. काही वर्षांपूर्वी चामड्याच्या पट्ट्याऐवजी जाड कापडी पट्टा स्वीकारण्यात आला.
पोशाखातील बदल हा तर बाह्य बदल झाला. संघात रोज प्रात:स्मरण म्हटले जाते. माझ्या बालपणी प्रात:स्मरणाची सुरुवात ‘कराग्रे वसते लक्ष्मी...' या श्लोकाने होई. आता हा श्लोक म्हटला जात नाही. आता ‘ओम सच्चिदानंद रूपाय...' या श्लोकाने होते. संघाच्या प्रात:स्मरणात पूर्वी ऐतिहासिक महापुरुष, ऐतिहासिक तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक माता-भगिनी यांचे स्मरण केले जायचे. या प्रात:स्मरणात बदल होत होत आता प्रात:स्मरणात महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ठक्कर बाप्पा अशा आधुनिक राष्ट्रपुरुषांचेही स्मरण केले जाते. स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण केले जाते. काळानुरूप हा बदल झाला.
संघाच्या प्रार्थनेतदेखील काळानुरूप बदल झाले. १९४० पर्यंत संघात मराठी आणि हिंदी अशी मिश्र प्रार्थना म्हटली जायची. मराठी प्रार्थनेची पहिली ओळ होती, ‘नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी। नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी।' आणि हिंदी कडव्याची पहिली ओळ होती, ‘हे गुरो श्री रामदूता शील हमको दीजिए। शीघ्र सारे सद््गुणों से पूर्ण हिंदू कीजिए।' आणि शेवटी भारतमाता की जय म्हणून राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय असे म्हटले जायचे. या प्रार्थनेत १९४०मध्ये बदल झाला आणि आज म्हटली जाणारी ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...' ही संस्कृतमधील प्रार्थना म्हटली जाते. ही संस्कृतची प्रार्थना केवळ प्रार्थना नसून संघाचा संपूर्ण विचार या प्रार्थनेत आलेला आहे. ज्याला संघविचार जाणून घ्यायची इच्छा आहे त्याने संघाची ही प्रार्थना जाणून घेणे व समजून घेणे फार आवश्यक आहे.
जसा प्रार्थनेत बदल झालेला आहे तसा काळानुरूप संघाच्या मांडणीतही बदल होत गेलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी संघकाम कशासाठी करायचे? तर त्याचे उत्तर होते, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. संघकामाची आता आवश्यकता कोणती? असा प्रश्न निर्माण झाला. श्रीगुरुजींनी संघकामाला अतिशय व्यापक आणि वैश्विक आयाम दिले. चारित्र्यवान माणूस घडवणे, त्यांचे संघटन उभे करणे आणि आपल्या चारित्र्य आणि धर्मबळावर विश्वात मानव्य प्रस्थापित करणे हे संघकामाचे लक्ष्य झाले.
श्रीगुरुजींच्या निधनानंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक झाले. देश-काल परिस्थितीत झपाट्याने बदल होत चालले होते. संघाचे वयदेखील वाढत चालले होते. संघाचे वय वाढणे म्हणजे स्वयंसेवकांचे वय वाढत होते. वाढत्या वयातील स्वयंसेवकांना राष्ट्र उभारणीच्या वेगवेगळ्या कामांत गुंतवणे आवश्यक होते. म्हणून बाळासाहेबांनी समाजातील सर्व क्षेत्रांत संघ कार्यकर्त्यांनी गेले पाहिजे आणि आपले काम सुरू केले पाहिजे, असा विचार मांडला. संघाच्या मांडणीतील जोर देण्याचे विषय असे एकेका कालखंडात बदलत गेलेले आहेत.
काळानुरूप बदल ही संघाची आणि खरे म्हणजे हिंदू समाजाची शक्ती आहे. हिंदू समाज हा काळानुरूप बदलत गेला आहे. वैदिक काळात कर्मकांडे आणि यज्ञयाग होते. भगवान गौतम बुद्धांनी त्यांचा निषेध केला आणि भगवान गौतम बुद्धांची शिकवण घेऊन हिंदू समाज पुढे गेला. अनेक जण हिंदूंचा अर्थ धार्मिक करतात, संघ तसा करत नाही. हिंदू ही एक जीवनपद्धती आहे आणि काळानुरूप बदल करत जाणे हे तिचे वैशिष्ट्य आहे. संघही त्याप्रमाणे आपल्यात काळानुरूप बदल करत गेला आहे.
मोठ्या संघटनेत असे बदल सुखासुखी होत नसतात. बदल म्हटला की वादविवाद आणि संघर्ष सुरू होतो. अनेक मते तयार होतात आणि संघटनेत विभाजनाची प्रक्रिया सुरू होते. गौतम बुद्धांचा संघ यामुळेच फुटला. राजकीय पक्षांचेदेखील या कारणामुळे अनेक तुकडे होतात. आतापर्यंत संघात अनेक बदल झाले, पण त्यामुळे संघ दुभंगला नाही, उलट तो अधिक सशक्त होत गेलेला दिसतो. त्याचे कारण असे की, संघ चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते पूर्णपणे नि:स्वार्थ भावनेने संघकार्य करतात आणि परिवर्तनाचे विषय पुढे आणतात. यामुळे कोणताही स्वार्थ नसल्यामुळे संघ आवश्यक ते परिवर्तन करून अभेद्य राहू शकलेला आहे.
बातम्या आणखी आहेत...