आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रकारणासाठी समाज एकात्म व्हावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमचे पूर्वज, आमच्या परंपरा, आमचे महापुरुष आम्हाला सदैव मार्गदर्शन करण्यास समर्थ आहेत, हे त्यांनी प्रस्थापित करून दाखवले. राष्ट्रजीवनातील या तीन शक्ती आहेत. आपापल्या परीने त्या राष्ट्राला समर्थ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी एक देश, एक समाज, एक राज्यघटना, एक राज्यव्यवस्था या आपल्या सर्वांना जोडणाऱ्या गोष्टी आहेत. मार्गांचे वेगळेपण असले तरी सर्वांच्या मनात सर्व काही राष्ट्रासाठी, असा विचार बलवान झाला पाहिजे आणि हा विचार हीच राष्ट्राची शक्ती आहे. 

दसरा म्हणजे विजयादशमीला महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय परिणामांच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे कार्यक्रम होतात. त्यातील दोन कार्यक्रम नागपूरला होतात. पहिला कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचा असतो. या कार्यक्रमाला १९२५ सालापासूनची परंपरा आहे. संघाच्या परिभाषेत याला ‘विजयादशमी’चा उत्सव असे म्हटले जाते. या उत्सवात सरसंघचालकांचे भाषण होते. सुमारे २५-३० वर्षांपूर्वी सरसंघचालकांच्या भाषणाची माध्यमे फारशी दखल घेत नसत. आज परिस्थिती उलटी झाली आहे. दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून संपूर्ण भाषण देशापुढे ठेवले जाते. त्यावर चर्चा होतात, वृत्तपत्रीय लेखांचाही पाऊस पडतो. पूर्वी संघाची दखल घ्यावी, असे कोणाला फारसे वाटत नसे. आज संघाची दखल घेतल्याशिवाय माध्यमांना पुढे जाता येत नाही. संघशक्तीचा हा प्रभाव आहे. विजयादशमीच्या संघ उत्सवाचा मुख्य आत्मा शक्तीची उपासना असाच आहे. संघटनेची शक्ती जसजशी वाढत जाईल, तसतशी तिची दखल देशालाच काय, जगालाही घ्यावी लागेल, हे प्रारंभापासूनचे संघकामाचे सूत्र आहे.  

असाच महत्त्वाचा कार्यक्रम दीक्षाभूमीवर होतो. या कार्यक्रमाला धम्मदीक्षा सोहळा असे म्हटले जाते. त्याचे हे ६० वे वर्ष होते. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने दलित बांधव दीक्षाभूमीवर येतात. त्यांची शिस्त, संयम आणि श्रद्धा हे केवळ अभिनंदनीय नसून अनुकरणीय आहे. कोणतीही गडबड, गोंधळ न करता शांतपणे रांगेत उभे राहून दर्शन सोहळा पार पाडला जातो. हा एका अर्थाने धार्मिक उत्सवच असतो. डॉ. बाबासाहेबांचे लाखो अनुयायी अत्यंत श्रद्धेने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी दीक्षाभूमीत येत असतात. हा राजकीय कार्यक्रम नसतो. कार्यक्रमात राजकीय भाषणे होत नाहीत. या वेळच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले उपस्थित होते.  यापैकी कुणीही राजकीय भाषण केले नाही. प्रत्येकाने आपापल्या शब्दांत डॉ. बाबासाहेबांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्यघटनेतील समतेच्या आशयाची आठवण सर्वांना करून दिली आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच मागास जातीत जन्मलेला, चहा विकणारा आज देशाचा पंतप्रधान झालेला आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, मी कायद्याचा अभ्यासक आहे. राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. जगातील राज्यघटनांचा अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासाअंती माझे असे मत झालेले आहे की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना जगातील सर्वांत उत्तम राज्यघटना आहे. कार्यक्रमाचे धार्मिक पावित्र्य सर्वांनी राखले. 

दसऱ्याला मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा भरतो. त्यालाही पन्नास वर्षांची परंपरा आहे. शिवसेना ही महाराष्ट्रातील शक्ती आहे. प्रारंभीच्या काही मेळाव्यांत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जगण्याचे प्रश्न उचलले. मराठी माणसांची नोकरी, व्यवसाय, घरे, या प्रश्नांना पहिल्या काही मेळाव्यांत अग्रक्रम मिळाला. नंतर शिवसेना राजकारणात उतरली आणि राजकीय पक्ष झाला. त्यानंतर भाषणांना राजकीय स्वरूप येणे क्रमप्राप्त झाले. आताच्या दसऱ्या मेळाव्यातही उद्धव ठारे यांचे राजकीय भाषण झाले. ‘साथही देऊ अन् लाथही मारू’ असा आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर तोफ डागली. त्यांचे बंधू राज ठाकरे हल्ली या सभेला नसतात.  त्यांनी मनसेमार्फत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावाप्रमाणेच सरकारवर टीकेची तोफ डागली. ‘बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही.’ हे त्यांचे वाक्य दुसऱ्या दिवशीच्या बातम्यांचा प्रमुख मथळा झाले.  शिवसेना राजकीय पक्ष असल्यामुळे आणि दसरा मेळावा राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी होत असल्यामुळे या मेळाव्यात राजकीय भाषण करण्याशिवाय काही पर्याय नसतो.  

शिवसेना आणि मनसे दोघेही जण सध्या आपल्या अस्तित्वाचा संघर्ष लढत आहेत. अपेक्षेइतके राजकीय यश दोन्ही पक्षांना मिळालेले नाही. मनसेची स्थिती तर अतिशय वाईट आहे. शिवसेनेला सत्ता सोडता येत नाही, कारण सत्ता सोडली तर आज असलेले अनेक आमदार शिवसेना सोडून जातील, ही भीती उद्धव ठाकरे यांच्यापुढे आ वासून उभी आहे. सत्तेत राहून भाजपच्या सर्व धोरणांना पाठिंबा दिला तर आपले वेगळेपण संपते आणि सत्तेत राहून विरोध केला तर हास्यास्पद स्थिती निर्माण होते. उद्धव ठाकरे आजच्या घडीला संभ्रमित नेत्याच्या  अवस्थेत आहे. धरले तर चावते आणि सोडले तर पळते, ही म्हण त्यांना पुरेपूर लागू होते. दसऱ्या मेळाव्यातील त्यांचे भाषण  कितीही आक्रमक असले तरी ते शिवसैनिकांना दिशा देण्यास अपुरे आहे आणि भाजपने त्याचा गंभीरपणे विचार करावा, या योग्यतेचेदेखील नाही. राज ठाकरे यांची वक्तव्ये सनसनाटी आणि सणसणीत असतात, आता लोकांना त्याची सवय झालेली आहे. आणि त्यांना हे माहीत आहे की, राज ठाकरे हे बोलण्यातच फक्त तरबेज आहेत. गरजेल तो पडेल काय? ही म्हण त्यांच्याही बाबतीत पूर्णपणे लागू पडते.  

नागपूरचे दोन कार्यक्रम आणि मुंबईतला हा एक कार्यक्रम यांचा तसे बघू जाता परस्पर काही संबंध नाही. परंतु आधुनिक विज्ञान असे सांगते की, विश्वात घडणारी कोणतीही घटना एकाकी नसते. तिचा परस्पराशी संबंध असतो. विश्व हे एक आहे आणि ते परस्पर संलग्न आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ राष्ट्राचा विचार करतो. या वेळचे मोहनजी भागवत यांचे भाषण जर नीट ऐकले, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता ऐकले तर राष्ट्रापुढील अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला असल्याचे लक्षात येईल. शासनाला जिथे काही सांगणे आवश्यक आहे, तिथे त्यांनी ते सांगितले आहे. समाजाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे आणि बुद्धिवंतांना विदेशी विचाराच्या गुलामीतून मुक्त होण्याचे आवाहन केले आहे. या भाषणात कोणताही राजकीय आशय नाही. राजकारणाच्या वर उठून राष्ट्रकारणासाठी केलेले हे भाषण आहे. म्हणून त्याच्यावर याच अंगाने चर्चा जर केली गेली तर ती उपयुक्त ठरेल. संघाचे कार्य समाजात असलेले सगळे कृत्रिम भेद मिटवून समाजाला एकात्म करण्याचे आहे. हेच काम अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी केले. त्या वेळच्या समाजात निर्माण झालेले असंख्य दोष आणि त्यामागे उभे केलेले धार्मिक अधिष्ठान  विज्ञान आणि तर्कवादाच्या आधारावर गौतम बुद्धांनी मोडीत काढले. एकरस आणि एकात्म समाज निर्माण करण्याचे त्यांचे योगदान अफाट आहे. त्यांच्या मृत्यूनंतरचा सर्व कालखंड भारताच्या सुवर्ण युगाचा कालखंड आहे. त्याचे पुनरुज्जीवन डॉ. बाबासाहेबांनी १९५६ मध्ये केले. डॉ. हेडगेवारांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना केली. या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याची एक पद्धती विकसित केली. शिवसेनेच्या रूपाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीचा अभिमान जागवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचे जातीचे किंवा आरक्षणाचे राजकारण न करता त्यांनी राजकीय पक्ष उभा करून दाखवला. आमचे पूर्वज, आमच्या परंपरा, आमचे महापुरुष आम्हाला सदैव मार्गदर्शन करण्यास समर्थ आहेत, हे त्यांनी प्रस्थापित करून दाखवले. राष्ट्रजीवनातील या तीन शक्ती आहेत. आपापल्या परीने त्या राष्ट्राला समर्थ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी एक देश, एक समाज, एक राज्यघटना, एक राज्यव्यवस्था या आपल्या सर्वांना जोडणाऱ्या गोष्टी आहेत. मार्गांचे वेगळेपण असले तरी सर्वांच्या मनात सर्व काही राष्ट्रासाठी, असा विचार बलवान झाला पाहिजे आणि हा विचार हीच राष्ट्राची शक्ती आहे. 
 
- रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...