आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान, रोजा आणि मानवाधिकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म हा मानवाच्या कल्याणासाठी असावा, जगातील समस्त मानव जातीस निर्भयपणे जीवन जगण्याचा, आत्माभिमान जोपासण्याचा समान अधिकार असावा; इतरांची भूक, तहान, वंचना ही आपली भूक, तहान व वंचना भासावी; इतरांच्या पायांत रुतलेल्या काट्याच्या तीव्र वेदना आपल्या काळजाला व्हाव्यात, इतरांचे दु:ख पाहून आपले डोळे पाणवावेत; याच तीव्र जाणिवेतून समता, बंधुत्व आणि प्रेमाचे नंदनवन बहरावे; हाच रमजान या पवित्र महिन्याचा मूळ उद्देश होय. (संदर्भ-कुराण, सूरह -ए-बकरा)


या पवित्र उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याकडे असलेली शक्ती, सामर्थ्य, द्रव्य, ज्ञान व संपत्ती वंचित व दुर्बलांच्या कल्याणास्तव खर्च करण्याचा आदेश कुराणने सूरह-ए-बकरा च्या पहिल्याच आयतीत दिला आहे. यासाठी कुराणात ‘इनफाक’ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. वंचित, पीडित, दुर्बल व अन्यायग्रस्तांच्या दाहक वंचनेची जाणीव व्हावी, माणसात आपली शक्ती, संपत्ती न्याय प्रस्थापनेसाठी खर्च करण्याचे प्रचंड सामर्थ्य निर्माण व्हावे, नैतिकता, क्षमादान व परोपकाराची प्रेरणा मिळावी, सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट करण्याची भूक, तहान प्राप्त व्हावी यासाठीच दिवसभर अन्नपाण्याचा त्याग करण्याचे प्रशिक्षण रोजाच्या निमित्ताने देण्यात आलेले आहे. रोजाच्या अवस्थेतच उपरोक्त गुणधर्माची कठोर परीक्षा असते.


महंमद पैगंबरांनी म्हटले की, ‘‘जो माणूस रोजाप्रसंगी नैतिकता व माणुसकी आणि परोपकार विसरतो आणि इस्लामने हराम (निषिद्ध) ठरवलेल्या उपजीविकेने रोजा इफ्तार करतो, त्यास दिवसभर उपाशी राहण्याव्यतिरिक्त कोणताही लाभ मिळत नाही (संदर्भ : अबुदाऊद, हदीस संग्रह) याचा अर्थ स्पष्ट करताना साने गुरुजींनी ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकात म्हटले की, रोजा ही माणसाच्या माणुसकीची खरी कसोटी आहे. संयम, परोपकार व क्षमादानाची खरी परीक्षा आहे. म्हणूनच रोजासारखी उपासना स्वीकृत होण्यासाठी मानवाधिकारांची जोपासना करणे, आपल्या संपत्ती, शक्ती व सुखामध्ये इतरांना समान व न्यायपूर्ण अधिकार देणे गरजेचे होय. रमजानच्या महिन्यातच अवतरित झालेल्या कुराणने स्पष्टपणे म्हटले की, ‘‘ तुमच्या संपत्तीत वंचित आणि दुर्बलांचा वाटा देण्यात यावा आणि हा तुमच्यासाठी सदका-ए-फित्र देण्याचा रमजान महिन्यात सक्तीने आदेश देण्यात आलेला आहे.’’ (कुराण : सूरह -ए-बनीइस्रायल) वैध संपत्तीतून गोरगरिबांना आणि वंचितांना जकात आणि सदका-ए-फित्र दिला नसेल, त्यांनी ईदची नमाज अदा करण्यासाठी ईदगाहच्या जवळही भटकता कामा नये.’’(संदर्भ : बुखारी, हदीस संग्रह)
डॉ. विवेक परुळेकर यांनी आपल्या ‘इस्लाम एक अध्ययन’ या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेय की, इस्लाममध्ये नमाज, रोजा, हज आणि जकात या चारही मूलभूत उपासनांचा संबंध केवळ अध्यात्माशी नसून ऐहिकतेशी यांची पूर्णपणे सांगड घातलेली आहे. यातूनच सर्वच मानव जातीस जगातील संपत्ती व साधनसामग्रीत समान व न्यायपूर्ण वाटा प्राप्त होण्याची आणि स्वाभिमानपूर्ण जीवन जगण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण जगातील संपत्ती व साधनसामग्रीचे न्यायपूर्ण व समान वाटप झाल्याशिवाय आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणे शक्य नाही असे मत कुराणने मांडले आहे.


जकात आणि सदका-ए-फित्रच्याच माध्यमातून माणसाला आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करण्याची इस्लामने ‘हज्जतुल विदा’ च्या प्रसंगी ऐतिहासिक घोषणा केलेली आहे. शिवाय आणखी एक विशेष बाब अशी की, इस्लाममध्ये जकात केवळ मुस्लिम वंचितांनाच देण्याचा आदेश नसून यात बिगर मुस्लिम वंचितांचासुद्धा अधिकार होय. मुस्लिमेतर समाजातील वंचित आणि पीडितांनासुद्धा न्यायपूर्ण वागणूक आणि जकात देण्याचा, त्यांच्यावर उपकार करण्याचा स्पष्ट आदेश कुराणने सूरह-ए-बनी इस्रायलमध्ये दिला आहे. रमजान महिन्यातच त्याग आणि बंधुभावाची प्रेरणा देण्यात आलेली आहे. कुराणने परोपकार आणि कल्याण व न्यायस्थापनेच्या चौकटी केवळ मुस्लिमांपर्यंत मर्यादित ठेवल्या नसून सर्वच जाती-धर्मांच्या लोकांच्या कल्याणाचा कार्यक्रम आखला आहे. (संदर्भ : कुराण सूरह-ए- फातिहा-1) धर्माच्या नावावर आणि आपल्या शक्ती, सत्ता व सामर्थ्याच्या तसेच संपत्तीच्या बळावर मानव जातीस गुलाम बनवणा-या खलनायकांची फॅरो, नमसद, हामान, शद्दाद व कासनसारखी असंख्य उदाहरणे कुराणात दिलेली आहेत. या खलनायकांच्या विषमतावाद, ईशद्रोह, भांडवलशाहीविरोधात मानव जातीचे नेतृत्व करणा-या असंख्य प्रेषितांची उदाहरणेसुद्धा दिलेली आहेत. याच दुष्ट शक्तींचा नाश करून मानव जातीस कायमचे मुक्त केल्यावरच ख-या अर्थाने ईद साजरी होईल.