आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कुछ भी करेंगे’ म्हणजे हडेलहप्पी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाची सद्यःस्थिती लोकांसमोर मांडण्याची व पुढील वाटचालीची दिशा  स्पष्ट करण्याची पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेली प्रथा अखंडपणे गेली ७० वर्षे चालू आहे. ७१ व्या वर्षी हीच प्रथा पुढे नेताना मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण ऐकल्यावर काही प्रश्न लोकांच्या मनात उभे राहिले असतील तर नवल नाही.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे लाल किल्ल्यावरील सलग चाैथे भाषण. भाषणाची सुरुवातच त्यांनी आपली संघ प्रचारकाची पार्श्वभूमी ठसठशीत पुढे येईल अशी केली. प्रांत, भाषा आणि परंपरा यांतील वैविध्याने नटलेला पण तरीही एकत्र राहिलेला देश आहे, हे जगाने मान्य केले. संघ संस्कारांच्या परिणामी मोदींना मात्र ही विविधतेतील एकता मान्य नाही. म्हणून तर ते स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची सुरुवात ‘सुदर्शनधारी मोहन से लेकर चरखाधारी मोहन तक...’ अशी एक धर्मकेंद्री आणि केवळ हिंदू धर्माची विचारधारा हीच इथली मुख्य विचारधारा आहे आणि अन्य धर्मांचे अस्तित्व केवळ प्रासंगिक आहे, हे उघडपणे ठसवण्याचा प्रयत्न करणारी ठरली. धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाच्या घटनेचे रक्षण करण्याची शपथ घेतलेले पंतप्रधान अशी बहुसंख्यवादी भूमिका घेताना जगाने प्रथमच पाहिले. देशातील अल्पसंख्य समूहांच्या स्वअस्तित्वाविषयीच्या धास्तीत भर घालणारे असेच हे विधान आहे. हाच अंतःप्रवाह पुढे त्यांच्या भाषणात वारंवार व्यक्त झाला.
 
स्त्री-पुरुष समानतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला सबलीकरणाची संकल्पना आता सर्वमान्य झाली आहे. या स्तुत्य उद्देशाकडेसुद्धा मोदी किती विकृतपणे पाहतात हे त्यांच्या मुसलमान स्त्रियांच्या ‘तोंडी तलाक’ (तिहेरी तलाक) विषयी व्यक्त केलेल्या निर्धारातून स्पष्ट होते. तीनदा नव्हे, तर एकदासुद्धा केवळ तोंडाने ‘तलाक’ हा शब्द उच्चारून आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची त्या समाजातील रूढी कालबाह्य आणि मुस्लिम स्त्रियांवर अन्याय करणारी आहे. ती  नष्ट व्हावी यासाठी हमीद दलवाईंपासून मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाच्या सदस्यांपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले आहेत. परिणामी मुस्लिम समाजातील स्त्रियादेखील आता त्यासाठी एकत्र येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण हे म्हणत असताना बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्मातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि प्रतिष्ठा मिळाली असल्याचा साक्षात्कार जणू मोदींना झाला असावा. महिला सबलीकरणाचा प्रश्न हा केवळ मुस्लिम महिलांपुरता मर्यादित नसून सर्व भारतीय महिलांसाठी महत्त्वाचा आहे. हिंदू पुरुषाची महिलेबद्दलची विकृत स्वामित्व-भावना व्यक्त करणारी हरियाणातील अायएएस अधिकाऱ्याच्या तरुण सुशिक्षित मुलीचा मध्यरात्री पाठलाग करण्याची त्या राज्याच्याच भाजप अध्यक्षांच्या उद्दाम मुलाचे कृत्य आणि त्याचे वडील व इतरांनी केलेले समर्थन (ही मुलगी मध्यरात्री रस्त्यावर काय करत होती?) याबद्दल मात्र मोदींनी सोयीस्करपणे मौन पाळले.
 
आपल्या श्रद्धेच्या नावाने किंवा तिच्या समर्थनार्थ काही लोकांचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे विधान त्यांनी केले; पण त्यांचे उदाहरण देत असतांना गोरक्षणाच्या नावाने देशभर संघ परिवाराने घडवून आणलेल्या हिंसाचारावर न बोलता सार्वजनिक रुग्णालये, रेल्वे, बसेस यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे उदाहरण देऊन मूळ मुद्द्याला त्यांनी बगल दिली; एवढेच नव्हे, तर त्याचे थिल्लरीकरण केले.
एका निवडणुकीतून दुसऱ्या निवडणुकीकडे हेच मोदी-शहा दुकलीचे ब्रीदवाक्य असल्याने १ जानेवारी २०१८ रोजी अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतीय तरुणांचे त्यांनी अगोदरच अभिनंदन व स्वागत करून टाकले. भाजपच्या वतीने नवमतदारांचा अनुनय व त्यांच्या तारुण्यसुलभ भावनांना साद घालून त्यांना खोटी आश्वासने देण्याच्या मोहिमेचा हा प्रारंभ आहे. या संभाव्य मतदारांना आवाहन करताना आपण आजपर्यंत निराशेच्या वातावरणात पोसलो आणि वाढलेलो असल्याचे लबाड विधान त्यांनी जाता-जाता केले. सर्वदूर पसरलेल्या घोर अंधारातून मीच एकमेव प्रकाशाचा किरण आहे, या त्यांच्या प्रेषिताला शोभेल, अशा आत्मप्राैढीयुक्त अहंकाराचे हे उदाहरण आहे.
 
स्पर्धात्मक, सहकारी संघराज्यवाद ही एक नवीच संकल्पना त्यांनी या भाषणात मांडली. मुळामध्ये ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही सहकाराची मूळ कल्पना असेल तर त्यात स्पर्धेला वाव असतो कुठे? उलट अशा स्पर्धेच्या भावनेमुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची सहकारी वृत्ती सबल होण्याचीच शक्यता अधिक. केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये संपर्क, सुसूत्रता आणि सहकार्य यांना उत्तेजन देण्याची सुरुवात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीच सुरू केली होती. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते दर १५ दिवसांनी आपल्या सहीने पत्र लिहीत. त्यात त्या-त्या वेळचे देशासमोरील प्रश्न त्यांचे स्वरूप व ते सोडवण्याचे मार्ग याबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रश्न, त्याविषयी भारताची भूमिका व ते सोडवण्यासाठी भारताने करावयाचे प्रयत्न या सर्वांविषयी ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेत नेहरूंनी प्रत्यक्ष अमलात आणलेला तो सहकारी संघराज्यवादच होत. तथापि मोदी-जेटली आणि कंपनीला हे आपण आज नव्यानेच सांगत असून त्याची प्रथमच अंमलबजावणी करत आहोत, असा टेंभा मिरवायचा आहे. त्यांच्या आजवरच्या कारभाराचे नीट निरीक्षण केल्यावर लक्षात येते की, केंद्र सरकार जे सांगेल त्याला राज्य सरकारांनी निमूटपणे मान्यता द्यावी हाच त्यांच्या ‘को-आॅपरेटिव्ह फेडरॅलिझम’चा अर्थ आहे.
 
देशाची अंतर्गत सुरक्षा, एकता व अखंडता तसेच देशाच्या सीमांचे संरक्षण यावर मोदी जे काही बोलले त्याबाबतीत सर्व देशवासीयांचे एकमतच आहे. तपशील वगळता सर्व राजकीय पक्षांचाही सरकारच्या या संबंधीचे धोरण व कृतीला पाठिंबा आहे. फक्त या संदर्भात जी काही कृती केली जाईल तिचा अनाठायी  राणा भीमदेवी थाटात जाहीर घोषणा करून विनाकारण राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण करण्याचा आपला मोह संघ परिवार, मोदी-शहा दुक्कल व भाजप यांनी आवरला पाहिजे, एवढीच अपेक्षा.
भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने काश्मीरचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी मूलतः तो राजकीय आहे. त्यासाठी राजकीय तोडगाच काढावा लागेल. ३ वर्षांच्या कारकीर्दीत कुठलाही सुसंगत प्रयत्न न करता केवळ काश्मीरबाहेरच्या लोकांच्या राष्ट्रवादविषयक भावनांना चेतवणारी भाषा त्यांनी आजपर्यंत केली आहे. ‘ना गाली से, ना गोली से; बात बनेगी बोली से’ या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने केलेल्या घोषणेत बदल करून ‘बात बनेगी गले लगाने से’ अशी मोघम भाषा त्यांनी वापरली. हे संघ परिवाराचे वैशिष्ट्य आहे. काश्मिरी जनतेच्या मूळ प्रश्नांबाबत सोयीस्कर मौन पाळून उर्वरित भारतीय माणसांच्या ‘राष्ट्रीय प्रेरणा’ उद्दीपित करणारी भाषा संघ परिवाराने आजवर वापरली आहे.
 
गोरखपूरच्या हाॅस्पिटलमध्ये ७८ निष्पाप बालकांचा मेंदूज्वराने दुःखद अंत झाला. मुलांची श्वसनक्रिया अबाधित राखण्यासाठी आवश्यक आॅक्सिजनचा पुरेसा पुरवठाच उपलब्ध नव्हता. हाॅस्पिटलच्या यंत्रणेचा या बेजबाबदार वर्तनाचा साधा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला नाही याविषयी खेद, दुःख व्यक्त करणे किंवा संबंधित कुटुंबांचे सांत्वन करणारे बोलणे तर दूरच! उलट या साऱ्या प्रकरणाचा नैसर्गिक आपत्ती म्हणून त्यांनी जाता जाता उल्लेख केला. देशवासियांना त्यांच्या बोलण्यामुळे नक्कीच दुःख झाले असेल.
 
मोदींचे बाकी भाषण म्हणजे एखाद्या निवडणूक प्रचारसभेत केलेले भाषणच होते. ३ वर्षांत केलेल्या कामगिरीचे वर्णन व त्याच्या समर्थनार्थ सांगितलेली आकडेवारी याबद्दलचा त्यांच्याच सरकारमधील संबंधित उच्च-पदस्थ निःपक्षपाती व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांचे अहवाल यातून वस्तुस्थिती या अगोदरच समोर आली आहे. त्यामुळे मोदींनी केलेले हे दावे किती खरे वा किती खोटे आहेत याची चर्चा करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. सदैव निवडणुकीच्या धुंदीत असलेल्या व व्यक्तिगत सत्ताकांक्षेने पछाडलेल्या एका अतिमहत्त्वाकांक्षी, निष्ठूर राजकीय नेत्याचे भाषण. असे या भाषणाचे एका वाक्यात वर्णन करणे भाग आहे. आपल्या सरकारच्या उर्वरीत कामगिरीविषयी गुलाबी चित्र रंगवताना हे सारे प्राप्त करण्यासाठी ‘कुछ भी करेंगे’ असे मोदींनी ठणकावून सांगितले. संपूर्ण भाषणात किमान चार वेळा तरी त्यांनी विविध संदर्भात हा निर्धार व्यक्त केला. वरवर पाहता ही शब्दयोजना आकर्षक व त्यांच्या निर्धाराची प्रतीक वाटत असली तरी आपल्याला हवे तेच करण्याची व त्यासाठी अन्य कशाचीही पर्वा न करता काहीही करण्याची हडेलहप्पी वृत्ती याच्या मुळाशी आहे.
 
rsmahajan1@yahoo.com
 
बातम्या आणखी आहेत...