आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात वाच माझ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैनिकाला युद्धभूमीवर, कलाकाराला रंगभूमीवर आणि वैद्यकाला शल्यभूमीवर आलेलं मरण हे वीरोचित मरण मानलं जातं. शन्ना त्या अर्थानं वीरोचितपणे मृत्यूला सामोरे गेले. ‘ते वृद्धापकाळानं गेले’ हे त्यांच्या घराबाहेर लावलेल्या होर्डिंगवरचं वाक्य तितकंसं खरं नाही. शन्ना 86 वर्षांचे होते हे खरंच, पण ते रूढार्थानं वृद्ध नव्हते. ते मनोयुवा होते.. शेवटच्या दिवसापर्यंत ते लेखनात मग्न होते. ते लेखनही साधंसुधं नव्हतं. ब-याच वर्षांनी त्यांनी हाती घेतलेला तो एक नाट्यलेखनाचा प्रयोग होता. शन्ना त्या रंगकथेत पूर्ण गुंतून गेले होते. अजून दोन-चार दिवस मिळाले असते तर शन्नांनी ती रंगकथा केव्हाच हातावेगळी केली असती आणि शन्ना टच असलेलं आणखी एक नाटक पाहण्याची संधी मराठी रंगभूमीला मिळाली असती.


शन्नांच्या डोक्यात ती रंगकथा ब-याच दिवसांपासून घोळत होती. तशी ती होती मूळ विदेशीच, पण अमेरिकेतल्या दोन शहरांत घडलेली ती कथा शन्नांनी मुंबई आणि नागपूर या दोन शहरांभोवती गुंफून तद्दन मराठी केली होती. एक कर्तृत्ववान तरुणी, खूप आजारी असलेली आणि मृत्युशय्येला टेकलेली जशी त्या रंगकथेत होती तसाच एक विलक्षण कर्तृत्वसंपन्न परंतु जन्मजात अंधत्व असलेला एक तरुण त्या रंगकथेत होता. मरता मरता त्या तरुणीनं दान केलेले तिचे नेत्र त्या अंध तरुणावर रोपित केले जातात, त्याला दृष्टी येते आणि तिथून पुढचं खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक सुरू होतं. शन्नांच्या कथा जशा झटका देणा-या असत तसाच काहीसा प्रकार या रंगकथेतही शन्नांनी केला होता. पहिला अंक लिहून झाला होता. दुस-या अंकाची मनातली जुळवाजुळव पुरी झाली होती, पण त्या नाटकासाठी आवश्यक असलेल्या एका गीताचे संदर्भ शन्नांना सापडत नव्हते. शन्नांनी ज्येष्ठ गायक पंडित वसंतराव आजगावकरांना त्यासाठी बोलावून घेतलं होतं.


मंगळवारी सकाळी म्हणजे परवाच त्यांची भेटही झाली होती. वसंतराव हवे ते संदर्भ आणि गाण्याचं हस्तलिखित घेऊन शन्नांकडे गेले होते. शन्नांनी त्यांचं आगतस्वागतही केलं होतं. थोडासा सर्दीचा त्रास बळावल्यानं नाक वाहत होतं, श्वासोच्छ्वासाला त्रास होत होता. ‘आज तुम्ही आलायत खरे, पण आपण आजच्याऐवजी उद्या भेटू या का?’ असं शन्नांनी त्यांना विचारलं होतं. ‘त्रास होत असेल तर घाई कशाला? उद्या भेटू,’ असं म्हणून वसंतराव परतही गेले होते. पण तो उद्या उजाडायचाच नव्हता. मंगळवारच्याच रात्री शन्नांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सकाळी प्रकृती ठीक आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे अरुण घरी आलेला असतानाच शन्नांनी एक्झिट घेतली होती..


शन्नांना या कथाबीजाविषयीचं विलक्षण असं प्रेम मुळातच होतं. शन्नांनी लेखन हाच व्यवसाय स्वीकारताना सरकारी नोकरी सोडली तेव्हा अनेकांनी त्यांना सावध केलं होतं. पण शन्नांचा आपल्या लेखणीवर जबरदस्त विश्वास होता. आपण लेखन हाच पूर्णवेळचा व्यवसाय बनवू शकतो याची त्यांना खात्री होती. शन्नांनी लेखनावर उदंड पैसा कमावला आणि तसाच तो कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने वाटूनही टाकला. नेत्रशल्यक्रिया करणा-या एका धर्मादायी संस्थेला शन्ना दरवर्षी न चुकता पैसे पाठवत असत. आपण पाठवलेला पैसा सत्पात्री पडला आहे ना, याकडे त्यांचं बारकाईने लक्षही असे. नेत्रदानातून उद्भवलेल्या एका विलक्षण उत्कंठावर्धक अशा गुंतागुंतीवरची ही त्यांची रंगकथा म्हणूनच त्यांना अंतर्मनातून भावली होती. ते लेखन पूर्ण झालं की आणखी एका दिग्दर्शकाला काही द्यायचं त्यांनी मान्य केलं होतं. तो दिग्दर्शकही बुधवार-गुरुवारीच त्यांच्याकडे यायचा होता..


प्रत्येक गाव, प्रत्येक शहर ओळखलं जातं ते त्या गावच्या वैशिष्ट्यामुळे. कधी ते वैशिष्ट्य पर्यटन स्थळात असतं, तर कधी तिथल्या आगळ्यावेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थामुळे असतं. पण ब-याचदा ते त्या गावात होऊन गेलेल्या महनीय व्यक्तीमुळेही असतं. मालगुंड जसं केशवसुतांमुळे, नाशिक जसं कुसुमाग्रजांमुळे, भगूर जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे, पालगड जसं साने गुरुजींमुळे, सासवड जसं आचार्य अत्रे यांच्यामुळे तसं डोंबिवली पु. भा. भाव्यांमुळे आणि शन्ना नवरे यांच्यामुळे अवघ्या साहित्यविश्वाला ज्ञात झालं.. भाव्यांची जातकुळी वेगळी, शन्नांची तर संपूर्णपणे वेगळी.. भावे ज्वलज्जहाल तर शन्ना रोमँटिक.. पण दोघांचं मैत्र विलक्षण होतं.. दोघंही डोंबिवलीत आहेत आणि परस्परांना भेटले नाहीत असा दिवस विरळाच.. डोंबिवलीचं ते वैभव आता राहिलं नाही.. भावेकाकांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढणारं व्यक्तिमत्त्व गेल्या तीन दशकांत तरी डोंबिवलीनं पाहिलेलं नाही. त्यामुळेच भीती अशी वाटते की, शन्नांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळीदेखील उद्या कदाचित भरायचीच राहून जाईल.. डोंबिवलीचं त्यानं होणारं नुकसान शब्दांत मांडता येईल असं वाटत नाही..


शन्ना राजकारणाच्या जवळपासही कधी फिरकले नाहीत, पण राजकारणाविषयीचं अद्ययावत ज्ञान त्यांना होतं.. अगदी ज्या गावात आपण राहतो त्या गावातील नगरसेवकापासून ते थेट आमदार-खासदारापर्यंतच्या आणि क्वचित प्रसंगी मंत्र्या-संत्र्याच्याही कुंडल्या त्यांच्याकडे मांडलेल्या असत. अ‍ॅड. नंदकुमार जोशी यांचं अकाली निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत ज्याला पक्षानं तिकीट दिलं तो उमेदवार त्यांच्या खास परिचयातला असतानाही नंदूची सर कुणालाच नाही, हे बिनधास्तपणे ऐकवण्याचं मोकळेपण त्यांच्याकडे होतं. शन्ना मिश्कील बोलायचे, त्यांना न आवडणारी गोष्ट ते बोलूनही दाखवायचे. पण ते बोलणं इतकं शर्करावगुंठीत असायचं की, शन्ना आपल्याविरोधात बोलताहेत हेदेखील त्या व्यक्तीला कळत नसे, असा तो काळ होता आणि अशी ती बेधडक वृत्तीही होती..
आता ते सारंच सरलं...