आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षणासाठी भावाला असे तयार करा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावेळी राखीपौर्णिमेला मी माझ्या भावाला दोन राख्या बांधल्या. एक सोनेरी रिबनवर रंगीत स्पंज असलेली सुंदर राखी होती, तर दुसरी अतिशय खास चांदीची हातकडी होती. ही हातकडी मी जेव्हा त्याच्या हातात घातली तेव्हा त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले. तो दचकून म्हणाला, तुला वेड लागलंय का? मी शांतपणे म्हणाले, नाही, मला वेड लागलेलं नाही, पण मला असं वाटतंय की बहुतांश भारतीय माणसे वेडी झाली आहेत. मी असं ठरवलंय की, तू काही वाह्यातपणा करून तुरुंगात जाण्याआधीच तुला अशी हातकडी घालावी. याचे कारण एवढेच आहे की, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
स्वत:ला सोडवण्यासाठी त्याने आईला हाका मारायला सुरुवात केली. गुवाहाटीतील छेडछाड, कर्नाटकमध्ये रेल्वेतून बाहेर फेकलेली मुलगी, उत्तर प्रदेशात खाप पंचायतींनी महिलांसाठी तयार केलेले मूर्ख कायदे-नियम आणि मंगलोर येथे एका खासगी पार्टीवर काही गुंडांनी केलेला हल्ला, अशा घटनांबद्दल मी त्याला सांगितले. मी म्हणाले की, या घटनांमुळे देशातील महिला किती संतापल्या आहेत.
मी निग्रहाने म्हणाले की, जर तू या सर्व घटनांबद्दल क्षमा मागितली तरच मी तुला मोकळे करीन. तो म्हणाला की, ‘अगं पण मी त्या मुलींवर हल्ला केलेला नाही.’ नंतर तो पुन्हा ओरडू लागला, ‘आई वाचव, आई वाचव!’ आई टीव्ही पाहण्यात गुंग असल्यामुळे तिला त्याचा आवाज ऐकू आला नाही, हे नशीब. त्याचा आवाज बंद करण्यासाठी मी त्याच्या तोंडात मिठाई कोंबली. कसलीही दयामाया न दाखवता मी त्याला म्हणाले की, त्या मुलीही अशाच ओरडल्या होत्या. तरीही तेथे असलेला एकही माणूस त्यांच्या मदतीला धावून आला नाही. भेकड कुठले!
मी भावाला म्हणाले की, माझ्याच नव्हे तर इतरांच्या बहिणींचेही रक्षण करण्याचे वचन तू मला दिलेस तरच ही हातकडी मी उघडीन. त्याने रागाने मान हलवली. त्यावर मी त्याला एक लेक्चर दिले. ‘लक्षात ठेव, आपल्या राज्यघटनेनुसार महिला आणि पुरुष समान आहेत. एखादा माणूस स्वत: पाश्चात्त्य शैलीचे कपडे घालत असेल आणि महिलांना तसे करण्यास मनाई करीत असेल तर त्याला तत्काळ अटक करण्याची व्यवस्था करावी.
भारतीय महिलांना जीन्स आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करणे सोयीचे आहे. कारण छेडछाड झाल्यास साडीमुळे वेगाने पळणे अशक्य असते. तसेच साडीवर जॉगिंग शूजही घालता येत नाहीत. कारण ते विचित्र दिसते. तसे केल्यास फॅशन पोलिस तुम्हाला अटक करू शकतात.’
माझा भाऊ ओरडला, ‘ठीक आहे, ठीक आहे, आई सोडव मला!’ तर वाचकहो, पाहिलेत... प्रत्येक बहिणीचे रक्षण करण्यासाठी माझा भाऊ कसा तयार झाला. जर तुम्हीही तुमच्या भावाला असे करण्यासाठी तयार केलेत तर हा देश आपल्या सर्वांसाठी सुरक्षित होईल.
रूपा गुलाब, लेखिका (चार पुस्तके प्रकाशित) गुरगाव