आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाचे आध्यात्मिक, भौतिक स्वरूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ॐगं गणपतये नम:’ या महामंत्रातून श्रीगणेशाचे आध्यात्मिक, भौतिक स्वरूप व्यक्त होते. गण अर्थात समूह, पण नेमका कशाचा समूह? गणपती म्हणजे कसल्या समूहाचा पती अर्थात स्वामी? पंचमहाभूतांचा गण- त्यांचा पती, देहातील इंद्रियसमूहांचा पती, महादेवांच्या पार्षद गणांचा मुखिया, देवगणांचा स्वामी अशी विविध स्पष्टीकरणे गणेशादी पुराणातून दिली जातात.

गणेशथर्वशीर्ष हे गणेशस्वरूप विवरणारे एक महत्त्वाचे आणि विख्यात वेदसूक्त आहे. गणेश हा केवळ शिवपुत्र अथवा पार्वतीपुत्र नसून तो साक्षात परमात्माच अशा श्रद्धेने त्याचे स्वरूप वर्णिले आहे.
हे संपूर्ण विश्व तोच निर्माण करतो, त्या वेळी तो ब्रह्मा, त्याचे पालन करण्यासाठी तो विष्णू, तर संहारासाठी तो रुद्र होतो. अशी भावना या वैदिक सूक्तात व्यक्त केली आहे. म्हणजे तो परमात्माच. हे त्याचे आध्यात्मिक स्वरूप तोच पुढे पार्वतीवर प्रसन्न होऊन तिच्या उदरी अवतरला. तो गजानन, लंबोदर, चतुर्भुज, एकदंत गणपती. हे त्याचे भौतिक स्वरूप, या दोहोंचे वर्णन या सूक्तात वर्णित आहे. गणेशगायत्री- ‘ॐगं गणपतये नम:’ या मंत्रात सांगितले आहे. ते कसे निर्माण झाले किंवा द्रष्ट्या ऋषीला त्याचे दर्शन कसे झाले याचे वर्णन, या सूक्तात तांत्रिक भाषेत करण्यात आले आहे. त्यामुळे वेदमंत्र कसे साकारत असत किंवा कसे उच्चारले जावेत, याचा एक पाठच उपलब्ध होतो. या सूक्ताच्या ऋषीच्या तप:पूत दृष्टीला जाणवले. ते त्याने असे मांडले- ‘गणादिं पूर्वमुच्चार्य’ गण शब्दाचा आरंभीचा ‘ग’ याचा उच्चार आधी अर्थात् तो कंठ्य वर्ण असल्याने कंठातूनच उच्चारला पाहिजे, नंतर ‘वर्णादिं तद््नंतरम्’ वर्णमालेचा आरंभीचा ‘अ’चा उच्चार दोन्ही मिळून (म्+अ) ‘ग’ यापुढे अनुस्वार: परतर:’ - अनुस्वार अर्थात् ‘ग’चा सजातीय ‘ङ््’ म्हणजे गङ््- अर्धेंदुलसितम्- तो अर्धचंद्राने सजवला पाहिजे- अर्थात् गङ्-गं-गँ-मग-‘तारेणऋद्धम्’ -‘तार’ म्हणजे ‘ॐ’त्याने याला संयुक्त करावे अर्थात् ॐ गं - ‘एतत्तवमनुस्वरूपम्’- हे गणेशाचे सूक्ष्म मंत्रस्वरूप होय.

यात ‘नाद:संधानम्’-या सर्वांना जोडणारा घटक म्हणजे नाद म्हणजे ध्वनि-तो लागोपाठ, कुठेच खंडित न होता, या सर्वांना जोडेल. संयुक्तपणे उच्चार होईल, तेव्हा ॐगं- ओङगङ असा होईल. हे गणेशाचे सूक्ष्म स्वरूप-पुढे त्याचे ‘गणपति’ साकार स्वरूपाचे अभिधान जोडून ‘ओङ्गङ्गणपतये नम:’ हा महामंत्र सिद्ध होईल.
हीच ‘गणेशविद्या’- विद्या म्हणजे त्या गणेशाचे मूळ स्वरूप जाणून घेण्याचे ज्ञान. विद्या हा शब्द आज आपण ज्या अर्थाने वापरतो, त्याहून वेगळा, दिव्य आशय इथे अभिप्रेत आहे. त्यामुळे श्रीगणेशाचे इंद्रियातीत, अनुभूतिजोगे स्वरूप लक्षात येते. ते समजून घेऊन श्रीगणेशाचे ध्यान करतो तो -‘योगिनांवर:’ श्रेष्ठ योगी होय, असे याच सूक्ताच्या अंती म्हटले आहे.


एकूण तो गणेश ‘कालातीत’, ‘देहातीत’ असून, तो मुळात निर्गुण, निराकार असून, ‘त्वं सच्चिदानंद-द्वितीयोऽसि’ सत् - स्थायी अस्तित्व, चित्-चैतन्य आनंद-निर्भेळ आनंद असे त्याचे वास्तव स्वरूप होय. ते या विद्येच्या अभ्यासाचे अनुभवाला येईल व असा उपासक आनंदमय होईल, हे त्याचे फळ. गणेशादिपुराणात त्याचे अवतार वर्णिले आहेत. त्याचे प्रतिबिंब या सूक्तात उमटले आहे, हे त्याचे भौतिक स्वरूप. गणेशभक्त याच स्वरूपाची मूर्तिरूपात उपासना, अर्चना करतात. वैदिक परंपरेत पृथ्वीतत्त्वाचे खूपच महत्त्व आहे. म्हणून पार्थिवाची पूजा करावी असे विधान आहे. वाळू, माती, पाषाण लागूड हे सर्व पार्थिवच, कारण ते पृथ्वीतून उत्पन्न होतात. पंच पार्थिवाची उपासना या देवराष्ट्रात प्राचीन काळापासून चालत आली आहे. आषाढ अमावास्येला मातीचा दीप, नागपंचमीला मातीचा नाग, जन्माष्टमी मृण्मय गोकुळ, पोळ्याला मातीचे बैल आणि गणेशचतुर्थीला मृण्मयी गणेशमूर्ती अशी ही पंच पार्थिवपूजा आपले पूर्वज करीत आले, तीच परंपरा आज तशीच चालू आहे.


आकार म्हटले विकार, नाश ठरलेलाच, परंतु या स्थूलातून सूक्ष्माकडे जायचे आहे. तेव्हा श्रीगणेशाच्या स्थूल रूपाकडून सूक्ष्म-आनंदमय स्वरूपाकडे जायचे असेल, तर ही गणेशविद्या अत्यंत उपयुक्त ठरते, ती योग्य दिशेने-एखाद्या अशा श्रेष्ठ अनुभवी योग्याकडून शिकून घ्यावी. त्याने जो विधि, पथ्ये, नियम सांगितले असतील, ते काटेकोर पाळावेत. मग आनंदानुभूती येईलच, यात संदेह नाही.


लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रयोग समाजप्रबोधनार्थ केला. तो यथार्थच होता. त्या काळी त्यात समाजकारणच प्रमुखत: असायचे, राजकारण कोसो दूर असायचे, परंतु आज?... आज मात्र त्याचे स्वरूप... ते सर्वानाच ठाऊक आहे. ते निराळे सांगावे लागत नाही. शेवटी त्या गणेशाने सर्वांना सद्बुद्धी द्यावी, या देवराष्ट्राचे रक्षण करण्याइतपत बळ द्यावे, ही त्याच्या चरणी प्रार्थना.