आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्म्याचे स्मरण (अग्रलेख )

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नथुराम महाराष्‍ट्राचा. गांधीजी गुजरातचे. आता नरेंद्र मोदी गुजरातचे, पण त्यांचा पंथ नथुरामचा. म्हणजे महाराष्‍ट्राचा हा विजय की पराजय? कारण मोदींचे आणि नथुरामचे तत्त्वज्ञान एकच. प्रवृत्तीही एकच. बरोबर 65 वर्षांपूर्वी नथुरामने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले की, असा महात्मा भूतलावर होऊन गेला यावर भविष्यातील पिढ्या विश्वासही ठेवणार नाहीत. गांधीजींच्या नावे स्थावर-जंगम मालमत्ता नव्हती. गांधीजीही कुणी थोर वैज्ञानिक नव्हते वा साहित्यिक. ते कुणी धनाढ्य असामी नव्हते वा कुणी ‘स्टार’! ते अमोघ वक्ते नव्हते वा कुणी विलक्षण कलाकार. त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते वा अधिकार. लौकिक अर्थाने ते काँग्रेस पक्षाचे सदस्यही नव्हते. तरीही त्यांच्या हत्येने अवघे जग हळहळले. दोन वर्षांपूर्वी नोबेल पुरस्कार समितीने म्हटले की, गांधीजींना तो पुरस्कार दिला गेला नाही हे नोबेल समितीला लांच्छन आणणारे आहे. नथुरामला वाटले होते की, गांधीजींना गोळ्या घालून महात्म्याला इतिहासात गाडता येईल.

पण झाले उलटेच. महात्मा अजरामर झाले. अगदी संघ परिवारालाही प्रात:स्मरणीय झाले! पुढे तर संघप्रणीत भाजपने गांधीवादी विचारसरणीही स्वीकारल्याचे जाहीर केले. भारतात शहाजोगपणालाही प्रतिष्ठा प्राप्त होते. नथुरामवर हिंदुत्ववादी विचारसरणीचा संस्कार होता; परंतु राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले की, नथुरामचा व त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र, परिवारात अगदी आजही नथुरामचे चाहते आहेत. नथुरामची जयंतीही काही मंडळी साजरी करतात. ‘मी नथुराम बोलतोय’ हे नाटक गहिवरून पाहणारी मंडळीही संघ परिवारातलीच असतात. आजही गांधीजींची हत्या केली हे योग्यच होते, असे मानणारे नथुरामवादी देशात कमी नाहीत. किंबहुना नरेंद्र मोदींच्या रूपाने नथुरामनेच पुनर्जन्म तर घेतला नाही ना, असेही कुणी विचारू शकेल! नरेंद्र मोदी आता थेट पंतप्रधानपदासाठी दावा करू लागले आहेत. म्हणजेच नथुरामलाच आता पंतप्रधान करण्यासारखे आहे, असे म्हणता येईल! कुणी म्हणेल केवढा हा दैवदुर्विलास! संघ परिवार म्हणेल हा तर विपर्यास! तर कुणी म्हणेल हा विडंबनाचाच इतिहास. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साडेपाच महिन्यांत गांधीजींची हत्या झाली. गांधीजी तेव्हा 79 वर्षांचे होते. गांधीजी म्हणत की ते 125 वर्षे जगणार. म्हणजे गांधीजींची हत्या करून नथुरामने त्यांच्या आयुष्यातील 46 वर्षे कमी केली. गांधीजी खरोखरच 125 वर्षे हयात असते तर त्यांचा नैसर्गिक अंत 1994 मध्ये झाला असता. म्हणजे स्वातंत्र्योत्तर 47 वर्षे त्यांना पाहायला मिळाली असती. फाळणी तर त्यांच्यादेखतच झाली होती; पण त्यांना वाटत होते की, फाळणीचे व्रण काही वर्षांनी दूर होतील.

भारतीय उपखंड एक महा-संघराज्य म्हणून उभे राहील. त्यांचे स्वप्न पुरे तर झाले नाहीच; पण भारतीय उपखंड हा एक हिंस्र, धर्मविद्वेषाने पछाडलेला आणि भौगोलिकतेने विस्कटलेला प्रदेश झाला. गांधीजी म्हणत की, हिंदू-मुस्लिम सहजीवन हे आवश्यकच नव्हे, तर अपरिहार्य आहे. जर या दोघांमध्ये विद्वेषाचे विष भिनले तर सर्वनाश ओढवेल. म्हणूनच ते म्हणत, ‘ईश्वर अल्ला तेरो नाम - सब को सन्मती दे भगवान.’ भगवानाने ती सन्मती दिली नसावी. कारण आजही ते धर्मविद्वेषाचे विष या भारतीय उपखंडात भिनलेले आहे. ज्या महंमद अली जिनांनी ते धर्मविद्वेषाचे राजकारण रुजवले ते जिना स्वत: व्यक्तिगत जीवनात मात्र ‘सेक्युलर’ होते. आता तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व जसवंत सिंग हे सुद्धा जिनांचा गुणगौरव करतात. गांधीजींच्या हत्येनंतर सुमारे 10 महिन्यांनी जिना मरण पावले. म्हणजे फाळणी व स्वातंत्र्यानंतर वर्षभराच्या आसपास गांधीजी व जिना दोघेही काळाच्या पडद्याआड गेले; पण पाकिस्तानने जिनांच्या तत्त्वज्ञानालाही हरताळ फासला.

जिनांना उदारमतवादी सेक्युलर राजवट हवी होती, असे त्यांचे चरित्रकार व समर्थक सांगतात; पण त्यांचा वारसा सांगून राज्य करणा-यांनी भारतविरोध हेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र केले. परंतु इस्लामच्या नावाखाली देश एकत्र राहू शकला नाही. पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेश स्वतंत्र झाला. सेक्युलर भारत मात्र एकात्मता टिकवू शकला. धर्माच्या आधारावर राष्‍ट्र उभे करता येत नाही हे सिद्ध झाले. पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा कोणतेही मुस्लिम राष्‍ट्र पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले नाही. पाकिस्तानला पाठिंबा मिळाला तो अमेरिकेचा - कोणत्याही अरब वा इस्लामी राष्‍ट्राचा नाही. पाकिस्तान दुभंगल्यानंतर द्विराष्‍ट्र सिद्धांतही कोसळला. जिनांचे तत्त्वज्ञान अर्थशून्य ठरले. जिनांचेच नव्हे, तर हिंदुत्ववाद्यांचे तत्त्वज्ञानही उधळले गेले. अजूनही काही अतिरेकी हिंदुत्ववाद्यांना ‘हिंदुस्थान’ उभा करावा, असे वाटते. तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र बलुचिस्तान वेगळा होऊ पाहत आहे. आता सिंध व पंजाब एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना दिसत आहेत. म्हणजे इतिहासातून कोणताच धर्मवादी काही शिकत नाही हे आपण पाहत आहोत. अशा संकुचित धर्मवादातून दहशतवाद जन्माला येतो. नथुरामला कुणी ‘दहशतवादी’ म्हणत नाही; पण गांधीजींची हत्या हिंदूने केली, इंदिरा गांधींची हत्या शीख अतिरेक्यांनी केली आणि राजीव गांधींची हत्या तामिळ अतिरेक्यांनी केली. दहशतवादाला धर्म नसतो, रंग नसतो, विचार नसतो. बरोबर 65 वर्षांपूर्वी नथुरामने गांधीजींची हत्या करून गांधीजी व त्यांचे तत्त्वज्ञान अजरामर केले. त्या गांधीजींच्या स्मृतीस आमचा प्रणाम!