आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ईश्वर और मौत को हमेशा याद रखो’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमालय रांगांमधील उंच उंच शिखरांवर विराजमान देवदेवतांचे दर्शन पुढचा काही काळ दैवदुर्लभ होण्याचेच थेट संकेत सध्या उत्तराखंडात सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवाने दिले आहेत. निसर्गाचा प्रकोप लक्षात घेतला अन् त्या अल्पशा प्रकोपाने ज्या पद्धतीने उत्तरखंडातील जनजीवन, डोंगरद-या, इमारती केवळ उद्ध्वस्त न करता नामशेष करून टाकल्या हे पाहता येत्या वर्ष-दोन वर्षांच्या कालावधीमध्ये गंगोत्री-यमुनोत्री-केदारनाथ-बद्रीनाथ या देशातील चार धामांपैकी प्रमुख म्हणून गणल्या जाणा-या तीर्थस्थळांपासून भाविकांना आता ख-या अर्थाने कोसोदूर राहण्याची पाळी येणार आहे. ‘सारे तीरथ बार बार, केदारनाथ और बद्रीनाथ एकही बार’ याचा प्रत्यय भाविकांना याचि देही याचि डोळा आल्यावाचून राहणार नाही. श्रद्धा वा धार्मिक भावना असणे मुळीच वावगे नाही वा नसावे, पण भावनातिरेक झाला की त्यातून पुढे काय काय वाढून ठेवले जाऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे उत्तराखंडातील निसर्गाचा हा प्रलय.


जुन्या जमान्यातील बुजुर्ग मंडळी चार धाम यात्रेला निघायची म्हणजेच सर्व तयारीनिशी. कुटुंबातील लहानमोठ्यांचे शिक्षण, भाऊबंदकीतील वाटेहिस्से, राहून गेलेली लग्नकार्ये, शेजार-पाजारच्यांची उधार उसनवारी, अर्धवट सुटलेली कामे आदी सर्व कामे मार्गी लावूनच बुजुर्ग मंडळी चार धाम यात्रेला निघायच्या दृष्टीने तयारीला लागायची. त्या काळातील मंडळी या बारीकसारीक गोष्टींचा गांभीर्याने विचार करून का निघत असावी याचे स्पष्ट उत्तर उत्तराखंडातील निसर्गाच्या प्रलयामध्ये शोधले पाहिजे, किंबहुना त्यातच त्याचे गुपित असले पाहिजे. पर्यटक अधिक अन् काळानुरूप भाविक अशा दुहेरी भूमिकेतून हिमालयातील गंगोत्री-यमुनोत्री-केदारनाथ-बद्रीनाथ या चार तीर्थस्थळांना भेटी देण्याचा योग सुमारे दीड दशकापूर्वी आम्हा मित्रमंडळीला आला होता. त्या वेळी आम्ही सर्वच विनापाश असल्याने बायको वा मुलाबाळांचा विचार नव्हता. हात-पाय चालताहेत, प्रवासाचा खर्च कमी, राहण्या-खाण्याची सोयही कमी पैशात होणार असा तो काळ होता. आताचा उत्तराखंड अन् पूर्वाश्रमीचा गढवाल परिसर म्हणून परिचित असलेल्या हृषीकेश वा हरिद्वार येथून केदारनाथ-बद्रीनाथ तीर्थस्थळाच्या सुमारे तीनशे किलोमीटरच्या खडतर यात्रेला सुरुवात होते. हिमालयाची उंचच उंच शिखरे, त्यामध्ये भारतीय सैन्याच्या मदतीने तसेच देखरेखीखाली डोंगर-द-यांमध्ये उभारलेले वळणदार रस्ते, ठिकठिकाणच्या प्रमुख गावांमध्ये मुक्कामासाठी बांधलेली हॉटेल्स यांसारख्या सुविधांमुळे हरिद्वार ते बद्रीनाथची वाट पर्यटक असो की भाविक, त्यांना आकर्षित करीत असते. जोपर्यंत तुम्ही वाहनातून प्रवास करता तोवर सर्व काही ठीक असते.

केदारनाथाचे दर्शन घ्यायचे असेल तर गौरीकुंडपासून चौदा किलोमीटरचा प्रवास हा पायी अथवा घोड्यावरून अथवा खेचरावरून करावा लागतो. अशातच हवामान बदलले आणि त्याने समजा रौद्र रूप धारण केले तर काय होऊ शकते याची अनुभूती अवघे देशवासीय उत्तराखंडातील प्रकोपाच्या रूपाने घेत आहेत. 1991 च्या सुमारास अशाच प्रकोपाची प्रचिती आम्हा मित्रांना आली होती. आज जसे ठिकठिकाणी रस्ते तुटले वा डोंगरावरून अतिवेगाने कोसळणा-या मलब्याने काही किलोमीटरचे रस्ते नामशेष करून टाकले अगदी तसाच अनुभव आम्ही घेतला होता. बद्रीनाथपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावरील जोशी मठामध्ये तब्बल चार दिवस आम्हाला आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर दुस-या टप्प्यामध्ये केदारनाथच्या वाटेवर अडकून पडण्याचा अनुभव आला होता. एक प्रचंड मोठी शिळा डोंगरावरून घरंगळत येऊन रस्त्यात पडल्याने केदारनाथचा रस्ता तीन ते चार दिवसांसाठी बंद पडला होता. त्याही वेळी म्हशीच्या गोठ्यात रात्र काढण्याची वेळ आमच्यावर आली होती. एका रात्रीसाठी त्या काळी प्रत्येकी दीडशे रुपये आणि एक मूद भातासाठी शंभर रुपये गोठा मालकाला मोजावे लागले होते. ही सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी विशद करण्याचे कारण म्हणजे पूर्वीच्या जमान्यात बुजुर्ग मंडळी चार धाम यात्रेला निघाली की सर्व तयारीनिशी का निघत असावी याचे उत्तर यामध्ये सापडू शकेल.
प्रगत तंत्रज्ञान, मनुष्यबळ, अजस्र शक्तीची यंत्रसामग्री याच्या साह्याने हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये दळणवळणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. देश-विदेशातील भाविक तसेच पर्यटक त्या सोयी-सुविधांचा उपभोगही गेली अनेक दशके घेत आले; पण भावनातिरेक वेळीच रोखण्यामध्ये राज्यकर्ते, प्रशासन, सेवाभावी तसेच धार्मिक संस्था, साधू-महंत अन् भाविक कुचकामी ठरले. त्याचाच परिपाक म्हणजे उत्तराखंडातील निसर्गाचा कोप. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि त्यातून प्रदेशाला प्रचंड उत्पन्न मिळते आहे म्हणून डोंगरद-यांतील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली गेली. डोंगरांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊ लागले. त्यामध्ये नैसर्गिक स्रोतांचा संकोच सर्रास केला गेला.

केदारनाथ मंदिराच्या परिसराला कच्च्या बांधकामांचा विळखा पडत गेला आणि दिवसागणिक हा फास अधिक आवळला गेल्यावरही प्रशासनाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. आज केदारनाथमध्ये जी स्थिती दिसते आहे तशी दोन दशकांपूर्वी नव्हती. तेव्हा काही बांधकामे नुकतीच सुरू झाली होती. बद्रीनाथ तीर्थक्षेत्रीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती आढळून आली नव्हती. बाबा बर्फानी अर्थात बाबा अमरनाथ यात्रा हा तर गेल्या काही वर्षांपासून संवेदनशील मुद्दा होऊन बसला आहे. थेट काश्मीरमध्येच ही यात्रा होत असल्यामुळे तिला धार्मिक तसेच प्रांतीय मुद्दे जोडले गेले आहेत. अमरनाथ यात्रादेखील अगदी सुरुवातीच्या काळात शांततेत विनाविघ्न पार पडत असे. त्याही यात्रेचा अनुभव मी स्वत: अनेक वेळा घेतला आहे. शेकड्यामध्ये वा नंतरच्या काळात केवळ काही हजारांमध्ये भाविक बाबा अमरनाथच्या गुहेमध्ये जाऊन तब्बल सतरा ते अठरा फुटी बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेत. चंदनवाडीपासून बाबा अमरनाथ यांच्या गुहेचे अंतर तब्बल पस्तीस किलोमीटरचे, पण हा संपूर्ण टापू थेट हिमालयात असल्याने वर्षभरातील बव्हंशी महिने बर्फाच्छादित असतो. अशा ठिकाणी असलेल्या एका गुहेत लाखोंच्या संख्येने भाविक तुटून पडू लागल्यावर यात्रेच्या सुरुवातीच्या काही दिवसांचा अपवाद वगळला तर बर्फाचे शिवलिंग नजरेस पडत नाही. तेथेही भावनातिरेकाचाच मुद्दा पुढे येतो, तो असा- शिवलिंग बर्फापासून नैसर्गिकरीत्या तयार होत असताना त्यावर नाणी, चांदीचा मुकुट, कुंकू, हळद वाहिली जाणार असेल तर ते वितळणारच, मग याचा दोष बाबा अमरनाथाचा की भाविकांच्या भावनातिरेकाचा? याचाही विचार व्हायला हवा. असो.


उत्तराखंडातील निसर्गाच्या तांडवाने सध्या अवघा देश हादरला आहे. मृतांचा आकडा आजवर तरी शेकडोवरच अडकला आहे, तो हळूहळू हजाराकडे सरकण्याची भीती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीला देशातील अन्य सहा राज्यांतील प्रशासकीय यंत्रणाही धावून गेली आहे. कोट्यवधींचा निधी मदतकार्यासाठी मिळत आहे. तेव्हा अन् आजच्या स्थितीची तुलना करता प्रशासनाने या वेळी बरीच तत्परता दाखवली आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी ज्या रीतीने आर्थिक तसेच मनुष्यबळाच्या रूपाने उत्तराखंडात अडकलेल्या हजारो भाविकांना मदतीचा हात दिला तोही दिलासादायक आहे. केदारनाथकडे जाणा-या खडतर मार्गावरचा ‘ईश्वर और मौत को हमेशा याद रखो’ हा फलक निसर्ग प्रकोपाची आठवण पदोपदी स्मरणात ठेवण्यास पुरेसा आहे.