आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मलकुमारांची व्युत्पन्नता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. गं. बा. सरदारांसारख्या दिग्गज प्रबोधनकारांच्या पाऊलखुणांचा शोध घेत त्यांनी वाटचाल केली. त्यांचे व माझे ज्येष्ठ मित्र डॉ. मा. पं. मंगुडकर हे रॉयिस्ट-रॅडिकल ह्यूमॅनिस्ट-नवमानवतावादी होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर व निर्मलकुमारांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. आमच्याबरोबर महाविद्यालयात असतानाच डॉ. य. दि. फडके, निर्मलकुमार व डॉ. मंगुडकर ‘वक्ते’ म्हणून नावाजले जाऊ लागले. निर्मलकुमार भगवान महावीर, जैनदर्शन यांच्याविषयी जसे बोलत, त्याचप्रमाणे बाबासाहेबांवर व प्रचलित सामाजिक प्रश्नावरही बोलत. आचार्य अत्र्यांच्या वक्तृत्वशैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या व्याख्यानात मार्मिक विनोदाची पखरण असे.

निर्मलकुमारांचे वडील पं. जिनदासशास्त्री फडकुले हे स्वत:च संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित होते. ते ‘जैनबोधक’ या नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचे रसाळ वाचन व व्यासंग अफाट होता. वाणीही अत्यंत प्रवाही, शुद्ध आणि रसाळ होती. हा वारसा निर्मलकुमारांना लाभला होता. त्यामुळे संस्कृत गं्रथाचे त्यांचे वाचन त्यांंच्या व्युत्पन्नतेला साहाय्यभूत ठरणे स्वाभाविक होते. जैन धर्माची भाषा तत्कालीन प्राकृत, अर्धमागधी ही होती. निर्मलकुमारांनी अर्धमागधी भाषेचा व साहित्याचाही अभ्यास केलेला होता. आमच्या काळात म्हणजे 1951 ते 53 मध्ये पुणे विद्यापीठाच्या एम. ए. ( मराठी)च्या पाठ्यक्रमात भाषाविज्ञानात पाली व अन्य प्राकृत भाषांचा अभ्यासही असे. त्यामुळे आम्हा सर्वांची या भाषांशी तोंडओळख तरी नक्कीच असे. बौद्धधर्माचा ‘धम्मपद’ हा ग्रंथ पालीत आहे. त्याचे आकलन होणेही त्यामुळे सुलभ होत असे.

मी आणि निर्मलकुमारांनी एम. ए. ला हिंदी हाही विषय घेतला होता. आम्हाला हिंदी साहित्यातही रुची होती. त्याचा फार चांगला व चपखल उपयोग निर्मलकुमारांनी आपल्या वक्तृत्वात दाखले देण्यासाठी केला. महत्त्वाच्या इंग्रजी लेखकांचे क्लासिक ग्रंथ त्यांनी अभ्यासले असल्याने त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व वक्तृत्व व लेखन अधिक समृद्ध व व्युत्पन्न होत गेले. प्रा. शिवाजीराव भोसले तर माझे साताराचेच मित्र. निर्मलकुमारासह आमच्या गाठीभेटी होत असत. शिवाजीराव व्याख्यानासाठी उतारेच्या उतारे मुखोद्गत ठेवत, हे मी पाहिलं आणि अनुभवलं आहे, पण शिवाजीरावांचे बोलणे नि व्याख्यान अक्षरश: इतके गतिमान असे की त्यांचे शब्द ‘कॅच’ करण्यासाठी श्रोत्यांना त्या शब्दांमागे धावावं लागे. यामागेही त्यांची समृद्ध आणि संपन्न व्युत्पन्नताच होती. निर्मलकुमारांचे व्याख्यान ऐकताना श्रोत्यांना धावपळ करावी लागत नसे. त्यांची शैली धारावाहिक असली तरी कोणत्या शब्दावर व अक्षरावर स्ट्रेस द्यायचा नि कु ठं पॉज घ्यायचा याचे विलक्षण कौशल्य त्यांनी हस्तगत केले होते. त्यांची व्युत्पन्नता श्रोत्यांना चमकावून टाकण्यासाठी, थक्क करण्यासाठी वा अवाक् करण्यासाठी नव्हती, तर त्यांच्या प्रतिपाद्याला पुष्टी देणारी व समर्थन करणारी होती. त्यातील युक्तिसंगततेचा यामुळेही प्रभाव पडे. त्यामुळे त्यांचे व्याख्यान कितीही वेळ चाललं तरी ते ऐकत राहावंसंच श्रोत्यांना वाटे. त्यांच्या व्याख्यानातून उठून जाणारा श्रोता कधी कुणाला शोधूनही
सापडत नसे.

प्रा. ना. सी. फडके कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तर्कशास्त्र(लॉजिक) व तत्त्वज्ञान(फिलॉसॉफी) शिकवत. त्यांचे वर्ग त्यांच्या विषयाच्या विद्यार्थ्याबरोबरच इतर विषयांच्या विद्यार्थ्यांनीही खच्चून भरलेले असत. हे त्यांचे विद्यार्थी मित्र व प्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांनी अनेकदा पाहिलं आणि अनुभवलं असून त्यांनी मला सांगितलेही होते. हाच प्रकार निर्मलकुमारांच्या संगमेश्वर महाविद्यालयातील तासांनाही होई. त्यांचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यातून भरभरून ओसंडणारी त्यांची व्युत्पन्नता होय. त्यामुळेही त्यांच्या व्याख्यानात गर्दी करणारे श्रोते अक्षरश: मंत्रमुग्ध होत असत. असे भाग्य आज मराठीच्या किती प्राध्यापकांना लाभलेले आहे, याचं संशोधनदेखील करण्याची गरज नाही.

जाणकार व जिज्ञासू श्रवणार्थीना हा व्युत्पन्नता समृद्धी ‘ग्रंथार्थी’ मनापासून दशकानुदशक भावला. त्यांनी त्यावर मोहिनी टाकली, ती उगीच नव्हे! ज्यांना ‘अँ अँ’ केल्याशिवाय धड चार शब्द बोलता येत नाहीत, असे काही अपवादात्मक प्राध्यापक ‘आम्हाला शब्दबंबाळ वक्ते आवडत नाहीत’ असे म्हणून आपले अपयश लपवतात. त्यांना निर्मलकुमारांची वैभवसंपन्न शब्दसृष्टी ओशाळायला लावण्यासारखीच होती. तिचं सामर्थ्य नि ऊर्जाही त्यांच्या व्युत्पन्नतेत दडली होती. हे कोणालाही अमान्य करता येईल, असंही मला वाटत नाही. व्युत्पन्नतेमुळे निर्मलकुमारांच्या भाषणांत व नेहमीच्या बोलण्यात एक विलक्षण आशयसघनता येत असे. श्रोत्यांच्या विचारविश्वात व भाषाविश्वात आपलं स्वत:चे असं व्यवच्छेदकत्व निर्माण करत असे.
एका अठ्ठावीस जुलैबरोबर निर्मलकुमारांबरोबरच त्यांचे हे व्युत्पन्न युगही अस्तंगत झाले. याची व्यथा मराठी माणसांच्या मनात सतत सलत राहील