आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळणीच्या दुर्दैवी इतिहासाचे स्मरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतमातेची फाळणी. रक्ताचे अश्रू यावेत अशी घटना. १४ आॅगस्ट १९४७ची आठवण येऊन आजही अनेकांच्या पोटात कालवाकालव होते. शेजारील पाकिस्तानातही काही लोकांचे डोळे नक्कीच ओले होत असतील. शेकडो वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या बांधवांमध्ये इतकी मोठी दरी निर्माण व्हावी, अशी काय आपत्ती आली होती, याचा विचार प्रत्येक सुज्ञ माणूस करत असणार. आपल्याच पूर्वजांच्या भूमीचे तुकडे पाडले गेले. मूठभर धर्मांधांनी आपल्या मनातील विकृतीला तत्त्वज्ञान बनवले अन् शेकडो वर्षांपासून रुजलेली मानवता दानवतेत परावर्तित झाली. ज्या भूमीला पाक स्थान म्हटले गेले. पंजाब, अफगाणिस्तान, काश्मीर, सिंध या प्रांतांच्या आद्याक्षरांनी पाकिस्तान बनल्याचे सांगितले गेले. ‘तान’ शब्द जोडणाऱ्यांना माहीत नाही की हिंदी शब्द ‘स्थान’चे अपभ्रंश म्हणजे ‘तान’. मुस्लिम लीगने पाकिस्तानला ओढूनताणून इस्लामशी जोडण्याचा प्रयत्न केला. पण वास्तव तर हे आहे की, भारतमातेच्या भिन्न भिन्न प्रांतांची नावे घेऊनच पाकिस्तान शब्दाची निर्मिती झाली. भारतीय शब्दांवर इस्लामी कट्टरतेचा लेप देऊन आपली इस्लामी कट्टरता शमवण्याचा प्रयत्न झाला. बंगालविषयी मनात थोडी जरी प्रेमभावना असती तर पाकिस्तान या शब्दात ‘ब’ अक्षराचा समावेश करण्यात आला असता. हे स्पष्टच आहे की, देशाच्या फाळणीमागे कट्टरवादी इस्लामी मानसिकता होती. पण त्यांना भारतीय शब्द वापरूनच त्या देशाचे नाव ठेवावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. 

७० वर्षांनंतरही फाळणीची ही जखम बरी झालेली नाही. भारत ही घटना विसरू शकलेला नाही. त्यामुळेच आजही दरवर्षी १४ आॅगस्ट रोजी आपल्या देशातील असंख्य राष्ट्रवादी अखंड भारत दिवस साजरा करतात. यानिमित्ताने अखंड भारताचा संकल्प करण्यात येतो. पाकिस्तान एक अनैसर्गिक देश आहे. त्या देशाला आपल्या पूर्व भागाला सोबत ठेवता आले नाही. पूर्व भाग म्हणजे पूर्व पाकिस्तान. तो भाग बांगलादेशाच्या रूपाने स्वतंत्र झाला. जो दुसऱ्यांना तोडतो, वेळ आल्यावर त्याचे तुकडे त्याचेच लोक करतात, हाच बोध यातून मिळतो.  

१९४७ ला फाळणी झाली तेव्हा अनेक लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. अनेकांना आपले सर्वस्व गमावावे लागले. पंजाब सरकारच्या मदतीने ‘दि आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ट्रस्ट’द्वारे संग्रहालयाची निर्मिती झाली आहे. उद््घाटनासाठी भव्य समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी संग्रहालयाचा पडदा मुख्यमंत्र्यांनी दूर सारला तेव्हा वातावरण भावूक झाले होते. ऐतिहासिक टाऊन हाॅलमध्ये हे संग्रहालय बनवण्यात आले आहे. तेथे उद््घाटन झाल्यावर एक मिनिट स्तब्ध राहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  

कॅप्टन अमरिंदर यांनी आपल्या भाषणात या संग्रहालयाची रूपरेषा तयार करणाऱ्या मेघनाथ देसाई यांच्या प्रयत्नांचा गौरव केला. त्यांनी म्हटले की, या संग्रहालयामुळे तरुणाईला इतिहास समजून घ्यायला मदत होईल. कोणताही देश आपल्या इतिहासातून बोध घेऊनच काही चांगल्या गोष्टी करू शकतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या वेळी फाळणीच्या काळातील आपल्या आठवणी जागवल्या. लहानपणी ते सिमला येथील त्यांच्या वसतिगृहातून घरी चालले होते तेव्हा खिडकीचा पडदा दूर केला तेव्हा बसस्थानकावर मृतदेहांचा खच पडल्याचे दिसून आले. ती घटना आजही मला अस्वस्थ करते, असे ते म्हणाले. त्यांनी आपली राजमाता मोहिंदर कौर यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. त्यांनी असंख्य शरणार्थी मुलींना आपल्या घरात आश्रय दिला होता.  कॅप्टन अमरिंदर म्हणाले की, फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार भारतात राहिलेल्या काही मुस्लिम मुलींना पाकिस्तानला पाठवण्यात आले. खरे तर त्या येथे राहण्यास इच्छुक होत्या. आपल्या मुलांना सोडून पाकिस्तानला जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. अशाच प्रकारे पाकिस्तानने हिंदू मुलींना भारतात पाठवून दिले तेव्हा त्यांच्या राहण्याची व्यवस्था राजमातेने केली होती. पंजाब सरकारने १७ आॅगस्ट हा दिवस ‘पार्टिशन रिमेंबरन्स डे’ म्हण्ून घोषित केला आहे. याच दिवशी संग्रहालयाचे उद््घाटन करण्यात आले. 

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनी तयार केलेल्या या संग्रहालयात शेकडो महिला आणि पुरुषांनी पहिल्यांदाच फाळणीचे दु:ख जाणून घेतले, जे त्यांच्या आई वडिलांनी भोगले होते. या वेळी माजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, या संग्रहालयाची स्थापना झाल्याने इतिहासातील अनेक घटनांवर प्रकाश पडणार आहे. हे संग्रहालय म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीमुळे जे दु:ख, वेदना सहन करण्याची वेळ आली त्याचे प्रतिबिंब आहे. 

फाळणीच्या वेळी मानवता पायदळी तुडवली गेली. पावलापावलावर अविश्वास होता. अशा वेळी मानवतेचे मित्र आणि देशभक्तीचे कैवारी यांनी मानवतेची जी सेवा केली त्याचे बोलके चित्र या संग्रहालयात आहे. या भयानक घटनेने खरे तर जगाला एक बोध मिळाला आहे. फाळणी माणुसकीचे तुकडे करते. पण अशा वेळीही खरी मानवता दु:खी लोकांचा आधार बनते. 
आमचे हे संग्रहालय त्या लोकांसाठी धडा आहे की जे सत्तेच्या नशेत येऊन धर्माच्या नावाखाली माणसांची वाटणी करतात. उर्दू कवी सआदत हसन मंटो यांची भावना या संग्रहालयातून प्रतिबिंबित झाली आहे. मंटो यांनी पंजाबच्या विभाजनावर अतिशय हृदयस्पर्शी पुस्तक लिहिले आहे. 

हे पुस्तक वाचून डोळ्यांत अश्रू येणार नाही, हे शक्यच नाही. मंटो हे अमृतसरचे होते. वकील वाडी येथे त्यांचे घर होते. फाळणीच्या वेळी उसळलेल्या दंगलीत ४० टक्के घरे उद्ध्वस्त झाली होती. यावर मंटो लिहितात, ‘मेरा प्यारा नगर एक कब्र बन गया था जिस में न जाने कौन कौन दफन हैं.’ आपले उद्ध्वस्त घर म्हणजे जणू स्मशानातील थडगे आहे, असे वर्णन ते करता. ते म्हणतात, ‘अपनों को और परायों को कहां ढूंढू? मैं तो पागल हो कर पंजाबियत को ढूंढ रहा हूूं’. 
या संग्रहालयात १९४७ शी संबंधित छायाचित्रे, पेंटिंग्ज आणि व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले आहेत. जो कोणी हे संग्रहालय पाहील त्याच्या डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...