आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्क गमावलेले ‘पारंपरिक मच्छीमार’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मच्छीमारी ही माणसाच्या उपजीविकेच्या प्राचीन साधनांपैकी एक. समुद्र, खाडी व नदीकिना-या लगत पिढ्यांपिढ्या राहणा-या काही समाजांनी मच्छीमारीचे कौशल्य आत्मसात केले. अगदी अलीकडेपर्यंत, म्हणजे 50-60 वर्षांपूर्वीपर्यंत मच्छीमारी ही त्याच समाजांची मक्तेदारी होती. ही मच्छीमारी मर्यादित होती. ‘माझे पोट भरेल’ असा स्वत:पुरता विचार मासेमार करत असे. घरातील सर्वांनी पोटभर खाऊन झाल्यावर मासे उरलेच, तर स्थानिक बाजारात म्हणजे गावातील मासे खाणा-या ना किंवा आठवडा बाजार भरतात तिथे विकले जात. विसाव्या शतकाअखेरीस मात्र चित्र बदलू लागले. मच्छीमारीसाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. मानवी श्रम आणि कौशल्याची जागा यांत्रिक बोटींनी घेतली. त्याद्वारे मच्छीमारी करण्यासाठी पिढीजात ज्ञान व कौशल्यांची आवश्यकता उरली नाही. त्यामुळे मच्छीमारीचे ‘किना-या लगत राहणा-या ठरावीक समाजांचे उपजीविकेचे साधन’ असे स्वरूप बदलून तिला व्यवसायाचे स्वरूप आले. या व्यवसायात इतर समाजांचे, ज्यांचा पूर्वी समुद्राशी संबंधही आला नव्हता, असेही लोक उतरले.

आपल्याकडे साधारणपणे 1960च्या दशकापासून मच्छीमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊ लागले. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माशांना मागणी वाढली, तसे पारंपरिक मच्छीमारांव्यतिरिक्त इतर लोक- ज्यांच्याकडे यांत्रिक मच्छीमारीत गुंतवणूक करण्यासाठी भांडवल होते, असे व्यावसायिक मच्छीमारीत उतरले. मोठ्या यांत्रिक बोटी, आधुनिक जाळी यामुळे या मच्छीमारांचा पल्ला वाढला. यांत्रिक बोटींकडून स्पर्धा निर्माण झाल्यामुळे, एरवी पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणा-या नाही यांत्रिकीकरण गरजेचे वाटू लागले. आपापल्या परीने त्यांनी होड्यांना इंजिने बसवून घेतली. त्यामुळे छोट्या मच्छीमारांना परंपरागत होते त्याहून मोठ्या, दूरवरील क्षेत्रात मच्छीमारीसाठी जाणे शक्य झाले. आता अशा इंजिन लावलेल्या होड्या वापरून केल्या जाणा-या मच्छीमारीला ‘पारंपरिक पद्धतीची मच्छीमारी’ म्हणावे का; तर, या संदर्भात ‘नॅशनल फिशवर्कर्स फोरम’(एनएफएफ)चे म्हणणे आहे, की ‘यांत्रिक बोटीवर जाळे टाकण्या-ओढण्यासाठी यंत्रांची मदत घेतली जाते. याउलट छोट्या मच्छीमारांनी होडीला इंजिन बसवले असले तरी जाळे टाकण्या-ओढण्यासाठी यंत्राची मदत घेतली जात नाही. केवळ मनुष्यबळ वापरले जाते. म्हणून या मच्छीमारीला पारंपरिक म्हणावे.’ परंतु या भूमिकेला सरकारी दुजोरा नसल्याचे दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यातील वरवडा गावात पारंपरिक गिल जाळ्याने मच्छीमारी करणा-या ची संख्या मोठी आहे. यातील बहुतेकांनी होड्यांना इंजिन बसवून घेतले आहे. गिल जाळे पारंपरिक पद्धतीचे असल्याने आमच्या मासेमारीला पारंपरिक म्हणावे, अशी यांची मागणी आहे. परंतु शासनाने ती मान्य केलेली नाही.

2006 मध्ये आदिवासी आणि इतर पारंपरिक जंगल जमातींसाठी वनहक्क कायदा संमत झाला; आणि त्यापाठोपाठ सागरी स्रोतांवर मच्छीमार समाजाला हक्क देणारा कायदा हवा, हा विचार जोर धरू लागला. तत्कालीन केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी 2009 मध्ये मच्छीमारांसाठी कायद्याचा कच्चा मसुदा प्रसिद्ध केला. हा कायदा अजून संमत झालेला नाही. मात्र, या निमित्ताने पारंपरिक मच्छीमारीशी संबंधित समस्या चर्चेत आल्या. कायदा बनवून सागरी स्रोतांवर परंपरागत हक्क द्यायचे झाले; तर मच्छीमार नेमके कुणाला म्हणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘सक्रिय’ मच्छीमाराला समुद्री स्रोतांवर पारंपरिक हक्क मिळावेत, असा एक विचार आहे. पण आजघडीला मच्छीमारी व्यवसायात मच्छीमारांखेरीज इतर समाजाचे लोकही मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्ये परराज्यांतून आलेले, तसेच नेपाळी लोकही आहेत. रत्नागिरीत मोठ्या यांत्रिक बोटींवर नेपाळी खलाशी कामे करतात. पूर्वी कधी समुद्राशी संबंध आलेला नसला; तरी अवघ्या सहा-आठ महिन्यांत नेपाळी माणूस मच्छीमारीचे काम शिकून घेतो आणि मग जोमाने काम करतो, असे म्हटले जाते.

मुंबईमध्ये कितीतरी यांत्रिक बोटी आहेत ज्यांची मालकी मच्छीमारांकडे आहे; पण त्यांचे सर्व कामकाज बाहेरून आलेले, मच्छीमारेतर समाजांचे लोक सांभाळतात. केवळ पारंपरिक किंवा जन्माने मच्छीमार असलेल्यालाच समुद्री स्रोतांवर हक्क द्यायचे म्हटले; तर या स्थलांतरित लोकसंख्येचे काय करायचे, हा प्रश्न उरतो. त्यांना (भारतीय नागरिकांना) माघारी पाठवायचे म्हटले; तर ते आपल्या संविधानाला धरून होणार नाही. किनारपट्टीत राहणा-या लोकसंख्येत काही समाज असेही आहेत, की ज्यांची मच्छीमारी समाजांत गणना होत नाही. मासेमारी हे या समाजांच्या उपजीविकेचे एकमेव साधन नाही. परंतु पूर्वापार पाण्याजवळ राहत असल्यामुळे ते पोटापुरती मासेमारी करतात. यांच्या मासेमारीशी संबंधित गरजा पूर्णवेळ मच्छीमारी करणा-या पेक्षा वेगळ्या आणि कमी आहेत. पण अशा लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या पारंपरिक हक्कांची दखल घेतली नाही; तर ते करत असलेली लहानशा प्रमाणातील मासेमारी बेकायदा ठरेल. एकुणात ‘पारंपरिक मच्छीमार’ कुणाला म्हणावे, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही.


reshma.jathar@gmail.com