Home »Editorial »Columns» Rpi Politics In Maharashtra

मराठ्यांसाठी रिपाइं रिंगणात

सुकृत करंदीकर | Jan 07, 2013, 02:00 AM IST

  • मराठ्यांसाठी रिपाइं रिंगणात

रामदास आठवले जिथे जातात तिथे गर्दी जमते. जाहीर सभांमध्ये उत्स्फूर्तपणे कोट्या-कविता सांगून हशा पिकवणा-या आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत रमणा-या या मिश्किल नेत्याला राजकीय पटलावर फारसे गांभीर्याने घेतले जात नाही, परंतु इतर दलित नेत्यांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय असल्याने त्यांना डावलण्याची चूकही कोणी करत नाही. उपयुक्तता किती हे निवडणुकीच्या निकालावरून नेमकेपणाने सांगता येणे कठीण, परंतु उपद्रव नको, या भूमिकेतून आठवलेंना जवळ ठेवण्याची गरज महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या अडीच दशकांपासून जाणवत आहे. शरद पवार यांच्यामुळे ते प्रारंभी काँग्रेस आघाडीबरोबर राहिले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आठवलेंचा पराभव झाला आणि आघाडीबरोबरचा त्यांचा संसार विसकटायला सुरुवात झाली. काँग्रेस किंवा ‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्यासाठी ते बराच काळ ताटकळले. अखेरीस त्यांनी आघाडीशी काडीमोड घेतला. भाजप-शिवसेना आठवले यांच्यासाठी 1995 पासून गळ टाकून बसले होते. महायुतीची घोषणा झाली. मुंडे-आठवले-ठाकरे यांची ‘महायुती’ पहिल्याच खडकवासला विधानसभा पोटनिवडणुकीत यशस्वी झाली. भगव्या आणि निळ्या शक्तीला जनतेने स्वीकारल्याची दवंडी पिटली गेली.

या पोटनिवडणुकीनंतर ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. शिवशक्तीच्या विजयात भीमशक्ती खारीचा वाटा उचलत असल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले. परंतु आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जागा वाढल्याचे कुठे दिसेना. आठवले यांच्या संगतीचा फायदा पूर्वी काँग्रेस आघाडी व अलीकडे भाजप-सेनेला झाला. आठवले यांनाही पदांची बक्षिसी मिळाली. परंतु रिपाइची ताकद वाढेना. यामुळे स्वत:च्या पक्षाचा पाया विस्तारण्याची गरज आठवले यांना निकडीने भासू लागली आहे. ‘बौद्धांचा पक्ष’ हा शिक्का असल्याने सवर्णच काय, परंतु दलित, इतर मागासवर्गीयांमधल्या जातीसुद्धा रिपब्लिकन पक्षांसोबत जाण्यास बिचकतात, हे आठवले यांचे निरीक्षण आहे.

‘उत्तर प्रदेशात दलितांची टक्केवारी वीस-बावीस टक्के आहे. ही ‘व्होटबँक’ घट्ट धरून त्यात इतर समाजघटकांच्या दहा-पंधरा टक्के मतांची भर घातली की एकहाती सत्तेचे गणित साधणे मायावतींना शक्य होते. महाराष्ट्रात असे घडू शकत नाही. सत्ता मिळवण्याएवढी ताकद आमच्यात नाही. हे वास्तव एकदा स्वीकारल्यानंतर इतर समाजघटकांना दूर ठेवणे परवडत नाही,’ असे आठवले म्हणतात. त्यामुळेच महाराष्ट्रात संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्यापासून मला दररोज मराठा तरुणांचे फोन येतात. 26 जानेवारीपासून मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून रिपाइं कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी लढणार असल्याचे आठवले सांगतात. ‘सध्याच्या आरक्षण व्यवस्थेला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर इतर सवर्ण जातींच्या आरक्षणासाठीही मी प्रयत्न करणार,’ ही आठवले यांची स्पष्ट भूमिका आहे.

मराठ्यांना आरक्षण असावे की नाही, हा अर्थातच वेगळा मुद्दा. पण त्यासाठी दलितांनी रक्त आटवावे का, याचा विचार आठवले यांनी करायला हवा. दलितेतर पाठिंब्याचा डोलारा उभा करताना हक्काच्या दलित मतांचा पाया ठिसूळ होणार नाही याकडे आठवलेंना लक्ष द्यावे लागेल. दलित पाठीराख्यांना गृहीत धरणे आठवले यांना आता परवडणार नाही. कारण, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने दलित ‘व्होट बँके’साठी आठवले यांना पर्याय शोधले आहेत. आठवले यांच्या पाठिंब्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय लगेच होईल, अशातलाही भाग नाही. सोयीचे, तात्कालिक राजकारण साधण्याच्या नादात आठवले यांची रिपाइं विस्तारणार की बुडणार, हे पाहण्यासाठी 2014 पर्यंत थांबावे लागेल.

आठवले म्हणतात... - ‘मराठा, ब्राह्मण, ओबीसी समाजाचे नेते तरी कुठे एकत्र आहेत ? तरी चर्चा मात्र दलित नेत्यांच्या फाटाफुटीचीच जास्त होते. याचा अर्थ आम्ही एकत्र येऊ नये असे नव्हे. दलित नेत्यांच्या ऐक्याला माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. परंतु केवळ दलितांच्या पाठिंब्यावर रिपब्लिकन पक्ष सत्तेत येऊ शकत नाही. शहाण्णव मध्ये राज्यात आम्ही प्रयोग करून पाहिला. आंबेडकर, गवई, मी आदी सारे रिपब्लिकन नेते एकत्र आलो; परंतु आमच्या अकरापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. सत्तेत येण्यासाठी दलितांना इतर समाजघटकांची मदत घ्यावी लागेल. सर्वांबरोबर विश्वासाचे वातावरण निर्माण करूनच पुढे जावे लागेल. म्हणूनच महायुतीच्या जागावाटपात रिपाइंला मिळणा-या पन्नास टक्के दलितेतरांना दिल्या जातील.’’

Next Article

Recommended