आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कता आवश्यकच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निलंगा येथे आयोजित  शिवार संवाद कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हेलिकॉप्टरला अपघात झाला. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच विजेच्या ओव्हरलोड तारांना पंख्याचे पाते अडकल्याने ते खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच पायलटने ते हेलिपॅडवर उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यात क्रॅश लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर फार उंचीवर नव्हते तसेच ओव्हरहेड तारा तुटल्यामुळे विजेचा प्रवाह खंडित झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुख्यमंत्र्यांसह सहा जण थोडक्यात बचावले. ‘आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमामुळे मी सुखरूप आहे,’ असा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी तत्काळ जारी केला आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. किरकोळ जखमी झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री मुंबईत पोहोचले. ‘आई, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता’ असे म्हणत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी कुटुंबीयांनाही धीर दिला.  हेलिकॉप्टर बिघाडाचे हे पहिले उदाहरण नाही. १२ मे रोजी मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी दाैऱ्यावर हाेते तेव्हाही त्यांचे हेलिकॉप्टर बंद पडले होते. त्या वेळी त्यांना अहेरी ते नागपूर हा २५८ किलोमीटरचा प्रवास कारने अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातून करावा लागला होता. २३ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीही हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता.

हेलिकॉप्टर अपघाताचे मोठे संकट टळले, मात्र यानिमित्ताने व्हीआयपींच्या दौऱ्यातील हेलिकॉप्टरची योग्यता आणि त्यांच्या  सुरक्षेचा विषय पुन्हा समाेर आला. राज्य सरकारच्या विमान संचालनालयाचे संचालक आणि या हेलिकॉप्टरच्या पायलटने तांत्रिक बिघाड किंवा धुळीमुळे दिशा चुकली आणि अपघात झाला या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. या अपघाताची चौकशी होईल आणि तथ्य बाहेर येईल; पण हेलिपॅड गावाबाहेर मोकळ्या जागेत का तयार केले नाही, विजेचे खांब डीपी ओव्हरहेड वायर असलेल्या भागात ते कसे बनवले,  ते बनवताना आवश्यक खबरदाऱ्या घेतल्या होत्या का, हेलिपॅडवर धूळ उडू नये म्हणून त्यावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात येते ते मारले होते का, व्हीआयपींच्या दौऱ्याच्या आधी ते ज्या विमानाने किंवा हेलिकॉप्टरने जातात ते सुरक्षित आहे का याची तपासणी केली जाते. हेलिपॅड काटेकोर नियम पाळूनच बनवले जावे.  ते गर्दीच्या ठिकाणी नसावे. त्याची निगराणी राखली जावी असे संकेत आहेत. ते किती पाळले गेले होते, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.      
 
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना तातडीने प्रवास करावा लागतो. त्यासाठी लहान विमान आणि हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे, असे म्हणत राज्य सरकारने ती भाड्याने घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीची नेमणूकही केली आहे. म्हणजेच सरकारकडे असलेल्या हेलिकॉप्टरच्या योग्यतेबद्दल आधीच शंका आहेत.   

मुळात हेलिकॉप्टर हे उच्चभ्रूंच्या चैनीचा विषय असल्याचे मानण्यात येते. मात्र व्हीआयपींचे दाैरे वगळता दुर्गम भागातील वाहतूक, रुग्णवाहिका, मदतकार्य, सर्वेक्षण, सुरक्षा, पर्यटन अशा विविध कारणांसाठी हेलिकॉप्टरचा वापर वाढत आहे. २०२५ पर्यंत नागरी सेवेसाठीच्या हेलिकॉप्टरची संख्या ६०० ते ७०० पर्यंत जाऊ शकते असे सांगितले जात हाेते, पण गेल्या काही वर्षांत ती संख्या वाढण्याएेवजी कमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या ही संख्या २६० ते २७० इतकीच मर्यादित अाहे.  
 
हेलिकॉप्टर अपघाताच्या बाबतीत इंटरनॅशनल हेलिकॉप्टर सेफ्टी-टीम या यंत्रणेने केलेल्या एका पाहणीत २००६ ते २०१५ या नऊ वर्षांच्या काळात ३९ मोठे अपघात झाल्याचे समोर अाले. त्यापैकी १७ अपघात जीवघेण्या प्रकारातील होते ही गंभीर बाब आहे. अशाच अपघातात आपण ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव शिंदे, राजेश पायलट, तेलगू अभिनेत्री व भाजप उमेदवार सौंदर्या, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी अशा अनेक व्हीआयपींसह शेकडाे जणांना गमावले आहे. अशा घटनांतून आपण कोणताही बोध घेतलेला दिसत नाही.   
 
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे विश्लेषण  होईल. त्यात नेमके काय झाले, ते का झाले याची माहिती समोर येईल. एखादा दोषी असेल तर त्यावर कारवाईही होईल. यानिमित्ताने त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘अपघात होऊ नये यासाठी काळजी घ्यायलाच हवी. टेक ऑफ करण्याच्या आधीच तांत्रिकदृष्ट्या सर्व तपासण्या व्हायला हव्यात,’ ही दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. ही एक सामान्य भावना आहे. अपघात टाळण्यासाठी काळजी घेतली जावीच. ती घेण्यात येते, असे सांगितले जाते तरीही अपघात का होतात? याबाबत सतर्कता आवश्यकच आहे.

 
 
बातम्या आणखी आहेत...