आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्यांचा असामान्य नेता ( सचिन काटे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीडच्या राजकारणातील सक्रिय नेते आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेले सामान्यांचे नेते पंडितअण्णा मुंडे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. मागास अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मोठी राजकीय परंपरा आहे. या जिल्ह्याने राज्याला तसेच देशालाही मोठमोठे नेतृत्व दिले. स्व. गोपीनाथ मुंडे त्यातील एक. त्यांच्या कारकीर्दीचा आलेख मोठाच आहे. सामान्य शेतकरी कुटुंबापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्यभर तर गाजलाच, सोबतच देशपातळीपर्यंत पोचला.
एखाद्या माणसाच्या मोठे होण्यामागे अनेकांचे प्रयत्न, धडपड तसेच त्यांचा त्याग असतो. पंडितअण्णा मुंडे यांनी धाकटा भाऊ असलेल्या गोपीनाथरावांसाठी अशाच प्रकारे त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहत वडिलकीची भूमिका सांभाळली. गोपीनाथराव राज्याचे राजकारण पाहत असताना त्यांचा मतदारसंघ सांभाळला. हे करताना स्वत:तील जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. परळी ताल्ुक्यातील नाथ्रा या गावचे सरपंच म्हणून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. त्यानंतर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दहा वर्षे सभापती, दोन वेळा बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाची तळमळ आपल्या कामातून दाखवून दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे रूप पालटले. ही बाजार समिती काॅर्पोरेट करण्याचा त्यांचा ध्यास होता. शहर व्यापारी केंद्र व्हावे, शेतकऱ्यांचा विकास व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते आणि हेच ध्येय समोर ठेवून ते कार्यरत राहीले. त्यामुळेच २०१३ मध्ये अण्णांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक कोटी ६५ लाखांचे कर्ज फेडले.
आर्थिक संपन्नता आल्याशिवाय संस्थेचा विकास होणार नाही हे लक्षात घेऊन उत्पन्न वाढीवर भर दिला. हे करताना कर्मचाऱ्यांची बढती असो किंवा त्यांचा रखडलेला सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय असो, त्यालाही प्राधान्य दिले. मार्केट यार्ड हलवणे, उपबाजारपेठ सुरू करणे, कार्यालयाची अत्याधुनिक इमारत उभारणे अशा कामांना त्यांनी कायम प्राधान्य देत विकासाला चालना दिली. बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम केली. आज कर्जबाजारी बाजार समितीचे फिक्स डिपॉझिटमध्ये काही कोटी रुपये आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त असलेल्या १५०० जागा भरण्याचा ऐतिहासिक निर्णयही त्यांच्याच काळात झाला. सरपंच ते जिल्हा परिषद अध्यक्ष या राजकीय वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली. राजकारणासोबतच कृषी, ग्रामविकास, आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
शेतकऱ्याचा कैवारी, कुशल प्रशासक, साखर कारखानदारीतील आधारवड अशी विशेषणे त्यांना मिळाली ती त्यांच्या विकासविषयक धोरणांमुळे. देशात पीक योजना सुरू करावी यासाठी सगळ्यात आधी त्यांनी वाजपेयी सरकार असताना पुढाकार घेतला. तेथूनच खऱ्या अर्थाने पीक विम्याचा विषय समोर आला. दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी मोठे आंदोलन उभारले. ग्रामीण पेहराव, रांगडी भाषा, करारी बाणा, बोलणार ते करून दाखवणार असा स्वभाव असल्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांवर त्यांचा कायम धाक असायचा. जिल्ह्याच्या विकासाची तळमळ, त्यातूनच जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये चांगली ओळख आणि विविध पक्षांतील नेत्यांसोबत त्यांचे कायम मित्रत्वाचे संबंध राहिले. कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात ते कायम सहभागी होत. त्यामुळेच राजकारणात एक वेगळी छाप पाडत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. आणि हे सगळे करताना सामान्यांचा नेता म्हणून लोकांना जपण्याचे कामही त्यांनी केले. या निमित्ताने जिल्हा विकासाची दूरदृष्टी ठेवणाऱ्या नेत्याला पोरका झाला आहे.
(लेखक हे दिव्य मराठी अकोला येथील कार्यकारी संपादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...