आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या टप्प्यातही भाजपची आघाडीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रात आणि राज्यातही भाजपने दणदणीत यश संपादित करत सत्ता ताब्यात घेतल्यापासून सरकारच्या कारभारावर मोठी चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांचा विविध योजनांचा धडाका, मन की बात, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे संबंध सुधारण्यासाठी तसेच आश्वासक वातावरण तयार करण्यासाठी केलेले दौरे, सर्जिकल स्ट्राइक ते अलीकडे झालेली नोटाबंदी, कधी नव्हे ते एकीकडे विकासात्मक राजकारण आणि दुसरीकडे भाजप, संघ किंवा मग मोदी द्वेषाची चर्चा चॅनल, काही माध्यमे तसेच कट्ट्याकट्ट्यांवर सुरू असते. राज्यातही फडणवीस सरकारबद्दल वेगळे वातावरण नाही. अशा अवस्थेत होत असलेल्या निवडणुकांचा संबंध थेट या दोन्ही सरकारच्या कारभाराशी जोडून त्यांचे काय, असे प्रश्न कायम निर्माण केले गेले. दोन्ही सरकारवर लोक नाराज आहेत. त्यांची नाराजी मतपेट्यांतून दिसेल, असे विश्लेषणही अनेक जाणकारांनी मांडले. पण नंतरच्या निवडणुकांत भाजपचा टक्का वाढतच असल्याचे लक्षात येते. कोठे सत्ता आली, कोठे नाही, हा वेगळा विषय आहे; पण सगळ्याच ठिकाणी भाजपची ताकद वाढल्याचे समोर आले आहे. राज्यातील चित्रही असेच आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका चार टप्प्यांत झाल्या. विविध समाजांनी आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह इतर  मागण्यांसाठी लाखोंचे मोर्चे काढत सरकारच्या विरोधात मोठा रोष असल्याचे वातावरण तयार केले. त्यातच झालेल्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास झाला. या तत्कालीन मुद्द्याला हत्यार बनवत विरोधकांनी निवडणुकांना सामोरे जाताना विजयाचा अति आत्मविश्वास बाळगला, पण प्रत्यक्षात विरोधकांच्या या कागाळ्यांचा निवडणुकांवर काहीही परिणाम झाला नाहीे. महाराष्ट्रात चार टप्प्यांत झालेल्या या निवडणुकांत भाजपचे १२०० वर नगरसेवक निवडून आले. भाजपने या सगळ्या वातावरणात राज्यात नंबर वन मिळवला. येऊ घातलेल्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. नगरपालिकांच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील २ नगरपालिकांच्या आज लागलेल्या निकालातही भाजपने मोठी बाजी मारली आहे. गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट व्यक्तिमत्त्व असलेले प्रफुल्ल पटेल यांचा गड. या गडालाही भाजपने मोठे खिंडार पाडले आहे. ४२ जागांच्या गोंदिया नगरपालिकेत राष्ट्रवादीला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागत आहे, तर १६ जागांच्या तिरोड्यात ९ जागा मिळाल्या तरी दोन्ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील ९ पैकी ५ नगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. रामटेक हा कायम शिवसेनेचा गड राहिला. या गडावर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, सुनील केदार, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे दिग्गज आपली सत्ता तर राखू शकले नाहीतच, पण समाधानकारक आकडेही गाठू शकले नाहीत. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मात्र कामठी या आपल्या गडात सत्ता आणू शकलेले नाहीत. तेथील निकाल त्यांना बोध घ्यायला लावणारा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवडणूक, त्यातच नोटाबंदीमुळे झालेला त्रास आणि वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपने नंतर कोणतीच ठोस कृती केली नाही. त्यातच मधल्या काळात भाजप नेत्याच्या मुलाच्या एका प्रकरणात नागपुरातील सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त केलेला रोष या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीकडे सगळ्यांचे वेगळे लक्ष होते. पण जनतेने कोणत्याही स्थानिक किंवा राष्ट्रीय मुद्द्यांवरील भूलथापांना बळी न पडता निर्भीडपणे भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले. श्रीहरी अणे यांनी विदर्भ माझा या पक्षाच्या वतीने स्थानिक निवडणुका लढवण्याचा बिगुल फुंकला तेव्हा आता भाजपला मोठे आव्हान ठरेल, असे वातावरण विदर्भवाद्यांनी तयार केले. माजी मंत्री राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्या बालेकिल्ल्यात विदर्भ माझाचे २० पैकी १५ नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षही याच पक्षाचा झाला आहे. पण वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा परिणाम म्हणून या यशाकडे पाहता येणार नाही, कारण तेथे निवडून येणाऱ्या एका परंपरागत स्थानिक आघाडीने या वेळी या बॅनरखाली निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर या एका ठिकाणी वगळता कोठेही खाते उघडले गेले नाही हे दुर्लक्षून पुढे जाता येत नाही. एकूणच या सगळ्या वातावरणात 
बाहेर काहीही चर्चा सुरू असल्या तरी समाजमन भाजपच्याच बाजूने असल्याचे या निवडणुकांनी सिद्ध केले आहे. भाजपने यशाने हुरळून न जाता लोक मनाचा आदर करत काम करणे आवश्यक आहे.
 
सचिन काटे
कार्यकारी संपादक, अकोला