आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन वाढवणारा निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा विदर्भ हा प्रदेश सध्या संपूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे. मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असोत किंवा शहरी भागात होणाऱ्या महापालिका निवडणुका, त्यात भाजपला किती यश मिळणार आणि भाजपसोबत २५ वर्षे युतीत असलेल्या शिवसेनेचे काय होणार, या एकमेव मुद्द्याभोवती केंद्रित झालेल्या निवडणुकांच्या निकालाने अनेकांचे अंदाज चुकवत भाजपने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. 
 
 गुंडांना पक्षात प्रवेश देण्यापासून इतर पक्षांतील उमेदवार पळवल्याचे आरोप होत असलेल्या भाजपने राज्यात ठिकठिकाणची सत्ता ताब्यात घेण्यासाठी केलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देतानाच प्रचाराचे, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने केल्या जात असलेल्या विकास कामांचे ‘हॅमरिंग’ केले गेले. त्यावर टीकाही झाली.
 
टीकेकडे दुर्लक्ष करत भाजपने एवढ्या सगळ्या निवडणुकीत निवडणुकीचे व्यवस्थापन मोठ्या खुबीने सांभाळले. पक्षपातळीवर निवडणुकीचे व्यवस्थापन करणारा हा एकमेव पक्ष असावा. कारण इतर पक्षांत असे नियोजन कुठेच दिसले नाही. इतर पक्षांकडे निवडणूक नियोजनाचा अभाव होता. उथळ मुद्द्यांवरच खल करत आपले महत्त्व पटवत पुढच्यावर ज्या स्तरावर होईल त्या स्तरावर टीका करण्याचा बाकीच्यांचा अजेंडा तेवढा कायम होता.

  भाजपच्या निवडणूक व्यवस्थापनात पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांसोबतच नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना सामावून घेणे, त्यांची उपयोगिता पाहून त्यांना स्थान देणे, त्यासोबत वाढणारा रोष मोठ्या खुबीने निवळण्यासाठी योजना आखणे, ठिकठिकाणी असलेल्या गटातटाच्या तटबंद्या दुरुस्त करत एकाच ध्येयासाठी त्यांची एकत्र मोट बांधणे, एक नेता  त्यासोबत ३ कार्यकर्त्यांना संबंधित मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी विश्वासाने देऊन पॅनल चर्चा, छोट्या-छोट्या सभा, बैठका घेऊन सवंग टीका आणि प्रचाराच्या खेळात न अडकता आपला अजेंडा घराघरात पोचवत आपल्याबद्दल, आपल्या पक्षाबद्दल, आपल्या नेत्यांबद्दल विश्वास निर्माण करण्याचा मुख्य उद्देश या निवडणूक व्यवस्थापनाच्या माध्यमातून राबवत भाजपने एक-एक मतदारसंघ ताब्यात घेत राज्यभर यश संपादन केले आहे.
 
 विदर्भात भाजपला मिळालेले यश हे अनपेक्षित नाही; पण ते अपेक्षेपेक्षा नक्कीच चांगले आहे हे नाकारता येणार नाही. परंपरागत मतदार पाठीशी असतानाही गटातटात पक्षाच्या यशाकडे दुर्लक्ष करत एकमेकांना पाडण्यासाठी संपूर्ण ताकद लावणाऱ्या काँग्रेसी नेत्यांच्या उखाळ्या-पाखाळ्यांमुळे काँग्रेसची वाताहत झाली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रही थोडेफार असेच आहे. शिवसेना, मनसेने गेल्या अनेक वर्षांत पक्ष-संघटनेबाबत केलेले दुर्लक्ष यामुळे या भागातील जनतेपुढे एकमेव आश्वासक पक्ष अशी प्रतिमा भाजपने निर्माण केली. 
 
एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर वेगवान विकास काय असतो याचा परिपाठ नागपुरात भाजपने दाखवून दिला आहे. नागपूरच्या अगदी कानाकोपऱ्यात आज पुढे अनेक काळ टिकणाऱ्या विकासाच्या खाणाखुणा दिसू लागल्या आहेत. मेट्रो रेल्वेसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर लवकरच मेट्रो धावताना दिसू लागेल, हे दाखवून देण्याचे काम एकदम कमी वेळेत केले जात आहे.
 
 परंपरागत राजकारणाला कंटाळलेले लोक अनुशेषावर गळे कोरडे करत आपल्या करंटेपणाचा दोष देण्याच्या राजकारणाला कंटाळून विकासाच्या मुद्द्यावर समोर येतात, हे दाखवून देण्यासाठी नागपुरात पाहायला मिळत आहे. आजही आपल्याकडच्या निवडणुका जातीपातीच्या आणि इतर अनेक बाबींवर लढल्या जातात, त्यात आता विकास कामांचा मुद्दा ही एक नवीन बाब नक्कीच वाढली आहे. 
 
राज्यात भाजपची घोडदौड मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती त्यांच्यावर होणारे आरोप हा एक मुद्दा आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे केंद्रीय राजकारणात वाढत असलेले महत्त्व हा दुसरा मुद्दा आहे. त्या दोघांतील संबंध आणि सुसंवाद तसेच त्यांच्यातील छुपा संघर्ष याची एका गटात कायम चर्चा होत असते. त्यावर अनेक आडाखे बांधले जातात.  
 
मात्र पक्षाचे हित आणि आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येताना दोघांनीही एकत्रित येत काही मुद्द्यावर सकारात्मक मार्ग काढत सामायिक अजेंडा समोर ठेवून या निवडणुकांना सामोरे गेले. परिणामी भाजपला हे दणदणीत यश मिळाले आहे. या यशासोबतच पक्षात आणि समाजातही मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे वजन मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या प्रक्रियेत या निकालाने मोठी भूमिका निभावली आहे. यशासोबतच सर्वसामान्यांच्या भाजपकडून अपेक्षाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विदर्भात, विशेषत: नागपुरात सुरू असलेले विकासाचे ‘रोल मॉडेल’ महाराष्ट्रातही राबवले जावे हीच अपेक्षा.

- कार्यकारी संपादक, अकोला
 
बातम्या आणखी आहेत...