आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हायरल’पासून खबरदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वाइन फ्लू नावाच्या आजाराने सध्या देशाला ग्रासले आहे. वेगवेगळ्या राज्यांत या आजाराची लक्षणे असलेल्या, उपचार सुरू असलेल्या आणि उपचारांअभावी जीव गमावावा लागणाऱ्या सर्वसामान्यांंची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. एका आकडेवारीनुसार एकट्या महाराष्ट्रात या आजाराने जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत दगावलेल्या रुग्णांची संख्या ४०० वर पोहोचली आहे. पहिल्या सहा महिन्यांत राज्यात १ हजार २०२ रुग्ण आढळले होते. त्यातील २३० दगावले. नंतरच्या दोन महिन्यांत हे प्रमाण वाढतच चालले आहे. बदलत्या वातावरणात वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या संसर्गामुळे आजार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. थोडेसे लक्षण दिसले की माणूस दवाखान्यात जातो,  काय झाले आहे, असे विचारतो. डॉक्टर सांगतात, ‘व्हायरल’ आहे. काही दिवसांत बरे वाटले तर ठीक, नाही तर सुरू होतात वेगवेगळ्या चाचण्या आणि मग वेगवेगळ्या आजारांच्या शक्यतेने तपास सुरू होतो. अशातच गेल्या काही वर्षांत स्वाइन फ्लू या आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे. या आजारात वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येमुळे चिंता वाढत आहे.
 
१९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू म्हणून ओळखला जाणारा हा आजार दर काही वर्षांनी डोके वर काढतो. २००९ मध्ये अनेक देशांमध्ये या आजाराची साथ पसरली होती. तेव्हा भारतात २७ हजार जणांना त्याची लागण झाली होती.  त्यात ९८० जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. तेव्हापासून स्वाइन फ्लू एच १ एन १, एच २ एन ३, असे गुणधर्म बदलत थैमान घालत आहे. याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला याबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. २०१५ पर्यंत स्वाइन फ्लूबाधितांची संख्या ५२ हजार ५४० वर पोहोचली होती. त्यापैकी ३ हजार ११८ जणांचा मृत्यू झाला होता. आपल्याकडे थंडीच्या काळात हा आजार मोठ्या प्रमाणावर बळावल्याचे पाहायला मिळायचे, मात्र यावर्षी अगदी कडक उन्हाळा आणि पावसाळ्यातही या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. वैद्यकीय परिभाषेत हे विषाणूमधील बदलाचे संकेत मानले जात आहेत. मात्र, हा प्रकार आपल्या आरोग्य व्यवस्थेपुढे मोठे आव्हान आहे.
 
सामान्यत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. तो संसर्गजन्य असल्यामुळे एका माणसाकडून दुसऱ्याकडे पसरू शकतो. स्वच्छ राहिले तर या आजार संसर्गाचेे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नेहमी हात साबणाने धुवावेत, गर्दीत जाणे टाळावे, खोकताना – शिंकताना तोंडाला रुमाल लावावा, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी, आहार पौष्टिक घ्यावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी माणूस अशा आजारापासून दूर राहू शकतो. पण त्याच्याअभावी रुग्णांची आणि सोबतच रोगाची साथ पसरत आहे. हा रोग फक्त खेड्यात किंवा घाणीच्या किंवा डुकरांचा वावर असलेल्या ठिकाणीच पसरत आहे असे नाही. तर नाशिक, पुणे, आैरंगाबाद, नगर, नागपूर अशा सुधारलेल्या शहरांतही पसरला आहे. सोबतच अमरावती, अकोला, बुलडाणा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा अशा शहरांतही या  राेगाने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. सर्दी, खोकला, वारंवार शिंका, घशात खवखव, थंडी, ताप, अंगदुखी ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. स्वत:च  स्वत:च्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेतली तर या रोगापासून आणि रोग पसरवण्यापासून दूर राहता येते हे खरे असले तरी पसरत असलेल्या रोगाचे आकडे विचार करायला लावणारे आहेत. हा रोग कोणालाही होऊ शकतो. वॉटर कपच्या माध्यमातून गावागावात पाण्याचा स्रोत निर्माण करणारा अामिर खानही सध्या या रोगामुळे त्रस्त असून त्यावर तो उपचार घेत आहे.  
 
एकीकडे भारतात सध्या स्वच्छतेच्या बाबतीत मोठे जनजागरण सुरू आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारताचे मोठे मिशन हाती घेतले आहे. तरीही असे रोग पसरत आहेत, ही प्रत्येक भारतीयासाठी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वेळीच इशारा दिल्यानंतरही आपली यंत्रणा आहे तिथेच आहे. आजच्या अत्याधुनिक युगातही स्वाइन फ्लू झाला आहे की नाही, हे ठरवणारी यंत्रणा मुंबई आणि नागपूर आणि मोजक्याच संस्थांव्यतिरिक्त कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांना इतर संस्थांच्या तपासणी अहवालावर अवलंबून राहावे लागते. या समस्येवर देशात फारसे संशोधनही झालेले नाही. विदेशी संशोधनावर आपली मदार आहे. उत्तर प्रदेशातील बालके दगावल्याचे प्रकरण गाजत आहे. त्यात दोषी कोण हे ठरायचे तेव्हा ठरेल, पण आरोग्याच्या बाबतीत आपली यंत्रणा आणि स्वत: प्रत्येक जण जोपर्यंत सतर्क होणार नाही तोपर्यंत अशा पसरणाऱ्या रोगांना आटोक्यात आणणे सोपे नाही. शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकानेच या बाबीचा विचार करायला हवा.
 
बातम्या आणखी आहेत...