आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत: 'अनुवादाच्या निमित्ताने भाषागंध अनुभवला', लेखक मिलिंद चंपानेरकर यांचे मनोगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लोकशाहीवादी अम्‍मीस दीर्घपत्र' या मिलिंद चंपानेरकर अनुवादीत पुस्तकाला 2016चा साहित्‍य अकादमी अनुवाद पुरस्‍कार मिळाला आहे. लेखक-दिग्‍दर्शक सईद अख्‍तर मिर्झा यांच्‍या 'अम्‍मी: लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर' या मूळ इंग्रजी पुस्‍तकाचा हा अनुहवाद चांगलाच लोकप्रिय ठरला. पुस्‍तकाचा अनुवाद करताना चंपानेरकर यांनी मनात एक निश्चित भूमिका ठरविली होती. त्‍याचीच उकल मराठी भाषादिनानिमित्‍त घेतलेल्‍या या मुलाखतीत झाली आहे... 

प्रश्न: या पुस्तकाच्या अनुवादामागील नेमक्या प्रेरणा काय होत्या? अनुवादक-लेखक म्हणून सईद मिर्झाच्या मुळ पुस्तकातल्या कोणत्या घटकाने तुमच्यातल्या अनुवादकाला आव्हान दिले होते?
मिलिंद चंपानेरकर : ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ ही प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्झा यांची पहिलीच इंग्रजी साहित्यकृती. सईद मिर्झा यांचे हे पुस्तक रुढार्थाने आत्मचरित्र नाही. खरे तर दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचा एक गोफ त्यांनी विणला आहे. हा अनुवाद २०११ साली प्रसिद्ध झाला. त्या पुस्तकावर स्त्रीवाचकांनी दिलेला प्रतिसाद तर खूपच लक्षवेधी होता.
 
आपण जेव्हा आईस पत्र लिहितो तेव्हा त्यात एकप्रकारचे मार्दव असते. अनेक राजकीय-सामाजिक घटना वा भाष्य कितीही कटू असले, तरी एखादा माणूस आपल्या आईला त्याबाबत मार्दवानेच सांगतो – हीच कल्पना डोक्यात ठेवून मूळ लेखकाने अनेक गोष्टींचा उहापोह करण्यासाठी खास दीर्घपत्राच्या आकृतिबंधाची योजना केली आहे. हे पुस्तक भाषांतरित करताना त्यातील मार्दव मराठीतही तसेच यावे म्हणून मी खूप काळजीपूर्वक शब्दांची निवड केली.
 
प्रश्न : लेखन ही अंतिमत: एक राजकीय कृती असते. त्या दृष्टिकोनातून पाहता, तुमच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं वर्णन तुम्ही कसे कराल?
मिलिंद चंपानेरकर : सईद मिर्झा यांनी लिहिलेले पुस्तक हे नक्कीच एका अर्थाने राजकीय आहे. विशिष्ट विचारसरणीशी नाते सांगणारे विधान करू पाहणारे आहे. परंतु अगदी, साने गुरुजींच्या “श्यामची आई’ या पुस्तकाला आईच्या मायेेचे अवगुंठन असले तरी तेही पुस्तक विशिष्ट हेतूने राजकीय स्वरुपाचेच होते. 
 
 
प्रश्न :`लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र' ही पुरोगामित्व, शास्त्रीय दृष्टिकोन आणि सेक्युलॅरिझम हा सहज स्थायीभाव असलेल्या एका आईची, आणि तिच्या कुटुंबाची मनोवेधक गोष्ट आहे. या गोष्टीला वैश्विक मूल्य आहे, ते अनुवादातून पुढे आणताना तुमचा भाषाविषयक आग्रह कशास्वरुपाचा होता? 
मिलिंद चंपानेरकर : ग्रामीण बोलीभाषांमध्ये मार्दव असते. प्रमाण भाषेत शब्दांची गोलाईदेखील खूप कमी जाणवते. म्हणूनच "लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र' या पुस्तकाचा अनुवाद करताना गोलाई असलेले शब्द आवर्जून निवडले व वापरले आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मीयांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात.
 
भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणाऱ्या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! या पुस्तकात अफगाणिस्तान, बलुचिस्तानचे (क्वेट्टा) संदर्भ आहेत. त्या प्रांतातून १९३०च्या दशकात मिर्झा यांचे आईवडील मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील आधुनिकतेकडे कसे पाहिले असेल,याचेही दर्शन पुस्तकातून होते.  
 
प्रश्न : तुमच्या अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं आगळेपण काय सांगता येईल?
मिलिंद चंपानेरकर : हा अनुवाद सिद्ध करताना मी काही गोष्टींचे पुरेपूर भान बा‌ळगले आहे. या पुस्तकाचे मोल पुरेसे समजून ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर यांनी हा तसा व्यावसायिक न ठरणारा प्रकल्प करण्यास स्वीकृती दिली, म्हणूनच हे अनोखे पुस्तक मराठी वाचकांसमोर येऊ शकले.  मी त्यांचा खूप आभारी आहे.  
बातम्या आणखी आहेत...