आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Says She Will Cherish China Open Win For Rest Of Her Life

भारतीय बॅडमिंटनची भरारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये जाऊन चायना सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची अतुलनीय कामगिरी भारताच्या सायना नेहवाल आणि के. श्रीकांत या खेळाडूंनी केली आहे. सायना आपल्या खेळामुळे घराघरात पोहोचली आहे. मात्र, के. श्रीकांत याने पुरुषांच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून तमाम बॅडमिंटन विश्वाला धक्का नाही, तर आपल्या आगमनाची वर्दी दिली आहे. २१ वर्षीय श्रीकांतने बॅडमिंटन शैलीसोबतच आपल्या कणखर मनोवृत्तीची चुणूक बॅडमिंटन विश्वाला दाखवून दिली आहे. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या लिनडॅन या खेळाडूला पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत त्याने दोन गेममध्ये अवघ्या ४६ मिनिटांत खेळवले. आंध्र प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून बॅडमिंटन क्षितिजावर आलेल्या श्रीकांतने गेल्या दोन वर्षांत बॅडमिंटनमधील दादा खेळाडूंना हरवून अनेक धक्के दिले आहेत. २०१२ मध्ये त्याला देण्यात आलेली जागतिक बॅडमिंटनमधील २४० ही क्रमवारी त्याच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन करणारी नव्हती, हे नंतरच्या दोन वर्षांत सिद्ध झाले. आज तो जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानावर आहे. श्रीकांतने २०१३ मध्ये राष्ट्रीय विजेत्या पी. कश्यपला हरवले होते. पाठोपाठ थायलंडच्या अनुभवी बुसॅक पोन्सानाला हरवून थायलंड ओपन स्पर्धा जिंकली होती. आपले गुरू गोपीचंद यांच्यासारखे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न तो उराशी बाळगून आहे.
दुसरीकडे सायनाने यंदाच्या वर्षातील तिसरे आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. जूनमध्ये ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज जिंकून सायनाने सुरुवात केली होती. त्याआधी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रां. प्री. सुवर्णपदक पटकावले होते. रविवारी झालेल्या चायना सुपर सिरीजमधील सहाव्या प्रयत्नात सायनाने अकाने यामागुची (१७ वर्षीय) हिचा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये १४-१४, १८-१८ अशा बरोबरीनंतर यामागुचीला पुढील गेम जिंकण्याची २०-१९ अशी संधी चालून आली होती. पण दूरवरचे फटके खेळताना यामागुचीने दोनदा चुका केल्या व विजेतेपद सायनाकडे गेले. सध्या सायनाचे जागतिक क्रमवारीतील स्थान पाचवे आहे. ती दुसऱ्या क्रमांकापर्यंत वर जाऊन खाली आली होती. चीनमधील यशानंतर सायनाचा आत्मविश्वास वाढला आहेच. तिचे यापुढचे लक्ष्य आहे दुबईत होणाऱ्या बॅडमिंटन महासंघांच्या विश्वमालिका जिंकण्याचे.