आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीयांची हाराकिरी; उन्मादी खिल्जी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीकडे पद्मावतीच्या अस्तित्वावर काही इतिहासकार प्रश्न लावतात, तिच्या जीवनगाथेवरही मतमतांतरे आहेत; पण त्याच वेळेस अल्लाउद्दीन खिल्जीबाबत व्यक्त होताना तत्कालीन भारतीय राजांनी, राजवटींनी केलेल्या हाराकिरीबद्दल खुल्या दिलाने लिहिले वा बोलले जात नाही. इतिहासाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचा हा कमकुवतपणाच होय.  


एक काळ होता जेव्हा खरोखरच महाराष्ट्रावर वर्षातील बाराही महिने सुखाचे चांदणे शिंपले जायचे. मात्र, शेकडो वर्षांपूर्वी या सुखाला ग्रहण लागले. आठ हजार घोडेस्वारांना घेऊन कत्तलबाजांच्या आवेशात अल्लाउद्दीन खिल्जी चालून आला. त्याची युद्धाची आणि साम्राज्याची भूक प्रलयंकारी होती. खिल्जीची पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुड्याच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप एलिचपुरावर पडली. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. महाराष्ट्रावर सुलतानी संकट आले. या घटनेच्या काही दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली होती, तिथले काही कठोर कडवट अनुभव घेऊन लोकांना ते सांगितले. तरीही रयतेसह राजा गाफील राहिला. खिल्जीचे हे वादळी आक्रमण रामदेवराय यादवाला उशिरा कळले. स्वराज्यात तो किमान शंभर कोस आत घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही. सेनापती होता राजा रामदेवाचा युवराज शंकरदेव ऊर्फ सिंघणदेव. तो आपल्या बहुतांश सैन्यासह यात्रेला गेला होता. डिसेंबर १२९३ मध्ये ५०० मैलांवरून आलेल्या खिल्जीची सेना आणि ४००० स्वारांसह असणारी यादव सेना यांचे युद्ध झाले. अवघ्या पंधरा दिवसांत देवगिरीची ध्वजा उतरली. शेवटी तह झाला. ही बातमी कळताच ६ फेब्रुवारी १२९४ रोजी शंकरदेव यादव मोठी फौज घेऊन देवगिरीच्या रक्षणासाठी परत आला. दरम्यान, ‘दिल्लीहून फार मोठी फौज येणार आहे’ अशी अफवा पसरली. तरीही शंकरदेवाने खिल्जीच्या सैन्याला चांगलेच झोडपून काढले, त्याच वेळी देवगिरी किल्ल्याच्या मागे असलेली १००० स्वारांची फौज खिल्जीच्या मदतीला आली. त्यांच्या घोडांच्या टापांनी इतकी धूळ उडवली की कल्लोळ माजला. यादवांच्या सैन्याला वाटलं की, दिल्लीहून येणारी अफाट फौज म्हणजे तीच ही आणि यादव सेना घाबरून पळायला लागली. शेवटी तह होऊन खंडणी दिली गेली. ६०० मण सोनं, ७०० मण मोती, २ मण हिरे-माणकं आणि १००० मण चांदी आणि रामदेवरायाची मुलगी! इसवी सन १३०९च्या सुमारास राजा रामदेवराय मरण पावला. शंकरदेव देवगिरीच्या सिंहासनावर राजा झाला आणि त्याने अल्लाउद्दीनचे मांडलिकत्व झुगारून दिले. खंडणी बंद केली हे कळताच अल्लाउद्दीनने आपली फौज मलिक काफूरबरोबर देवगिरीवर पुन्हा पाठवली.  


‘तू देवगिरीच्या फौजेचा फडशा पाड आणि ते राज्यच जिंकून घे. तू तिथेच राहा,’ असा हुकूम खिल्जीने मलिकला दिला. युद्धाचा वणवा पेटला. यात शंकरदेव ठार झाला. मलिक काफूरने त्याला मारले. इथे महाराष्ट्राच्या चैतन्याचा बाणा कडाडून मोडून पडला. कारण महाराष्ट्राची दंडसत्ता आणि विवेकसत्ता ही गाफील राहिली. दंडसत्ता म्हणजे राज्यकर्ते आणि विवेकसत्ता म्हणजे सुशिक्षित सुज्ञ लोक. उत्तरेत सुलतानी सत्तेच्या प्रचंड धुमाकुळात प्रजेच्या हालअपेष्टांत सत्ता, धर्म, संस्कृती आणि इतिहासही कसा चिरफाळून गेला आहे, हे आमच्या देवगिरीच्या यादवराजांना का माहीत नव्हते? हा प्रश्न कासावीस करतो. देवगिरीचा पंतप्रधान हेमाद्री हा  सावध असल्याचे पुसटसे चिन्हही त्याच्या ग्रंथात आणि राज्यकारभारात दिसत नाही. याच काळात ‘व्रताचार शिरोमणी’ हा ग्रंथ त्याने लिहिला. म्हणजे व्रतवैकल्ये कशी करावीत, केळी खावीत की शिरा खावा, यावर त्याने खल केला. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या समाजकारणात आळंदीच्या एका संन्याशाच्या तीन मुलांच्या मुंजी कराव्यात की न कराव्यात याचाच काथ्याकूट होत होता. समुद्रसीमा ओलांडणाऱ्याला ते धर्मभ्रष्ट ठरवत होते आणि सागरी सरहद्द ओलांडून दीडदीडशे कोस खिल्जीच्या पठाणी सेना स्वराज्यात घुसल्या, तरी राजाला आणि सेनापतीला त्याचा पत्ता लागत नव्हता. हे चित्र महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील राज्यात, संस्थानात कमी-अधिक प्रमाणात दिसत होते. आजही राज्यकर्ते छुप्या पद्धतीने काळाचे काटे उलट्या दिशेने फिरवायच्या प्रयत्नांत आहेत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.  


भारताच्या इतिहासातील सुलतानी अमलाखालील ७१२ ते १५२६ हा सुमारे आठशे वर्षांचा दिल्ली सल्तनतीचा काळ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात दोन शतके इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. अल्लाउद्दीन खिल्जीने साम्राज्यविस्ताराचे जे कर्तृत्व दाखवले ते आपल्या देशातल्या तदनंतरच्या काळातील कोणत्याही योद्ध्यास जमले नाही! खिल्जीच्या गझनी शहरापासून देवगिरीचे अंतर १६०० किमी इतके आहे, ही बाब उल्लेखनीय. खिल्जी घराण्याने काही मुलखाचा अपवाद वगळता तब्बल ३० वर्षे भारतभर राज्य केले! आपसातील ऐक्य, धार्मिक सलाेखा, नवी युद्धतंत्रे व साहित्याचा अभाव, अति सहिष्णुता आणि काही अंशी भेकडपणा, आत्मविश्वासाचा अभाव या दोषांमुळे परकीय आक्रमणे अत्यंत विनाशक ठरली. 


खिल्जी घराण्यातील सुलतानांनी १२९० ते १३२० पर्यंत दिल्लीत राज्य केले. जलालुद्दीन खिल्जी हा खिल्जी घराण्याचा संस्थापक. याच घराण्यातील अल्लाउद्दीन खिल्जीने १२९० ते १३०१ दरम्यान गुजरात, रणथंभोर, चितोड, माळवा, मारवाड, जालोर इ. ठिकाणी सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थानात देवगिरीचा रामचंद्रदेव, तेलंगणचे काकतीय, कर्नाटकचे होयसळ आणि दक्षिणेकडील पांड्य घराणे यांवर स्वाऱ्या केल्या. दक्षिण हिंदुस्थानात स्वारी करून इस्लामी धर्माचा प्रसार करणारा हा पहिला सुलतान. वायव्य सरहद्दीवरून आलेल्या मोगलांच्या स्वाऱ्यांना त्याने प्रतिकार केला. खिल्जी घराण्याच्या काळात हिंदुस्थानात जितका सुलतानी सत्तेचा विस्तार झाला, तेवढा पूर्वी झाला नव्हता. खिल्जी सुलतानांनी उत्तर हिंदुस्थानात सत्ता स्थापून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत आपल्या सत्तेचा प्रभाव पाडला. १२९३-९४ मधे खिल्जीने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हाही त्याचा उद्देश फक्त संपत्तीची लूटमार एवढाच होता. या लुटालुटीच्या स्वाऱ्यांमधे त्या काळात हे राजे अजून एक महत्त्वाचे काम उरकत आणि ते म्हणजे त्या प्रदेशाची तपशीलवार माहिती गोळा करणे. खिल्जीनेही तेच केले. त्या माहितीत त्याला दक्षिणेत किती महापराक्रमी राजे-महाराजे आहेत आणि त्यांच्या संपत्तीची मोजदाद करता येणे अशक्य आहे हे उमगले. पुढे सिंहासनावर बसल्यावर त्याने पठाणी टोळ्यांचा बंदोबस्त करून दक्षिणेचा विचार करायला सुरुवात केली. अल्लाउद्दीन खिल्जी अत्यंत हुशार व धोरणी व्यवस्थापक होता. त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. ती म्हणजे, ‘दक्षिणेकडची राज्ये जिंकायची म्हणजे पदरात विस्तव बांधण्यासारखे आहे.’ त्यापेक्षा त्या प्रदेशातील राजे एकमेकांशी भांडत राहिले, युद्ध करत राहिले तर ते कमकुवत राहतील व जेव्हा तो शेवटचे आक्रमण करेल तेव्हा प्रबळ अशी सत्ता त्या तेथे उरलेली नसेल. यासाठी त्याने दक्षिणेकडे फक्त खंडणी वसुलीचे ध्येय ठेवले. यासाठी त्याने मलिक काफूर याला दक्षिणेकडे पाठवून देवगिरी व वरंगळ ही दोन राज्ये काबीज करून मांडलिक केली. तो त्यांच्याकडून नियमित खंडणी वसूल करू लागला. (मलिक काफूर आणि खिल्जीबद्दल समलिंगी असल्याचे बोलले जाते, पण तसे थेट नेमके उल्लेख कुठेही आढळत नाहीत. याउलट खिल्जीचा मुलगा मुबारक खिल्जी आणि खुसरो खान यांच्यातील संबंधांची चर्चा होते. खुसरो खान काही काळासाठी बादशहा होता. अमीर खुसरोने याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.)  


अलाउद्दीन खिल्जी आणि चित्तोडची राणी पद्मावती यांच्यावर आधारित वादग्रस्त ‘पद्मावती’ सिनेमात फक्त खिल्जी आणि पद्मावती यांनाच केंद्रस्थानी ठेवलेलं नसून खिल्जी आणि त्याचा गुलाम आणि सैन्यप्रमुख मलिक काफूर यांच्या संबंधावरही प्रकाश टाकण्यात आलाय, असं स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित असणाऱ्यांनी सांगितले आहे. एकीकडे पद्मावतीच्या अस्तित्वावर काही इतिहासकार प्रश्न लावतात, तिच्या जीवनगाथेवरही मतमतांतरे आहेत; पण त्याच वेळेस खिल्जीबाबत व्यक्त होताना तत्कालीन भारतीय राजांनी, राजवटींनी केलेल्या हाराकिरीबद्दल खुल्या दिलाने लिहिले वा बोलले जात नाही. इतिहासाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचा हा कमकुवतपणाच होय.  


- समीर गायकवाड (सामाजिक व इतिहास अभ्यासक) 
sameerbapu@gmail.com

बातम्या आणखी आहेत...