आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sameer Paranjape Article About Ruia College, Divya Marathi

देदीप्यमान परंपरेचे रुईया महाविद्यालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील माटुंगा पूर्व भागात शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे चालविल्या जाणार्‍या रामनारायण रुईया महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यंदा ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’ हा बहुमान देऊन गौरविले आहे. हा बहुमान मिळविणारे रुईया हे देशातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसांनी ध्येयवादी वृत्तीने अनेक शिक्षणसंस्था मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केल्या. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी त्यात अग्रेसर होती. सर परशुरामभाऊ उर्फ एस. पी. कॉलेज हे याच शिक्षण मंडळीचे. या संस्थेने जून 1937मध्ये मुंबईत रामनारायण रुईया कॉलेज सुरू केले. अगदी प्रारंभीच्या काळापासूनच रुईया महाविद्यालय हे गुणवंतांची खाण म्हणून ओळखले गेले व आजही ती ओळख कायम आहे. रुईया महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान शाखांचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या ध्येयवादी दृष्टिकोनाची एक मिसाल म्हणजे रुईया महाविद्यालयामध्ये 11 वी ते बी. ए.च्या तिसर्‍या वर्षापर्यंत कला शाखेत इंग्रजी माध्यमाबरोबरच मराठी माध्यमातूनही वर्ग चालविले जातात.रुईयामध्ये मराठी माध्यमातील या वर्गात राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्रासारखे विषय शिकून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील असंख्य विद्यार्थी बी. ए. झाले असून त्यांच्या आयुष्याला उत्तम आकार मिळाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याने भविष्यात आपले काही अडत नाही, हा विश्वास रुईया महाविद्यालयाने इंग्रजीच्या बोलबाल्याच्या काळातही दिला, ही फार महत्त्वाची कामगिरी आहे. 2006मध्ये मुंबई विद्यापीठाने या महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार दिला होता. 2010-11मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने रुईयाला ‘कॉलेज वुईथ पोटेन्शिअल फॉर एक्सलन्स’ या पुरस्काराने गौरवले होते. यंदा ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’ हा बहुमान मिळवून रुईयाने आपलाच आधीचा विक्रम मोडला आहे. गेल्या 76 वर्षांपासून रामनारायण रुईया महाविद्यालयाने सर्वांसाठी शिक्षण हे तत्त्व अंगीकारत शिक्षण आणि संशोधन या दोन्ही स्तरांवर दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात, याकडे सातत्याने लक्ष दिले जाते.
यूजीसीने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणार्‍या निवडक महाविद्यालयांना कॉलेज ऑफ एक्सलन्स हा बहुमान मिळतो. सदर बहुमानांतर्गत यूजीसीने रुईया महाविद्यालयाला भविष्यातील विस्तारकार्यासाठी दोन कोटी रुपये एवढे अनुदान मंजूर केले आहे. महाविद्यालयाच्या भविष्यकालीन विस्तारात शाश्वत विकास ही संकल्पना अग्रभागी ठेवून दर्जेदार शिक्षण, संसाधन निर्मिती व संशोधन यावर भर देण्यात येईल. शैक्षणिक साधनात, संशोधन व पर्यावरणाचा विचार करून महाविद्यालय भविष्यात माहिती तंत्रज्ञान अधिक भरीवपणे वापरेल. महाविद्यालयाला मिळालेला ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’ हा दर्जा 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2019 पर्यंत राहील. रामनारायण रुईया महाविद्यालयात एकूण 59 शैक्षणिक अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये पदवी ते पदव्युत्तर पातळीवरचे तसेच डॉक्टरेट दर्जाचे प्रोग्रॅम्सही आहेत. पदव्युत्तर शिक्षण देणारे एकूण 12 विभाग आहेत. महाविद्यालयात सुमारे 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयामध्ये 28 संशोधन मार्गदर्शक असून सुमारे 120 विद्यार्थी पीएच.डी.साठी दाखल होऊ शकतात. आत्तापर्यंत 600हून अधिक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. विविध क्षेत्रातील आदर्श व सन्माननीय व्यक्ती हे रुईयाचे माजी विद्यार्थी आहेत.

राजकारण, समाजकारण,विज्ञान-तंत्रज्ञान, सिनेमा, नाटक या सर्वच क्षेत्रांमध्ये रुईया महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविलेला आहे. रुईयाच्या विख्यात माजी विद्यार्थ्यांमध्ये डॉ. के. के. कस्तुरीरंगन (वैज्ञानिक), अजित वाडेकर (माजी कर्णधार - भारतीय क्रिकेट संघ), डॉ. नरेंद्र जाधव (शिक्षणतज्ज्ञ), लॉर्ड मेघनाद देसाई (अर्थतज्ज्ञ), डॉ. मनोहर जोशी (लोकसभेचे माजी सभापती), संदीप पाटील (कसोटी क्रिकेटपटू), मेधा पाटकर (प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या), दिलीप प्रभावळकर (अभिनेते), न्या. हेमंत गोखले, डॉ. विद्याधर व्यास (शास्त्रीय गायक), अश्विनी भिडे-देशपांडे (शास्त्रीय गायिका) आदींचा समावेश आहे. पत्रकारितेतील गोविंद तळवलकर, माधव गडकरी, भारतकुमार राऊत, निखिल वागळे अशी दिग्गज मंडळी रुईयाचे माजी विद्यार्थी आहेत. रुईया हे पहिल्यापासून मराठी साहित्यिकांचे माहेरघर होते. रुईयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेल्यांमध्ये विंदा करंदीकर, न. र. फाटक, श्री. पु. भागवत, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, पुष्पा भावे, विजय तापस, मीना गोखले, एकनाथ जाधव, रसायनशास्त्रातील विख्यात तज्ज्ञ डॉ. आर. टी. साने अशी अनेक दिग्गज नावे आहेत. ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या रुईया महाविद्यालयाला आता स्वायत्तता मिळविण्याचे वेध लागले आहेत. त्याही पुढे जाऊन अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याच्या दृष्टीने रुईया महाविद्यालय भविष्यात प्रयत्नशील राहणार आहे. देदीप्यमान शैक्षणिक परंपरा लाभलेल्या रुईया महाविद्यालयाला भविष्यातही दिगंत कीर्ती लाभत राहील, यात शंका नाही.