आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठाची घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८ जुलै १८५७ ला स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाची प्रतिष्ठा तीन दशकांपूर्वी झपाट्याने उताराला लागली. त्या घसरणीला शशिकांत कर्णिक यांच्यासारखे कुलगुरुपदाची अप्रतिष्ठा करणारे लोक जितके कारणीभूत होते तितकेच या विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक घटकही. याच मुंबई विद्यापीठात सध्या अप्रतिष्ठेने पार हद्दच ओलांडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षी पदवी परीक्षेच्या विविध ५१७ अभ्यासक्रमांसाठी एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचे निकाल विद्यापीठ कायद्यानुसार जास्तीत जास्त ४५ दिवसांत म्हणजे मेअखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला लागणे अपेक्षित होते. मात्र, या निकालांना ४५ दिवसांऐवजी ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनांच्या घोळामुळे अनेक शाखांचे निकाल रखडले होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने २४ ते २७ जुलै या काळात अध्यापनाचे काम बंद करून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्णवेळ करण्याचे आदेश प्राध्यापकांना दिले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत लावावेत, असे आदेश दिले होते. पण ते लक्ष्य गाठणे शक्य नाही म्हटल्यानंतर ही मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली गेली. या तारखेपर्यंतही वाणिज्य व विधी शाखेच्या परीक्षांचे निकाल लागणे शक्य नसून त्यासाठी किमान १५ ऑगस्ट उजाडेल, अशी कबुली मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिल्याने विद्यार्थ्यांच्या हताश अवस्थेत आणखी भर पडली आहे. मुंबई विद्यापीठ हे देशातील अनेक विद्यापीठांसाठी कसे आदर्श होते, याचा तपशील डॉ. अरुण टिकेकर यांनी लिहिलेल्या ‘द क्लोएस्टर पेल : द ग्रोथ’ या मुंबई विद्यापीठाच्या चरित्रग्रंथात वाचायला मिळतो. पण सध्या मुंबई विद्यापीठाचा कारभार इतका ढिला झाला आहे की, उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी मुंबई विद्यापीठाने नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठाची मदत घेतली तेव्हा कुठे या कामाला थोडी तरी गती मिळाली. कोणाचेही सहकार्य घेणे अजिबात चुकीचे नाही, पण अकार्यक्षमतेेने स्वत:ची हतबल अवस्था करून घेतल्यानंतर दुसऱ्यांकडे मदत मागायला जाणे गैर आहे. 
 
कोणत्याही विद्यापीठाच्या कुलगुरूच्या निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात असतोच असतो. ही वस्तुस्थिती स्वीकारूनही डॉ. संजय देशमुख यांच्याआधी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी असलेल्या डॉ. राजन वेळूकर यांच्या कारकीर्दीत विद्यापीठ प्रशासन हे खूपच ढिसाळ झाले होते. मुळात तत्कालीन राज्यपालांनी सूचना केल्यानंतर राजन वेळूकरांची कुलगुरुपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने वेळूकरांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर त्यांनी आपल्या कुलगुरुपदाचा पदभार पुन्हा सांभाळला होता. या खटलेबाजीत वेळूकर दंग असताना दुसऱ्या बाजूला मुंबई विद्यापीठाचे प्रशासन मात्र काहीसे दिशाहीन झाले होते. या पडझडीमुळे झालेले नुकसान भरून काढून मुंबई विद्यापीठाचा कारभार पुन्हा रुळांवर आणण्याचे आव्हान ७ जुलै २०१५ रोजी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारलेल्या संजय देशमुखांसमोर होते. कुलगुरुपदी नियुक्ती होणे ही दुर्मिळ संधी असून या संधीचे रूपांतर मी कृतीत करीन व विद्यापीठाचा कारभार कार्यक्षम बनवीन, असे आपल्या नियुक्तीनंतर संजय देशमुखांनी बोलून दाखवले. परंतु त्यांच्या गेल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत मुंबई विद्यापीठाचा कारभार अजूनच बिघडलेला असल्याचे दिसले. मुळात डॉ. संजय देशमुख यांची कुलगुरुपदी निवड झाली त्या वेळी आणखी काही अनुभवी व कार्यक्षम व्यक्तींनीही या पदासाठी अर्ज केला होता. डॉ. संजय देशमुख हे रा. स्व. संघाशी संबंधित असून त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतही पूर्वी काही काळ काम केले आहे. देशमुख यांची शैक्षणिक पात्रता उच्च अाहे याबद्दल वादच नाही. मात्र, त्यांच्या संघाबरोबरच्या असलेल्या बांधिलकीचाही त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होण्यामध्ये हात होता, अशी त्या वेळी चर्चा होती. ती अगदीच अनाठायी नव्हती. 
 
रखडलेले सर्व निकाल लागल्यानंतर डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरून राज्यपाल सी. विद्यासागर राव हे दूर करतील, अशी चर्चा आहे. पण विद्यासागर रावांनीच दोन वर्षांपूर्वी डॉ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली होती, त्यामुळे राज्यपालांनाही काही प्रश्नांची उत्तरे नक्कीच द्यावी लागतील. मुंबई विद्यापीठात कुलगुरुपदावर आहे तीच व्यक्ती विराजमान राहो किंवा नवी व्यक्ती विराजमान होवो, विद्यार्थ्यांना एकाच गोष्टीशी देणेघेणे आहे ते म्हणजे विद्यापीठाचा कारभार कार्यक्षम असावा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. इतकी छोटीशी अपेक्षा १६० वर्षांचे जुने मुंबई विद्यापीठ पूर्ण करील काय? 
 
- उपवृत्तसंपादक, मुंबई
बातम्या आणखी आहेत...