आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिजाततेचे गानशिल्प...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शास्त्रीयसंगीत हा एक वटवृक्ष आहे. शास्त्रीय संगीतातील विविध घराणी ही या वटवृक्षाच्या शाखा आहेत. गेली अनेक शतके शास्त्रीय संगीतातील प्रत्येक घराण्याने आपले वैशिष्ट्य प्राणपणाने जपले आहे. कुमार गंधर्व यांच्यासारख्या गायकाने प्रत्येक घराण्यातील उत्तम ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करून नवतेचा जोरदार पुरस्कारही केला. किराणा घराण्याच्या पं. भीमसेन जोशी यांनी गायनातील पारंपरिकता जपत काही वेगळे प्रयोगही केले. गेली अनेक शतके भारतीय शास्त्रीय संगीत टिकले, वाढले ते अशाच गायकांमुळे. ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचीही नाळ याच परंपरेशी घट्ट जुळलेली होती. देशातील जी जुनी ख्याल घराणी आहेत त्यामध्ये ग्वाल्हेर घराण्याचा समावेश होतो. मुघल सम्राट अकबर याच्या कारकीर्दीत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीला प्रारंभ झाला. उत्तर भारतातील शास्त्रीय गायकीचा बाज हा दक्षिण भारतातील गायकीपेक्षा काहीसा वेगळा आहे. या उत्तर भारतातील संगीताचे जन्मजात संस्कार वीणा सहस्रबुद्धे यांच्यावर झालेले होते. त्यांचा जन्म कानपूर येथे १४ सप्टेंबर १९४८ रोजी झालेला होता. वीणाताईंचे वडील प्रसिद्ध गायक शंकर श्रीपाद बोडस हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. वीणाताईंनी गायकीचे धडे वडील शंकर बोडस तसेच आपले वडील बंधू काशीनाथ बोडस यांच्याकडून घेतले होते. ख्यालगायकी भजनगायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या वीणाताईंनी आपली गायकी ही निव्वळ ग्वाल्हेर घराण्यापुरतीच मर्यादित ठेवली नव्हती. जयपूर किराणा घराण्यातील गायन पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्या गळ्यातून उतरवण्याचा ध्यासही त्यांनी घेतला होता. पंडित गजाननराव जोशी, पंडित वसंत ठकार, पद्मश्री बलवंतराय भट्ट यांच्या गायनाचा संस्कार वीणाताईंच्या गायनावर होता. त्यांनी आपल्या या गायनकळेची संथा आपल्या शिष्यांनाही दिली. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यापैकी अंजली मालकर, सावनी शेंडे ही काही ठळक नावे. अंजली मालकर या वीणाताईंच्या सहवासात सुमारे वीस वर्षे होत्या त्यांच्याकडून मालकरांनी संगीत शिक्षण घेतले. काही गायक हे उत्कृष्ट सादरकर्ते असतात, परंतु ते उत्तम गुरू बनू शकत नाहीत. वीणा सहस्रबुद्धे या उत्तम गुरूही होत्या. पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठामध्ये त्या संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. सुमारे पाच वर्षे त्यांनी या विद्यापीठात संगीत अध्यापन केलेले होते. त्यांना केवळ गायनीकळाच अवगत होती असे नाही तर लहानपणी त्या कथ्थक नृत्यही शिकल्या होत्या. गायन, नृत्य अशा ललित कलांच्या संगमातून त्यांनी आपले आयुष्य समृद्ध केले होते. त्यांना शास्त्रीय संगीतातील अभिजाततेची विलक्षण ओढ होती. ही गायनी अभिजातता आपल्या गळ्यातून अवतरली पाहिजे या ध्यासाने त्या कायम आपला रियाज करीत असत. संगीतावर अशी निष्ठा असणारे गायक-गायिका नव्या पिढीत तुलनेने कमी आहेत. कारण झटपट पुढे जाण्याच्या स्पर्धेत बाजारू संगीताला आलेले महत्त्व. वीणा सहस्रबुद्धे यांनी कधीही संगीतातील तत्त्ववेत्त्याचा आव आणला नाही. आपल्यावर झालेल्या गायनसंस्कारांचा गवसलेला अर्थ त्यांनी अध्यापनातून गायकीतून आपल्या शिष्यांपर्यंत तसेच गानरसिकांपर्यंत पोहोचवला. १९६९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या संगीत अलंकार झाल्या. पुढे १९७९ मध्ये त्यांनी कानपूर विद्यापीठामधूनच संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या शिक्षण संस्कारांची जोड देऊन त्यांनी आपली गायकी विकसित केली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विकासासाठी पं. विष्णू नारायण भातखंडे, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. भास्करबुवा बखले आदींनी मोठे योगदान दिले आहे. जयपूर-अत्रोली घराण्याच्या गायिका श्रुती सडोलीकर-काटकर या सध्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून उत्तम कार्य करीत आहेत. उत्तर भारतातील संगीताशी मराठी शास्त्रीय गायकांची नाळ अशी जुळलेली आहे. त्या मालिकेतील वीणा सहस्रबुद्धे या महत्त्वाच्या दुवा होत्या. त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विविध देशांत त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले होते. संगीतातील अभिजाततेचा ध्यास घेतलेल्या वीणाताईंचे गायन म्हणून चिरस्मरणीय ठरले .
- लेखक उपवृत्तसंपादक आहेत.
बातम्या आणखी आहेत...