आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sandesh Pawar Editorial Article On Political Issue In Maharashtra, Divyamarathi

वास्तवाविरूद्ध इतिहासाचे दाखले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीवेळी महाराष्‍ट्रातील भाजपच्या कोट्यातील असलेली एकमेव जागा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी जाहीर करताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी खोटा इतिहास सांगितला. त्यांनी असा दावा केला की, ‘काँग्रेसने दगाफटका करून डॉ. आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. मात्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबेडकर यांना सन्मानपूर्वक राज्यसभेची उमेदवारी दिली होती. आठवले यांना उमेदवारी देऊन भाजपने या इतिहासाची पुनरावृत्ती केली... बाबासाहेबांना 1952 व 1954 मध्ये काँग्रेसने दोन वेळा संगनमत करून लोकसभा निवडणुकीत पाडले. त्या वेळी श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवले.’

आठवले यांना उमेदवारी देताना मुंडेंनी इतिहासाचे दिलेले दाखले वास्तवाला धरून नव्हते. वास्तविक पाहता 1952 सालची सार्वत्रिक व 1954 सालच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल व त्याचे विश्लेषण, त्यावर अनेक पुस्तके, राज्यसभेची वेबसाइट यांवर याबाबतची पुरेशी माहिती आहे. 1952 मध्ये द्विमत पद्धत अस्तित्वात होती. एक मत राखीव जागेवरील व दुसरे मत सर्वसाधारण (अराखीव) जागेवरील उमेदवाराला देता येत असे. दोन्ही मते एकाच उमेदवाराला देता येत नव्हती, परंतु राखीव जागेवरील उमेदवाराला मतदान केल्यानंतर अराखीव मतदारसंघातील उमेदवाराला मत दिलेच पाहिजे, असा दंडक होता. कोणास मत द्यायचे? हा पर्याय मतदारांसमोर होता. याचा अर्थ एक मत माझ्या पक्षाला द्या आणि दुसरे मत कुजवा हा पर्याय समजण्यात आला होता. या पर्यायानेच डॉ. आंबेडकरांचा घात केला. 1952 च्या निवडणुकीत मुंबई मतदारसंघातून राखीव जागेवरून काँग्रेसतर्फे नारायण काजरोळकर व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनतर्फे (शेकाफे)डॉ. आंबेडकर तर अराखीव जागेवरून काँग्रेसतर्फे व्ही. बी. गांधी, प्रजा समाजवादीतर्फे अशोक मेहता, कम्युनिस्ट पार्टीतर्फे श्रीपाद डांगे व गोपाळ देशमुख, विठ्ठल गांधी, केशव जोशी, नीळकंठ परूळेकर हे निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत एकूण मतदान 7,15,888 झाले त्यात राखीव जागेवर काजरोळकर यांना 1,34,137 व डॉ. आंबेडकरांना 1,23,576 मते मिळाली, परंतु त्यांची बाद मते अनुक्रमे 6492 व 2921 अशी होती. त्यात काजरोळकर विजयी झाले, तर अराखीव जागेवर श्रीपाद डांगे यांना 96,755 मते मिळाली, परंतु त्यांची बाद मते 39,165 अशी सर्वाधिक होती. इथे काँग्रेसचे विठ्ठल गांधी 1,49,138 मते मिळवून विजयी झाले. त्यांची बाद मते 10,881 एवढीच होती. विशेष म्हणजे डांगे यांच्या मतदारांनी जाणीवपूर्वक आपली मते बाद ठरवली. त्यांनी आपल्या अनुयायांना एक मत स्वत:ला व दुसरे कोणालाच न देता कुजवण्यास सांगितले असावे, तसेच अशोक मेहतांच्या मतदारांनीही केले. काजरोळकर यांचा विजय केवळ 14,561 मतांनी झाला. मात्र समाजवादी पक्षाने प्रामाणिक मतदान केले असते तर डॉ. आंबेडकरांचा विजय सहजसोपा झाला असता.. डॉ. आंबेडकर यांचा पराभव एकट्या काँग्रेसने नव्हे तर त्यासोबत प्रजासमाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षांनी केला.

1954 मध्ये भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही असाच प्रत्यय आला. या निवडणुकीत काँग्रेसविरोधात डॉ. आंबेडकर सरळ उतरले. काँग्रेसकडून भाऊराव बोरकर होते. मात्र या वेळी बाबासाहेब निवडून येऊ नयेत म्हणून मतदारयाद्यांत घोळ करण्यात आला. गोंदिया सर्कलमधून 5000 ते 6000 तर भंडारा सर्कलमधून सुमारे 4000 नावे छाटण्यात आली. समोर पराभवाचे ढग काँग्रेसचे बोरकर व पुनमचंद रांका, समाजवादीचे अशोक मेहता यांना दिसू लागले. यातूनच मनोहरभाई पटेल (केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वडील) यांच्या मध्यस्थीने गुप्त बैठक घेण्यात आली आणि सर्वसाधारण मत रांका यांना देण्याऐवजी अशोक मेहता यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशोक मेहता यांना मतदान करण्यासाठी एक अट घालण्यात आली आणि ती म्हणजे प्रजा समाजवादी पार्टीने आपले दुसरे मत डॉ. आंबेडकरांना न देता ते भाऊराव बोरकरांना द्यावे. त्यामुळे इथे समाजवादीचे मेहता (1,49,639) व काँग्रेसचे बोरकर (1,41,164) निवडून आले. वास्तविक पाहता शेकाफे -प्रजासमाजवादी युती होती, परंतु या युतीतील मेहता विजयी होतात व बाबासाहेबांचा पराजय होतो. तिथे बोरकर विजयी ठरतात. त्यामुळे काँग्रेसच्या इच्छेप्रमाणे गुप्त ठरावानुसार बाबासाहेब पराभूत ठरले होते. त्यात सर्व पक्षातील लोकांचा हात होता.

दुसरा मुद्दा डॉ. आंबेडकरांच्या राज्यसभा प्रवेशाचा. मुंडे म्हणतात, ‘डॉ. आंबेडकरांना श्यामाप्रसाद मुखर्जींनी पश्चिम बंगालमधून राज्यसभेत पाठवले’. वास्तव काय आहे? 1937 सालच्या मुंबई प्रांतिक असेंब्लीमध्ये बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे 15 आमदार कार्यरत होते. मात्र, 1946 सालच्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्याने घटना समितीत डॉ. आंबेडकरांचे प्रतिनिधित्व धूसर झाले होते. त्यांना कोणताच मतदारसंघ नव्हता. कोणत्याही मार्गाने डॉ. आंबेडकरांचा घटना सभेत प्रवेश होऊ नये, म्हणून काँग्रेस पक्षाने जंग जंग पछाडले. सरदार पटेल यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली आहे.’ त्यावर डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘मला घटना समितीची दारे, खिडक्या बंद करण्यात आली. इतकेच काय, हवा येण्यासाठी जी तावदाने लावली जातात, ती सुद्धा बंद करण्यात आली.’ अशी परिस्थिती होती.

या स्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत जावेत, अशी अनेकांची इच्छा होती. त्यापैकी जोगेंद्रनाथ मंडल हे एक. ते नामशूद्र जातीचे नेते होते आणि त्यांचे प्रभावक्षेत्र प. बंगाल हे होते. त्यांनी आपल्या मतदारसंघातून डॉ. आंबेडकरांना घटना समितीवर निवडून येण्यासाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना प्रथम पसंतीची सात मते मिळून ते विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या सरतचंद्र बोस यांचा पराभव केला. मात्र डॉ. आंबेडकर ज्या प्रदेशाचे प्रतिनिधीत्व करीत होते, तो भाग पूर्व पाकिस्तानात गेल्यामुळे आपोआप त्यांचे प्रतिनिधीत्व संपुष्टात आले. त्याचवेळी राज्यघटनेचा मसुदा तयार करू शकणारा एकही प्रतिनिधी घटना सभेत नव्हता. त्यामुळे आॅस्ट्रियाचे घटनातज्ज्ञ सर आयव्हर जेनिंग यांच्या सूचनेप्रमाणे पं. नेहरू यांना डॉ. आंबेडकरांना साकडे घालावे लागले. त्यासाठी बॅ. एम. आर. जयकर यांनी घटना सभेतील आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला व त्या जागी मुंबईतून डॉ. आंबेडकर सन्मानाने घटना सभेत पोहोचले. तेव्हा इथेही श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काहीच संबंध आलेला नाही.

जेव्हा 1952 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत ते शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने लढले. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष व समाजवादी पक्ष यांनी यांच्याबरोबर निवडणूक समझोता झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. आंबेडकर शेकाफेच्या वतीने राज्यसभेवर जिंकून आले. त्यांचा कार्यकाल 3 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1956 व 3 एप्रिल 1956 ते 6 डिसेंबर 1956 असा दिलेला आहे. म्हणजेच महानिर्वाणापर्यंत डॉ. आंबेडकर हे राज्यसभेचे सदस्य होते. या निवडीमध्येही श्यामाप्रसाद मुखर्जींचा काही संबंध नव्हता हेच दिसते.
(sandesh_p23@rediffmail.com)