आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीला काळीमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीडमधील रोटरी क्लबचे दिवंगत अध्यक्ष उदय काटे यांच्या कुटुंबीयांवर शेजाऱ्यांनी लादलेला प्रसंग ऐकला तर प्रत्येक सहृदयी माणसाच्या मनात संताप आल्याशिवाय राहणार नाही. काटे हे तसे बीडमधील सुपरिचित व सामाजिक क्षेत्रात वावरणारे व्यक्तिमत्त्व होते.
 
गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबादला हलवले असताना तिथेच त्यांचे निधन झाले. पण त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर अतिशय कठीण प्रसंग ओढवला. अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह बीड येथील घरी अाणण्यात येत होता.
 
मात्र ते ज्या सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये राहतात तेथील रहिवाशांनी अंत्यविधीसाठी काटे यांचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आणण्यास विरोध केला. मृत्यूपाशी सगळे द्वेष वा अन्य भाव संपतात, असे म्हटले जाते. पण सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये मात्र त्याची सुरुवात झाली होती.
 
 नुसता विरोध करून तेथील रहिवासी थांबले नाहीत तर त्यांनी उदय काटे यांच्या पत्नी व भाऊ यांना घराबाहेर काढून गेट लावले. हा प्रकार काटे परिचितांना व पत्रकारांना समजल्यानंतर त्यांनी रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण विरोध हा होताच. 
 
अखेर कोणीतरी पोलिसांना बोलवावे लागेल, अशी भाषा केल्यानंतर रहिवाशांमध्ये नरमाई आली आणि विरोध मागे घेतला. सर्वसाधारणत: कुठेही मृत्यू झाला की, शेजार‑पाजारचे सगळे लोक त्या घराला धीर देण्यासाठी एकवटतात. काटे यांच्या मृत्यूनंतरही सगळे एकवटले पण ते त्यांच्या अंत्यविधीस विरोध करण्यासाठी. 
 
काटे कुटुंबीयांच्या दु:खात वाटेकरी होण्याचे तर लांबच राहिले. परंतु त्रास देण्याची परिसीमाच त्यांनी गाठली. विरोध करताना जी कारणे सांगितली जायची ती देखील कोणालाही चीड आणणारीच आहेत. नवीन वास्तू आहे. अनेकांच्या घरांच्या वास्तुशांती झाल्या नाहीत. मृतदेह येथे आणल्यास मुले घाबरतील, अशा सबबी रहिवाशांनी पुढे केल्या.
 
 अन्य लोकांनी यात मध्यस्थी केली नसती किंवा त्यांच्या समजावणीला रहिवाशांनी जुमानले नसते तर काटे कुटुंबीयांवर आणखी किती दुर्धर प्रसंग ओढावला असता, याची कल्पनाच न केलेली बरी. अखेरीस रहिवाशी कसेबसे राजी झाल्यानंतर रात्री उशिराने अंत्यसंस्कार पार पडले. 
ज्या सबबी सांगत सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील रहिवाशांनी विरोध केला. त्या ऐकल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत पुरोगामी म्हटला जाणारा महाराष्ट्र किती मागासलेला आहे, हे लक्षात येते. नवीन वास्तू आहेत. वास्तुशांती झाल्या नाहीत. या सबबीखाली विरोध करणे अतिशय विचित्र वाटते. एक तर कुठल्याही कारणाने विरोध हा वाईटच आहे.
 
 पण सबबी ऐकल्या की, डाॅ. नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची व्याप्ती सुशिक्षित व सधन लोकांमध्ये आणखी किती गरजेची आहे, याची जाणीव होते. या मंडळींना माणुसकीच्या भावनेतून शेजारधर्म पाळण्याचीदेखील गरज वाटली नाही. कुणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्मलेला नाही. ज्या घरात दु:खद प्रसंग ओढवतो त्यांच्या दु:खात सहभागी होणे, हा सहजभाव आहे. रस्त्यातून एखादी अनोळखी अंत्ययात्रा चालली असली तरीदेखील आपण आदरभाव व्यक्त करतो.
 
मुलांच्या दृष्टीने अंत्यविधी करणे योग्य नाही, असे सांगितले गेले. खरे तर काही समाजामध्ये अशी प्रथा आहे की, मृत्युसारख्या न टाळता येण्याजोग्या कटूसत्याला सामोरे जाण्याची तयारी होण्याच्या दृष्टीने अशा प्रसंगांच्यावेळी त्यांना उपस्थित राहू दिले जाते. इथे तसे होणे तर शक्यच नव्हते. 
 
सिद्धिविनायकमधील रहिवाशांनी लोकांच्या समजावणीनंतर विरोध मागे घेतला. पण लोकांनी पोलिसांकडे जाण्याची भाषा केल्यानंतर तो विरोध थांबला. तोपर्यंत यांना विचारा, त्यांना विचारा असा टोलवाटोलवीचा प्रकार सुरू होता. नंतर अंत्यविधीमध्येही कोणी सहभागी झाले नाही. 
खरे तर जिथे असे प्रसंग घडतात, त्या ठिकाणी कायद्याचा बडगा दाखवलाच गेला पाहिजे. पण एकदा वेळ निघून गेली की, ज्यांच्यावर प्रसंग ओढवलेला असताे, ती मंडळी त्या मार्गाला जात नाहीत. परंतु असे प्रकार पुढे होऊ नयेत म्हणून अडचण निर्माण करणाऱ्यांना कायद्याच्या भाषेत समजावणे अात्यंतिक गरजेचे असते.
 
 एखाद्यावेळी मृतदेह घरी नेणे गरजेचे नसेल तर डाॅक्टर तशी कल्पना नातेवाइकांना देतातच. पण कारण ज्ञात असतानाही विरोध करत राहणे, हे वाईट आहे. एकूणच हा प्रकार माणुसकी, शेजारधर्म, एकमेकांच्या दु:खात सहभागी होणे यासारख्या सहृदयी भावनांना काळीमा फासणारा तर आहेच. पण त्याचबरोबर अंधश्रद्धा बाळगत कोणती तरी जुजबी कारवाई पुढे करत अशा गोष्टींना विरोध करणे, हे थांबले पाहिजे. म्हणूनच समजावणीच्या सुराने भागले नाही तर शक्य तेथे कायद्याचा बडगाही अशा लोकांना दाखवायलाच हवा. 
 
‑ निवासी संपादक, सोलापूर
 
बातम्या आणखी आहेत...