आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनविरुद्ध बहिष्काराचे हत्यार? (संजीव पिंपरकर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरीतील लष्करी तळावर अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद््ध्वस्त करीत पाकिस्तानला धडा शिकवला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेबाबत काँग्रेस, केजरीवाल यासारखे पक्षनेते कोल्हेकुई करत असताना देशवासीयांच्या मनातले लष्कराने घडवले याबद्दल अभिमानाची, राष्ट्रप्रेमाची भावना सर्वत्र आहे. अशातच चीनने पाकिस्तानची पाठराखण करण्याचा उपद्व्याप तसाच पुढे चालू ठेवला आहे. युनोच्या परिषदेचे कायम सदस्यत्व व न्यूक्लियर सप्लायर ग्रुपचे सदस्यत्व भारताला मिळणे, याबाबत चीनने नेहमीच विरोधात भूमिका घेतली आहे. दहशतवाद्यांचा एक नेता मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव युनोसमोर आला असताना चीनने विशेष अधिकाराचा वापर करीत (व्हेटो) त्यालाही विरोध केला. पाकिस्तानची पाठराखण करण्याच्या आजवरच्या धोरणाला अनुसरूनच चीनची ही कृती असली तरी विशेषत: सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरात सध्या असलेल्या लोकभावनेच्या पार्श्वभूमीवर चीनविषयीचा राग उफाळून आला आहे. त्यामुळेच देशभरात सध्या काही पक्ष, नेते चीनमध्ये उत्पादन होणाऱ्या मालाच्या खरेदीवर लोकांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत आहेत. विविध माध्यमांमधून या संदर्भात अनेक मतमतांतरे व्यक्त होत आहेत. बहिष्काराची भाषा आज तरी मर्यादित प्रमाणात पसरलेली असली तरी एकूणच त्या आवाहनाला सर्वसामान्य भारतीयांकडून कितपत साथ मिळेल याबाबत शंका व्यक्त होते.
जागतिक बाजारपेठेमध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. विविध देशांकडून भारत करत असलेल्या एकूण आयातीमध्ये १/६ आयात ही एकट्या चीनकडून सध्या होते आहे. चीनकडून होणारी आयात आणि भारताकडून चीनला होणारी निर्यात याचे प्रमाण इतके व्यस्त आहे की त्याची चिंता वाटावी. भारत चीनकडून करणारी आयात ही ३२ लाख कोटी रुपयांची आहे. गेल्या पाच वर्षांत त्यात ५ टक्क्यांची वाढ झाली. विशेष म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर आयातवाढीचा वेग अगोदरपेक्षा जास्तीचा आहे. आयातीच्या तुलनेत भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीचे आकडेदेखील देशवासीयांना निराश करणारेच आहेत. ज्या कालावधीत आयात ५ टक्क्यांनी वाढली त्याच कालावधीत भारताकडून होणारी निर्यात ५० टक्क्यांनी घटली. आयातीच्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण नगण्य आहे. पाच वर्षातील भारताची निर्यात ही ८६ हजार कोटींवरून ४३ हजार कोटींवर घसरली. दोन देशातील आयात ‑ निर्यातीचे हे व्यस्त प्रमाणच भारताची स्थिती गती काय आहे हे स्पष्ट दर्शवते. चीनकडून भारतात पॉवरप्लँट, मोबाइल फोन, सेट टाॅप बाॅक्स, खते इत्यादींची आयात होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य भारतीयांच्या देवतांच्या मूर्ती, प्रतिमा यादेखील चीनने हायजॅक केल्या आहेत. कोणत्याही जातीधर्माचे दैवत याला अपवाद नाही. ज्या प्रतिमेसमोर आपण मनोभावे प्रार्थना करतो ती देशातच तयार झाली असेल याची खात्री देता येत नाही. चीनमध्ये आॅलम्पिक स्पर्धा होत्या तेव्हा युरिया खताच्या किमती वाढल्याने देशातील शेतकरी हैराण झाले होते. इतकी जबरदस्त पकड भारतांतर्गत बाजारपेठेवर चीनने मिळवली आहे.
दोन देशांमधील यापुढची सगळी युद्धे ही रणांगणापेक्षा बाजारपेठांमधून खेळली जातील, असे शेतकरी संघटनेचे द्रष्टे व दिवंगत नेते शरद जोशी म्हणायचे. हे केवळ शेतमाल व त्यांची जागतिक बाजारपेठ यापुरतेच मर्यादित नाही. एकूणच सर्वच उत्पादनांच्या बाबतीत लागू आहे. त्याची प्रचिती आता पावलोपावली येते आहे. जागतिक देशांतर्गत बाजारपेठेच्या रणांगणावर चीनला हरवण्याची ताकद आपण कमावली आहे का, याचा विचार आपण बहिष्काराच्या आवाहनाच्या प्रतिसादाचे गणित मांडताना करायला हवा. शेजारील राष्ट्राच्या उत्पादन क्षमतेची ताकद ओळखण्यात भारत अपयशी ठरला, असे रघुराम राजन व मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी २००६ मध्ये एका शोध प्रबंधाच्या मांडणीत म्हटले होते. आजवरच्या कोणत्याही सरकारातल्या नेतृत्वाने गुणवत्ता पूर्ण व किफायतशीर किमतीच्या मालाची उत्पादन क्षमता वाढीसाठी समर्पक व पुरेसे प्रयत्न केले नाहीत. मग चीनशी स्पर्धा कशी करणार? परिस्थितीने गांजलेल्या सर्वसामान्य लोकांचा ओढा हा स्वस्त वस्तूंच्या खरेदीकडे साहजिकच व अपरिहार्य असतो. तेथे स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे चीनच्या मालावर बहिष्कार व स्वदेशी मालाचा पुरस्कार या आवाहनास लोक व व्यापारी यांच्याकडून कितपत प्रत्यक्ष साथ मिळेल हे सांगणे कठीण आहे. आता मेक इन इंडियाची चर्चा पंतप्रधान जगभर करीत आहेत. परंतु त्याला यश कितपत अन् केव्हा मिळेल, हे काळच ठरवेल.
(निवासी संपादक, सोलापूर)
बातम्या आणखी आहेत...