आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहल : भाजपच्या कोलांट्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणता तरी असा मुद्दा उपस्थित करायचा की त्यातून जातीयतेच्या  आधारे दोन्ही बाजूंचे लोक  उचकवले जातील. त्याच वाद‑विवादात लोकांना गुंतवून ठेवण्याची सवय भाजपला विरोधात असतानाही होती. आता केंद्रात आणि बऱ्याच राज्यात सत्ताधारी झाल्यानंतरही ती खोड अजून थांबलेली नाही.  रयतेच्या मूळ प्रश्नांवर चर्चा घडवून ते  सोडवण्याच्या ऐवजी त्याच त्या मुद्यांमध्ये लोकांना गुंगवण्याचा खेळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये  करत अाहेत. प्रत्येक सत्ताधारी पक्षामध्ये सोडून दिलेल्या पोळ सारखे काही लोक असे असतात की ते काहीही बडबडत असतात. त्याच्यातून वादाचे तरंग उठण्यापलीकडे फारसे काही होत नाही. त्या पक्षातली वरिष्ठ नेते मंडळी मात्र या तरंगांकडे पाहत  राहतात. काँग्रेसमध्येही असे पोळ होते. तसे ते आता भाजपमध्येही आहेत. पोळांचा घोळ अंगावर येऊ लागला की ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, पक्षाचे नाही असे म्हणत नेते मंडळी त्या वादापासून बाजुला सरकतात. असाच प्रकार ताजमहालच्या बाबतीत निर्माण झालेल्या वादातून होतोय. उत्तर प्रदेशमधील ‘मोघल राजाने बांधलेला ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरचा एक डाग आहे.’ भाजपचे आमदार संगीत सोम असे म्हटल्यानंतर त्यावर सगळीकडून भाजपवर टीका होऊ लागली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही संगीतांच्या सुरात सूर मिसळला.  टीका खूपच होते आहे, हे लक्षात आल्यानंतर पक्षाचा वरिष्ठ नेता जे करतो तेच योगींनी केले. सोम यांचे ते व्यक्तिगत मत आहे,  असे म्हणत त्यांनी पक्षाला व स्वत:ला त्यातून बाजूला केले.  ते एवढ्यावरच थांबले नाहीत पुढे असेही बोलले की ताजमहाल कुणी बांधला हे महत्त्वाचे नाही. तो नक्की हिंदुस्थानी कारागिरांच्या रक्त आणि घामातून बनलेला आहे. उत्तर प्रदेशसाठी तो  पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, असा हुशारीचा युक्तिवाद करत सोम यांच्या वक्तव्यातून उठलेल्या वादाला बगल दिली. 

आदित्यनाथदेखील एवढेच बोलून थांबले नाहीत. त्यांनी लगेच २६ आॅक्टोबरला ताजमहालला भेट देण्याची घोषणा केली. कसलेला जलतरणपटू उलटी कोलांटी उडी मारतो तसाच खेळ मुख्यमंत्र्यांचाही चालू आहे. अाता ते आग्र्याला चालले आहेत. पण मे मध्ये त्यांनी विकास प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक आग्र्यातच घेतली होती. तेव्हा ते यमुना नदीच्या पाहणीसाठी फिरले. पण ताजमहाल किंवा भोवतालच्या परिसराकडे फिरकलेही नाहीत. या अगोदर आदित्यनाथांनीदेखील संगीत सोम यांच्यासारखाच सूर काढला होता. हस्तिदंती शुभ्र मार्बलमधील ही वास्तू भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत नाही. रामायण, गीता हे प्रतिनिधित्व करतात, असे ते  जूनमध्ये बोलले होते. योगी सरकारला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त प्रसिद्ध  झालेल्या पुस्तिकेत ताजमहालचा उल्लेख वगळला होता. जुलैमध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये ‘हमारी सांस्कृतिक विरासत’ सांगणाऱ्या मुद्द्यांचा उल्लेख अर्थमंत्री अग्रवाल यांनी केला होता. त्यातही ताजचा उल्लेख नव्हता. उत्तर प्रदेशमधील पर्यटनाच्या संधी सांगणारी पुस्तिका पर्यटन खात्याने प्रसिद्ध केली. त्यातही ताजमहालचा उल्लेख त्यांनी केला नाही. पर्यटन मंत्री रिटा बहुगुणा यांना सारवा ‑ सारव करावी लागली.  मग कुठल्या मुद्द्याच्या आधारे आदित्यनाथ म्हणतात, की ताजमहाल हा पर्यटनाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाचा आहे. आमदार सोम यांच्या वक्तव्यानंतर लगेच एक‑दोन दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी दुरूस्तीचे वक्तव्य केले. त्यामुळे दोन्ही बाजुंची उलट‑सुलट निवेदने आता थांबतील असे वाटले होते. परंतु योगींच्या बोलण्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपचे खासदार विनय कटियार बोलले. कटीयार हे १९९० च्या दरम्यान अयोध्या राममंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेते होते. ताजमहालच्या जागी मूळ शिवमंदिर होते. मोघलांनी तेथे ताजमहाल बांधला. कटियारांच्या वक्तव्यामुळे वाद चालूच राहील, असे दिसते. 

सतराव्या शतकात ताजमहालची निर्मिती झाली. त्या संदर्भातला वाद हा अनेक वर्षांपासून चालू आहे. तिथे शिव‑तेजालय होते. माेघलांच्या आक्रमणानंतर त्या जागी ताजमहालची निर्मिती झाली, असा वाद नेहमीच होतो. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये ताजमहाल हा वरच्या स्थानावर आहे. ‘लँड आॅफ ताज’ अशीही भारताची ओळख परदेशामध्ये आहे. सरकारला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न पर्यटकांकडून मिळते. सर्वसामान्य लोकांना या वादामध्ये कितपत रस आहे, याची शंकाच आहे. हस्तिदंती शुभ्र मार्बलमधील मूर्तीमंत सौंदर्याचे प्रतीक असलेली वास्तू, अशीच प्रतिमा लोकांच्या मनामध्ये आहे. परक्यांनी केलेल्या आक्रमणानंतर उभ्या राहिलेल्या प्रत्येक देखण्या वास्तूंबद्दल असे वाद निर्माण होऊ शकतात. राष्ट्रपतीभवन, संसद, अगदी मुंबईतील महापालिकेची इमारत, छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानक अशा अनेक  वास्तू वादग्रस्त ठरू शकतात. तेव्हा असे वाद निर्माण करण्याऐवजी भाजपने लोकांच्या प्रश्नाकडे  लक्ष देणे हेच योग्य ठरेल. 
 
‑ संजीव पिंपरकर, निवासी संपादक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...