Home | Editorial | Columns | sanjiv pimprikar writes about amitabh bachchan

मूल्य शिक्षणाचे विद्यापीठ

संजीव पिंपरकर, निवासी संपादक, सोलापूर | Update - Oct 12, 2017, 03:00 AM IST

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी वय ही केवळ एक संख्या आहे. वयाची पंच्याहत्तरी त्यांनी पूर्ण केली.

 • sanjiv pimprikar writes about amitabh bachchan
  महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी वय ही केवळ एक संख्या आहे. वयाची पंच्याहत्तरी त्यांनी पूर्ण केली. एरवी निवृत्तीच्या वयानंतर निवांतपणा शोधणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या तुलनेत या महानायकाची वाटचाल एवढी अफलातून आहे की, त्यांच्या नोंदवहीत २०१९ मधील व्यस्ततेचा उल्लेख दिसताे. अायुष्यातील चढ-उतार, अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेला हा महानायक पूर्वी इतक्याच कणखणरपणाने अधिक भारदस्त पावलं टाकतोय. वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीतल्या तरुण-तरुणींना आकर्षित करण्याची किमया फारच थोड्या अभिनेत्यांना साधता आली. बच्चन हे त्यापैकी वरच्या श्रेणीतले कलाकार आहेत. एकाच व्यक्तीमध्ये चांगले गुण कसे एकवटलेले असतात याही दृष्टीने ते आदर्श आहेत.

  आई ‑ वडिलांवरती विलक्षण श्रद्धा, वैयक्तीक व सार्वजनिक वागणुकीत दिसणारी मुल्यांची जपणूक, लहान‑थोरांशी बोलताना व्यक्त होणारा आदर, तब्येतीमधील उतार-चढावानंतरही वयाच्या पलीकडे सांभाळलेली शारीरिक क्षमता, कोणतेही काम सफाईदारपणे करताना दिसणारी उर्जा, शिस्त, वक्तशिरपणा आणि त्याच बरोबर कामावरची प्रचंड श्रद्धा, आत्मविश्वास असे अनेक गुण बच्चन यांच्याकडून घेण्यासारखे आहेत. सर्वार्थाने आयुष्याच्या व्यवस्थापनाचे शिक्षण देणारे विद्यापीठ, असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वर्णन केले तर ते वावगे ठरू नये. सर्वच वयातील व्यक्तींना त्यांच्याकडून घेण्यासारखे, शिकण्यासारखे काही ना काही गुण आहेतच. यशाच्या, लोकप्रियतेच्या, प्रसिद्धीच्या जागतिक शिखरावर पोहोचलेले असतानाही ते हिंदुस्तानी जमिनीशी घट्ट जोडलेले आहेत. विरळ होत चाललेल्या मानवतेचे दिवस अनुभवताना प्रत्येक माणूस संकुचित स्वार्थी होत आहे. अशा काळात अमिताभ सारखी महनीय व्यक्ती आपल्या सार्वजनिक वागणुकीतून आदर्शाचे धडे सर्वांसमोरच मांडतेे.

  विशेषत: लहान‑मोठ्या महिलांविषयी व्यक्त होणारा अादरभाव हा सर्वांनाच भारावून टाकणारा आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये कोणतीही महिला आली की, आगोदर त्यांना हाॅट सीट मध्ये बसवून मग ते स्वत:च्या स्थानावर जातात. अर्थात, हा केवळ छोट्या पडद्यावरच्या कार्यक्रमात होणारा आदर नव्हे तर खासगी जीवनातही त्यांची वागणूक अशीच आहे. रोझा सिंग या त्यांच्या कार्यालयीन सेक्रेटरी. काम रात्री उशीरापर्यंत लांबले तर त्यांच्या घरापासून पाच इमारती दूर आतल्या बाजुला राहणाऱ्या रोझा सिंग यांना घरी सोडण्यासाठी बच्चन स्वत: गाडी चालवत जातात. त्यांच्यासाठी ते गाडीचा दरवाजा उघडतील. त्या उतरल्यानंतर ते चुपचाप माघारी जातील. अशा तऱ्हेचा स्त्रीयांबद्दलचा आदर फार कमी लोकांच्या वागणुकीतून व्यक्त होतो. जेव्हा त्यांची ‘एबीसीएल’ ही कंपनी अडचणीत आली तेव्हा ते स्वत: टोकाच्या आर्थिक नुकसानीमध्ये आले होते. हा अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ज्यांचे पैसे द्यायचे होते ते लोक घरी येऊन अद्वातद्वा बोलायचे. शिव्या शाप द्यायचे. पैसे ही नव्हते आणि हातात कामही नव्हते. तेव्हा त्यांनी स्वत: मध्ये कमालीचा बदल केला. ते छोट्या पडद्याकडे वळले.

  वयस्कर व्यक्तीच्या भूमिका केल्या. लहान‑मोठ्या पडद्यांवर जाहिरातींमध्ये काम केले. या टोकाच्या प्रतिकुल परिस्थितीनंतर आज ते सर्वोच्च किंमत घेणाऱ्या अभिनेत्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्याही वरचे स्थान बच्चन यांचे आहे. केवळ भारतीयच नाही तर जागतिक चित्रपट सृष्टीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण अत्यल्प आहे. भारतात बच्चन हे त्याला एकमेव अपवाद आहेत. तेही या वयात तन्मयतेने, उत्साहाने भूमिकेत जीव ओततात. जगभर त्यांचे चाहते आहेत. पाकिस्तानातल्या एका चाहत्या मुलाचे उदाहरण त्यांनी मुलाखतीत ऐकवले होते. १९८२ मध्ये ‘कुली’चे शुटींग करताना झालेल्या अपघातानंतर ते दीर्घकाळ रूग्णालयात होते, तेव्हाचा हा किस्सा. सियालकोटच्या जवळ एका खेड्यात राहणारा सोळा वर्षाचा मुलगा रोज दहा‑बारा किलोमीटर धावत जायचा. त्यांच्या तब्बेतीची बातमी वर्तमानपत्रात वाचण्यासाठी तो सियालकोटकडे धाव घ्यायचा.
  दोन मोठ्या अाजारपणानंतरही बच्चन यांनी सांभाळलेली शारीरिक क्षमता विलक्षण आहे. आजही दिवसातला मोठा काळ कामामध्ये व्यस्त राहताना त्यांच्याठायी दिसणारी उर्जा ही तरुणांनाही चकीत करते. काम हीच पूजा आणि ती करताना ते सांभाळत असलेली शिस्त अफलातून आहे. चित्रपटांच्या सेटवर हिरो‑ हिरोइनच्या नखऱ्यांचे अनेक किस्से आहेत. त्या तुलनेत बच्चन यांच्या वक्तशीरपणाची अनेक उदाहरणे आहेत. जगात कोठेही भटकत असताना रात्रीचे दोन किंवा तीन वाजले तरी ब्लाॅगवर काही तरी लिहिण्याच्या सवयीमध्ये त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. खंड पडू दिला नाही. त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व, बोलण्यातला संयम व सुसंस्कृतपणा शब्दागणिक जाणवतो. असे अनेक गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे आहेत. पंच्याहत्तरी नंतरही ते दीर्घकाळ भारतीय रसिकांना आनंद देतच राहतील, या त शंका नाही.

Trending