आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळामुळे पाणी साठे धोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातल्या पाटबंधारे प्रकल्पांवर पिण्याचे पाणी, शेती सिंचन आणि औद्योगिक वापर या तीन गोष्टींचा मोठा ताण आहे. यापैकी पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी या दोन्हींच्या संदर्भात नेहमी रस्सीखेच सगळीकडे चालू असते. याशिवाय एक वेगळा धोका पाटबंधारे प्रकल्पांच्या बाबतीत निर्माण होतो आहे तो म्हणजे जलाशयात साचत चाललेल्या वाढत्या गाळाचा. त्याचे दोन प्रतिकूल परिणाम होतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे धरणात पाणी साठवण्याची क्षमता कमी होते आणि पाण्याच्या दर्जावरही परिणाम होतो. हे गंभीर धोके लक्षात घेऊनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जायकवाडी, उजनी या दोन राष्ट्रीय प्रकल्पांसहित एकूण पाच प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ काढण्याचा प्रायोगिक स्वरूपातील निर्णय घेण्यात आला. यापैकी जायकवाडी प्रकल्पात दोन वर्षांपूर्वी गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु उजनी धरणात मात्र असा निर्णय होण्याची ही पहिलीच वेळ. गाळ काढण्यासंदर्भातील पाच प्रकल्पांची निविदा एकाच वेळेस निघणार आहे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या-त्या प्रकल्पांच्या व्यवस्थापन खर्चासाठी वापरले जाणार आहे. गाळाचा उपसा करणाऱ्याला १५ वर्षांची मुदत दिली जाईल. गाळ शेतात पसरल्यानंतर जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे शेतकऱ्यांना गाळ मोफत उपलब्ध असेल. पण त्याचा वाहतूक खर्च ज्याचा त्याने करायचा आहे. 

नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेकडून पाटबंधारे जलाशयात गाळ किती साचला आहे याची पाहणी केली जाते. ‘मेरी’ने आतापर्यंत दीडशे मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांच्या जलाशयातील गाळाचा सर्व्हे केला आहे. या प्रकल्पांचे वय साधारणत: १० ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. तीन पद्धतीने सर्व्हे केला जातो. रिमोट सेन्सिंगचे तंत्र वापरून केला जाणारा सर्व्हे हा कमी वेळेत, अन्य दोन पद्धतींपेक्षा कमी खर्चात आणि अचूक होतो. जमिनीची धूप वाढत चालल्यामुळे  जलाशयात येणाऱ्या गाळाचे प्रमाण वरचेवर वाढते आहे. महाराष्ट्रामध्ये गाळ साठण्याचे प्रमाण हे सर्वत्र सारखे नाही. त्यात वेगवेगळ्या भागात फरक दिसतो. जिथे सपाट प्रदेशातल्या प्रकल्पांमध्ये गाळ साचण्याचे प्रमाण जास्त असते, ज्या धरणांच्या जलाशयाच्या वरच्या बाजूस जमिनीची धूप जास्ती होते, त्या परिसरातून पाऊस पडल्यानंतर वाहून जाणारी माती ही खालच्या बाजूस असलेल्या धरणात जमा होते. तेथे गाळाचे प्रमाण जास्त असते. उजनी धरणाच्या वरच्या बाजूस विस्तीर्ण मोकळे पाणलोट क्षेत्र आहे. उजनीमध्ये जो गाळ येतो त्यापैकी सर्वात जास्त प्रमाण हे या क्षेत्रातून गाळ येण्याचे आहे. भूपृष्ठावरची माती सैल झाली की, वाहत्या पाण्याबरोबर तीही वाहून जाते. तीच उजनीत साठते. जिथे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण आहे तिथे जमिनीची धूप मोठ्या 
प्रमाणावर होते.  

जायकवाडीची पाणी साठवणूक क्षमता दर वर्षाला ०.३५ टक्के इतकी कमी होते आहे. उजनी धरणाच्या बाबतीत हेच प्रमाण ०.४४ टक्के इतके आहे. जवळपास गेल्या ४०-४२ वर्षांपासून या दोन्ही प्रकल्पांत पाण्याचा साठा होतो. आतापर्यंत साठलेल्या गाळामुळे दोन्ही जलाशयांतील पाणी साठवणूक क्षमता जवळपास १५ टीएमसीने कमी झाली आहे. याचा दुसरा अर्थ असा, खाली गाळ साचला असल्याने तेवढे पाणी जायकवाडी आणि उजनी धरणातून  खाली वाहून जाते. गाळ जो साचतो तो जलाशयाच्या ‘डेड स्टोरेज’मधील असतो. सिंचनाच्या दृष्टीने जिवंत पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होत नाही, असा युक्तिवाद पाटबंधारे अधिकारी करतात खरा. पण पाण्याची जागा गाळाने घेतल्यानंतर तेवढे पाणी खाली वाहून जाणार. खरे तर धरणातल्या पाण्याचे नियोजन करताना ‘डेड स्टोरेज’मधील पाण्याचा वापर अपेक्षित नसतो. नियोजन हे ‘लाइव्ह स्टोरेज’मधील पाण्याचे व्हायला हवे. पण आता दिवस असे आले आहेत की, पाण्याची मागणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे की धरणांत १००  टक्क्यांपेक्षा जास्त साठा झाल्यानंतरही ‘डेड स्टोरेज’मधील पाण्याचा वापर करण्याची वेळ येते आहे. उजनीचा जलाशय आता त्या स्थितीत आहे. उन्हाळा संपण्यास अजून दीड महिना बाकी आहे. पण धरणातील पाणीपातळी आताच उणेपर्यंत (मायनस) गेली आहे. पावसाने ताण दिला तर सोलापूर शहराला आणि ग्रामीण भागातील सुमारे ३० लाख लोकांना ‘डेड स्टोरेज’मधून पाणीपुरवठा करावा लागेल. गतवर्षी हीच स्थिती आली होती. पाणीपातळी -५३ टक्के खाली गेल्यानंतरही त्यातून सोलापूरला पाणी द्यावे लागत होते. आता सरकार गाळ काढायचे म्हणते आहे पण तोही साठवणूक क्षमतेवर अतिक्रमण करणारा गाळ काढला तरच त्याचा फायदा होईल. उजनी, जायकवाडीचे क्षेत्र एवढे मोठे आहे की कडेकडेने गाळ काढत बसले तर त्यातून निष्पन्न फारसे होणार नाही. खरे तर त्या- त्या क्षेत्रातील आमदार या प्रश्नांबाबत अभ्यासू पाहिजे. त्यांनी वेळीच यासंदर्भात सरकार दरबारी दबाव आणला पाहिजे. पण आंध्र, कर्नाटकमधील लोकप्रतिनिधींसारखी अभ्यासू वृत्ती महाराष्ट्रातल्या आमदारांनी आजवर दाखवलेली नाही. 
‑ निवासी संपादक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...