आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणते ट्रम्प खरे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर बराक ओबामा आणि डेमोक्रॅट यांच्यावर टीकेचा भडिमार करणारे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात १६ मिनिटांच्या उद्घाटनाच्‍या भाषणात रिपब्लिकन व डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांच्या सिनेटरना एकात्मता आणि सामर्थ्यवान अमेरिकेसाठी सहकार्य करण्याचे व किरकोळ भांडण-तंटे विसरण्याचे आवाहन करणारे डोनाल्ड ट्रम्प, असे दोन वेगवेगळे ट्रम्प शपथग्रहणानंतरच्या ४० दिवसांत पाहायला मिळाले. यातील कोणते ट्रम्प खरे, असाच प्रश्न अमेरिकेतील लोकांना पडला असेल. निवडणुकीतील प्रचाराच्या भाषणांचे एकवेळ ठीक आहे, त्या वेळी विरोधकांना जमेल तसे, सापडेल तिथे झोडपूनच काढायचे असते. 

यासंदर्भात ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांनी एकमेकांवर आरोप‑प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना कसलीच कसूर ठेवली नाही. वैयक्तिक आरोप करण्यापर्यंत दोघांनी पातळी गाठली. आपण जगातल्या सर्वात जुन्या अमेरिकन लोकशाहीतील निवडणुकांचा प्रचार पाहतोय की जगातील सर्वात मोठ्या भारतीय लोकशाहीतील निवडणुकांमधील हाणामारी पाहतोय, याची शंका वाटावी, एवढी खालची पातळी दोघांनी गाठली होती. निवडणुकीतील विजयानंतरही ‘झाले गेले विसरून जा’ या न्यायाने ट्रम्प यांनी काम करायला हवे होते. पण तसे झाले नाही. शपथग्रहणानंतरही डेमोक्रॅट्सनाही झोडपणे चालूच राहिले. अगदी काँग्रेससमोर भाषण करण्याच्या काही तास अगोदर व्हाइट हाऊसमध्ये एका टीव्ही चॅनलशी बोलतानाही ट्रम्प यांचा टीकेचा सूर लागलेलाच होता. त्यानंतरचे संयुक्त अधिवेशनातील भाषण म्हणजे अगदी दक्षिण आणि उत्तर ध्रुव अशी टोकाची स्थिती होती. काँग्रेससमोर बोलताना सभागृहाची आणि पदाची आब राखून ते बोलले.
 
सरकारसमोरच्या उद्दिष्टांचा पुनरुच्चार करताना ट्रम्प यांच्या बोलण्याचा सूर बराचसा नरमला होता. रिपब्लिकन सिनेटरनाही ते अनपेक्षित होते. वेळोवेळी त्यांनी बराच वेळ टाळ्या वाजवत ट्रम्प यांना प्रतिसाद दिला. अर्थात विरोधी डेमोक्रॅटची प्रतिक्रिया अविश्वासार्हतेची आहे. ट्रम्प बोलतील तसे करतील, याची खात्री त्यांना नाही.  सूर मवाळ असाला तरीही पक्षाच्या धोरणाच्या दिशेत त्यांनी कोठेही बदल केलेला नाही. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारातील ‘अमेरिका फर्स्ट’ हा त्यांचा परवलीचा शब्द झाला होता. आजच्या भाषणात त्यांनी तो एकदाही उच्चारला नाही. अमेरिकेच्या व लोकांच्या हिताचेच मुद्दे बोलत राहिले. त्यांना स्थलांतरितांचा मुद्दा महत्त्वाचा होता. भारतासाठीही तो कमालीचा लक्षवेधी आहे. आदल्याच दिवशी एका चॅनलशी बोलताना दोन्ही बाजूंनी तडजोडीचा विचार करत निर्णय घेण्याचे वक्तव्य त्यांचे होते. पण त्याचा उल्लेखही न करता स्थलांतरितांच्या मुद्द्यावर कटाक्ष टाकताना आॅस्ट्रेलिया, कॅनडासारखा गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याचा उल्लेख त्यांनी केला. अर्थात गुणवत्तेचा निकष महत्त्वाचा मानला तर स्थलांतरित भारतीयांना तो फायद्याचाच ठरेल. स्थलांतरित भारतीय आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्थैैर्यासाठीही ते जरुरी असल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. अर्थात अंमलबजावणीतील बारकाव्यांवर स्थलांतरितांची स्थिती‑गती अवलंबून आहे. गुन्हेगार, तस्कर, अमली पदार्थांच्या व्यापारातल्या स्थलांतरितांना अमेरिकेबाहेर हाकलण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
 
हैदराबादचा अभियंता श्रीनिवास कुचिबोटला याच्या हत्येनंतर भारतीयांमध्ये कमालीची चिंता आहे. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचेही टाळतात. कॅन्ससमधील श्रीनिवासच्या हत्येचा निषेध त्यांनी केला. अमेरिकेच्या मूल्यांमध्ये, ध्येयधोरणांमध्ये  वंश, वर्ण यावर आधारित ‘हेट क्राइम’ला थारा नाही, असे ट्रम्प म्हणाले.  येमेनमधील कमांडो कारवाईत मारल्या गेलेल्या नौसैनिकाबद्दल आदर व्यक्त करताना त्याची पत्नी सभागृहाच्या प्रेक्षकांत उपस्थित होती. त्याच प्रकारे श्रीनिवास यांच्या पत्नीलाही सभागृहात बोलवले असते तर जगभरात वेगळा संदेश गेला असता.  
 
आरोग्य सुविधांसंदर्भातील ओबामा केअर ही सक्तीची आणि महागडी विमा योजना रद्द करण्याची घोषणा करताच रिपब्लिकन सिनेटरनी जोरात टाळ्या वाजवल्या. हा मुद्दा स्थलांतरितांच्या दृष्टीने महत्त्वाचा एवढ्यासाठीच अाहे की, अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्यासाठी होणाऱ्या खर्चाचा मोठा हिस्सा कायदेशीर स्थलांतरितांकडून मिळणाऱ्या पैशातून भागवला जातो. ट्रम्प सरकारला स्थलांतरितांबाबत निर्णय घेताना याचाही विचार करावा लागेल. मुद्दा न सोडणारे मवाळ सुरातले भाषण रिपब्लिकन सिनेटरना आवडले खरे; पण भाषण, कागदावरचे धोरण आणि त्याचा अंमल या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जरी ट्रम्प खूप बाेलले तरी त्याचा अंमल होईल, तेव्हाच ते खरे.  
 
बातम्या आणखी आहेत...