आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्रिया आणि आंतरराष्ट्रीय राजकारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जगात अशी परिस्थिती जुळून येत आहे की अतिशय महत्त्वाच्या देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखपदी महिला येतील किंवा आहेत. अमेरिका आणि फ्रान्समध्ये महिला राजकीय नेत्या सत्तास्पर्धेत आहेत, तर ब्रिटन, जर्मनी, दक्षिण कोरिया, तैवानमध्ये त्या प्रमुखपदी आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदीसुद्धा एक महिलाच आहे. पुढील वर्षी युनोच्या नव्या सेक्रेटरी जनरलची नियुक्ती होईल. तिथेही एखादी महिला आल्यास आश्चर्य वाटू नये. एकूणच अस्वस्थ वातावरणातसुद्धा आंतरराष्ट्रीय सत्ताकारणात स्त्रियांचे वाढते महत्त्व ही अतिशय आश्वासक आणि सकारात्मक बाब आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांच्या नावावर डेमोक्रॅटिक पक्षाकडून शिक्कामोर्तब झाले. रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा आक्रस्ताळा आणि नको ते बोलणारा उमेदवार दिला आहे. एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सध्याचे अस्वस्थ स्वरूप लक्षात घेता अमेरिका आणि जगातील सुजाण नागरिकांची अशीच इच्छा आहे की डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी याच अमेरिकेच्या अध्यक्षपदी याव्यात. ट्रम्प आले तर देशाचे आणि जगाचे भले करण्याऐवजी नुकसान करण्याची शक्यता जास्त आहे, असे विचारी जनांचे मत तयार झालेले आहे. आता अर्थात अमेरिकी नागरिक काय निर्णय घेतात त्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा निर्णय काहीही लागला तरी अमेरिकेसारख्या जगातील सर्वात बलाढ्य देशाच्या प्रमुखपदी हिलरी क्लिंटन यांच्यासारखी एक स्त्री येऊ शकते ही घटनाच जगभरातील स्त्रियांसाठी किती विलक्षण आत्मविश्वास देणारी असू शकते!
हिलरी यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या निमित्ताने एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर निर्णयप्रक्रियेत महत्त्वाच्या स्थानी असलेल्या स्त्रियांकडे थोडक्यात नजर टाकायला हवी. गेल्याचा महिन्यात ब्रिटनमध्ये युरोपात राहायचे की नाही यावर मोठे वादळ उठले आणि त्यामुळे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून पायउतार झाले. त्यांच्या जागी थेरेसा मे विराजमान झाल्या. मार्गारेट थेचर यांच्यानंतर बरोबर पंचवीस वर्षांनी दुसरी महिला ब्रिटनच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे यांच्या रूपाने आली. दोन्ही वेळेस ब्रिटन मोठ्या संकटांचा सामना करत असताना स्त्रिया देशाच्या पंतप्रधान झाल्या आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेपाठोपाठ जर्मनीतसुद्धा सध्या अँजेला मर्केल यांच्या रूपाने महिलाच राष्ट्राध्यक्षपदी आहे. युरोपातील आर्थिक संकटे, रशियाच्या आक्रमक धोरणामुळे उद््भवलेले राजकीय पेचप्रसंग आणि सिरियातून येणाऱ्या निर्वासितांचे लोंढे हाताळणे अशा अतिशय कसोटीच्या प्रसंगी मर्केल यांनी केवळ जर्मनीलाच नाही तर एकूण युरोपीय गटाला समर्थ असे नेतृत्व दिले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदीसुद्धा ख्रिस्तिना लेगार्द आहेत. महत्त्वाची आर्थिक सत्ता असलेल्या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदीसुद्धा ‘पार्क गुन हे’ ही महिला आहे. तसेच तैवानच्या अध्यक्षपदीसुद्धा नुकत्याच झालेल्या निवडणुकांत एक महिला विराजमान झाली आहे. पुढील वर्षी फ्रान्समध्ये निवडणुका होणार आहेत. तिथले एकूण अस्वस्थ वातावरण लक्षात घेता अतिउजव्या बाजूला झुकलेल्या ‘मरी ल पेन’ अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून येणार अशीच चिन्हे आहेत. एका बाजूला विकसित जगाचे असे चित्र असताना विकसनशील देशांकडे पाहू जाता काय चित्र दिसते? काही आफ्रिकी देशांत स्त्रिया सर्वोच्च वर्तुळात आहेत. मात्र, रशिया आणि चीन या दोन्ही महत्त्वाच्या राजकीय सत्तांची सूत्रे आक्रमक पुरुष नेत्यांकडे आहेत. तेथील वरिष्ठ सत्ताधारी वर्तुळातसुद्धा स्त्रिया दिसत नाहीत. अगदी दोन महिन्यापूर्वीपर्यंत ब्राझीलमध्ये दिल्मा रुसोफ या राष्ट्राध्यक्ष होत्या, तर गेली आठ वर्षे अर्जेंटिनामध्ये महिलाच राष्ट्राध्यक्ष होती. बाकी पश्चिम आशिया आणि अरब जगात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने तेथील सत्ताधारी वर्तुळात पुरुषच असतात. इस्रायलमध्ये गोल्डा मायर या १९७० च्या दशकात राष्ट्राध्यक्ष होऊन गेल्या, पण त्यानंतर चित्र पुरुषकेंद्रीच राहिले.

भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये काय परिस्थिती आहे? भारताच्या शेजारी म्यानमारमध्ये आंग सान स्यू की या देशाच्या राजकारणात महत्त्वाच्या पदावर आहेत. त्याहीपेक्षा त्यांच्याकडे म्यानमारच्या जनतेच्या लोकशाही आकांक्षांचे प्रतीक म्हणून गेली पंचवीस वर्षे पाहिले जाते. शेजारील बांगलादेशच्या पक्षीय राजकारणाचे स्वरूपच असे आहे की गेली वीस वर्षे तिथे महिला नेत्याच पंतप्रधानपदी येत आहेत. सध्या शेख हसीना ही महिलाच पंतप्रधान आहे. उत्तरेकडील नेपाळमध्ये विद्यादेवी भंडारी ही महिलाच राष्ट्राध्यक्षपदी आहे. भारतात इंदिरा गांधी होऊन गेल्या. त्याव्यतिरिक्त यूपीए सरकारच्या काळात पक्षप्रमुख म्हणून सोनिया गांधी महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. तसेच सध्या सुषमा स्वराज देशाच्या परराष्ट्रमंत्री आहेत. दक्षिणेकडील चिमुकल्या श्रीलंकेत सिरिमाओ बंदरनायके आणि चंद्रिका कुमारतुंगे या दोन महिला सरकारच्या प्रमुखपदी येऊन गेल्या आहेत. पाकिस्तानात हत्या होण्यापूर्वी बेनझीर भुत्तो महत्त्वाच्या भूमिकेत होत्याच. यापूर्वी कधीही जगात इतक्या मोठ्या संख्येने स्त्रिया सत्ताधारी वर्तुळात नव्हत्या. परंतु इथून पुढे या क्षेत्रात त्या असणार आणि त्यांचे प्रमाण वाढत जाणार अशीच एकूण चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात स्त्रियांचे प्रमाण उच्चस्तरावरील सत्ताधारी वर्तुळात वाढल्याचे नेमके काय परिणाम होतात हे पाहायला हवे.

संकल्प गुर्जर
राजकीय अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...