आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीर्वाण भारतीची महती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृत भाषा केवळ मंत्र वा स्तोत्रांपुरतीच मर्यादित न राहता ती आता ग्लोबल होते आहे. संस्कृत स्क्रिप्टचे जर्मन भाषेशी असलेले साधर्म्य जर्मनीतील अभ्यासकांना आकर्षित करत आहे आणि जर्मनीतही संस्कृत भाषेचा अनेक वर्षांपासून अभ्यास होत आहे, हे या भाषेचे वैशिष्ट्य लक्षात घ्यायला हवे.
‘भारतीय संस्कृती ही संस्कृत भाषेत अंगभूत आहे आणि त्यामुळेच संस्कृत भाषा म्हणजे जणू काही आपला एक वारसाच आहे,’ असे अनेक वर्षांपासून पोटतिडकीने सांगणा-या वेदशास्त्रसंपन्न विद्वान पंडितांच्या पदरी काही काळ थोडी निराशाच पडली. पण अलीकडच्या काळात भारतीय शासनाच्या जाणकार गटाने संसदेत संस्कृत भाषेचे महत्त्व, तसेच तिची प्राचीनता व इतिहास आणि तिचे गीर्वाण भारतीयत्व मांडून भारताच्या प्रमुख बावीस राज्यभाषांत तिला स्थान मिळवून दिले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. संस्कृत भाषा ही आपल्या देशाचा गौरवशाली भूतकाळ (इतिहास) खुला करून देणारी गुरुकिल्लीच आहे. सर्व भाषांची जननी असे म्हटल्या जाणा-या संस्कृत भाषेमुळेच भारताच्या वैदिक तसेच धार्मिक परंपरांचा उलगडा होऊ शकतो. सन 1891 मध्ये सर्वप्रथम भाषांमध्ये पारंगत असणा-या व संशोधन करणा-या काही प्रमुख शोधनिबंधकारांनी संस्कृत भाषेच्या पुन:प्रस्थापनेसाठी परिषद घेतली आणि त्यातूनच पुढे 1894 मध्ये ‘अमेरिकन एशियाटिक अँड संस्कृत रिव्हायव्हल सोसायटी’ची स्थापना झाली. त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकात संस्कृत भाषेला एक अढळ स्थान प्राप्त झाले असे म्हणता येईल. 1991 च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार भारतात 49,736 लोकांना संस्कृत भाषा अस्खलितपणे बोलता येत होती आणि किमान 50,000 कुटुंबांनी आपली द्वितीय भाषा म्हणून संस्कृत भाषेला निवडले होते.
त्यानंतर मात्र संस्कृत भाषेचा, म्हणजेच विद्यार्थ्यांना परीक्षेत भरपूर टक्के मिळवून देणा-या भाषेचा, भारतातील टक्का घसरला. तरीही ‘उत्तराखंड’ हे भारतातील पहिले असे राज्य ठरले की ज्या राज्याने ‘संस्कृत’ हीच आपली द्वितीय राज्यभाषा म्हणून घोषित केली आणि एकेकाळी दक्षिण भारताशिवाय कोठेच न टिकलेल्या संस्कृत भाषेचा भारतात अगदी नजीकच्या भूतकाळात जोरदार प्रचार आणि प्रसार सुरू झाला. त्याचे श्रेय शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य व संस्कृत भाषासंपन्न प्राध्यापकांना जाते. तसेच 2002 पासून ‘ऑल इंडिया संस्कृत फेस्टिव्हल’ आयोजित करणारे आयोजक, श्राव्य माध्यमातून रोज सकाळी संस्कृत भाषेतून बातम्या प्रसारित करणा-या ‘ऑल इंडिया रेडिओ’ आणि ‘वदतु संस्कृतम्’सारख्या शिबिरांमधून प्रशंसनीय कार्य करणा-या ‘संस्कृत भारती’ इत्यादी संघटनांचेदेखील श्रेय इतर कुणाला हिरावून घेता येणार नाहीच.
आज भारतातील किमान चार खेड्यांमध्ये संस्कृत भाषा ही मातृभाषा आहे आणि मध्य प्रदेशातील ‘जिहरी’ तसेच मध्य कर्नाटकातील ‘मात्तूर’ हे त्यापैकीच आहेत. संस्कृत भाषा ही फक्त महाराष्ट्राची किंवा कोण्या एकाच राज्याची द्वितीय राज्यभाषा न होता ती संपूर्ण भारताची द्वितीय राज्यभाषा असावी, असा प्रस्ताव 11 सप्टेंबर 1949 रोजी तत्कालीन कायदेमंत्री आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. संस्कृतचे महत्त्व हे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणा-या व थोर जाणकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही ज्ञात होते, हे सिद्ध झाले. भारतात आता अनेक विद्यापीठे संस्कृत भाषेच्या शिक्षणासाठी सरसावली आहेत. त्यात कालिदास विद्यापीठ, राष्ट्रीय संस्कृत संस्थान, तसेच दिल्ली व मुंबई येथील (जर्मन) मॅक्सम्युलर भवन याचे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणजेच केवळ आताच्या ग्लोबलायझेशनच्याच युगात नव्हे तर कितीतरी वर्षांआधी म्हणजे कविकुलगुरू कालिदासाच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे जर्मन कवी गटे हा कालिदासाच्या नाट्यत्रयीतील एक अजरामर नाटक ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ डोक्यावर घेऊन नाचला. इतकी ख्याती असणा-या, संस्कारांची माळ धारण करणा-या या भाषेला गेली काही वर्षे जी उपेक्षा सहन करावी लागली आहे, ती आपल्या देशाच्या दृष्टीने एक दुर्दैवाचीच बाब आहे.
अलीकडच्या काळात मात्र संस्कृत भाषेचे महत्त्व तरुण वर्गाच्या मनात रुजल्याचे आढळते. शाळा व महाविद्यालयांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे संस्कृत भाषेशी निगडित कार्यक्रम, संस्कृत नाटके, एवढेच नव्हे तर संस्कृतातून सादर केले जाणारे शोधनिबंध इत्यादी गोष्टी याची ग्वाही देतात, की भारतीय संस्कृती संस्कृत भाषेचे रक्षण नक्कीच करेल. इंटरनेटच्या माध्यमातूनच अनेक देशांपर्यंत संस्कृत भाषा पोहोचवण्याचे कार्य तरुणाई करत आहे. सॉफ्टवेअर क्षेत्राचा असाही योग्य वापर आपण करू शकतो, याची जाण भारतीय तरुणांना आहेच आणि ‘व्हर्च्युअल क्लासरूम’, ‘ई-संस्कृत लर्निंग’ इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेय, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटावा.